ठाणे, पालघर, रायगड आणि गुजरातमध्ये १९हून अधिक गुन्हे असलेली बंक टोळी गजाआड

महाराष्ट्रातील ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्य़ांसह गुजरातमधील शहरांमध्ये १९हून अधिक गुन्हे दाखल असलेल्या बंक टोळक्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यास विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुरडे यांनी मंजुरी दिली आहे. घातक शस्त्रांसह घरांमध्ये घुसून चोरी करणाऱ्या या टोळक्याचा प्रमुख देवाशीष बंक यास ठाणे ग्रामीणच्या गुन्हे पथकाने मे महिन्यात अटक केली होती. त्यांच्याकडून घातक शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला होता. त्याच्या टोळक्याने या भागामध्ये दहशत पसरवली होती. या गुंडांना अटक केल्यानंतर त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगार नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव ग्रामीण पोलिसांनी सादर केला होता. त्याला मंजुरी मिळाल्याने या टोळक्यांवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.

बदलापूरजवळच्या कान्होरे गावी राहत असलेल्या पंढरीनाथ देशमुख २१ डिसेंबर २०१५ रोजी सायंकाळी साडेनऊच्या सुमारास कुटुंबासह जेवण करत होते. त्या वेळी तोंडावर रुमाल बांधून आरोपी देवाशीष बंक आणि त्याच्या साथीदारांनी मुख्य दरवाज्यातून घरात प्रवेश केला. त्यापैकी एकाने पंढरीनाथ आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकावून तसेच पिस्तूलचा धाक दाखवून पैसे आणि दागिन्यांची मागणी केली. पिस्तूलने घराच्या टीव्हीवर आणि भिंतींवर गोळीबार करून दहशत पसरवली होती. देशमुख यांच्या कुटुंबीयांना हातापायाला, तोंड चिकटपट्टीने बांधून घरातील कपाटातून ९६,५०० किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरली होती. याप्रकरणी कुळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. देवाशीष बंक आणि त्याचे साथीदार कैलास दिघे (२५, रायगड), सचिन दहीवडे (२८, कल्याण), शंकर ऊर्फ रमेश दास (२६, वर्धमान), अलोक सोनी (२२, सायन) आणि मंटु लोहार यांचा या गुन्ह्य़ात समावेश होता. याप्रकरणी तपास करणाऱ्या ठाणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने देवाशीष यास मे महिन्यात टिटवाळा येथे अटक केले. त्याच्याकडून विदेशी बनावटीच्या २ पिस्तूल, २ गावठी कट्टे, ५१ जिवंत काडतुसे, ४ आवाज करणारे जिवंत काडतुसे व ५० ग्रॅम एअरगनचे छर्रे, २ मॅगझिन, १ आवाज करणारी नकली रिव्हॉल्व्हर व १ छर्रेची पिस्तूल, पोलीसांच्या बेडय़ा, ३ खंजीर, ३ कोयते, कटावणी, १ कुऱ्हाड, हातोडी, एक्सो ब्लेडची मशीन, कटावणी, स्क्रू ड्रायव्हर, हॅण्डग्लोज, चेहऱ्याचे मास्क, गॅस रिफिलर, गॅस सिलेंडर, सोने वितळविण्यासाठी लावणारी पावडर अशी हत्यारे आणि साहित्य जप्त करण्यात आले होते. हे टोळीप्रमुख व त्यांचे इतर साथीदार सध्या गुजरात पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. या टोळीच्या गुन्हेगारी कारवाया वाढल्याने त्यांची दहशत टिटवाळा, मुरबाड, बदलापूर, वांगणी परिसरांत वाढू लागली होती.

अटक आरोपी आणि त्यांच्यावरील गुन्हे.

  • देवाशिष बंक, उर्फ आशिष गुनगुन उर्फ आशिष गांगुली
  • कैलास रमण दिघे – ९ गुन्हे
  • सचिन दहीवडे – १८ गुन्हे
  • शंकर दास – ४ गुन्हे
  • अलोक सोनी – ३ गुन्हे
  • मंटु लोहार – ३ गुन्हे