|| किशोर कोकणे

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय; १६ ठिकाणे निश्चित

ठाणे रेल्वे स्थानकातील सुरक्षा व्यवस्था घट्ट करण्याच्या दृष्टीने उशिरा का होईना रेल्वे प्रशासन तसेच सुरक्षा दलाकडून हालचाली सुरू झाल्या असून स्थानकात शिरण्यासाठी वापरण्यात येणारे १६ चोर मार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करत एक चोर मार्ग बंद करण्यात आला असून उर्वरित मार्ग शटर, प्रवेशद्वार आणि अडथळ्यांच्या मदतीने बंद करण्यात येणार आहे.

ठाणे रेल्वे स्थानक शिरणाऱ्या गर्दुल्ले आणि चोरट्यांना रोखणे यामुळे शक्य होईल तसेच सुरक्षेच्या दृष्टीनेही हे महत्त्वाचे पाऊल असेल असा दावा रेल्वे प्रशासनाकडून केला जात आहे. मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे रेल्वे स्थानक हे अतिशय गर्दीचे असे स्थानक असून दिवसाला सहा लाख प्रवाशांचा याठिकाणी राबता असतो. ट्रान्स हार्बर मार्गावरूनही ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्याही गेल्या काही वर्षांत वाढली असून त्यामुळे हा आकडा दिवसागणिक वाढत आहे. गेल्या काही वर्षांपासून ठाणे रेल्वे स्थानकातील सुरक्षा ढिसाळ झाली असल्याच्या तक्रारी आहेत. इतक्या मोठय़ा रेल्वे स्थानकात प्रवेश करण्यासाठी मुख्य आणि चोर मार्ग मिळून २४ प्रवेश मार्ग आहेत. यामुळे स्थानकातील प्रवाशाच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. सद्य:स्थितीत मुख्य प्रवेशद्वाराव्यतिरिक्त स्थानकात शिरण्यासाठी वेगवेगळे मार्ग असल्याने याठिकाणी देखरेख ठेवणेही कठीण जात आहे.

हे लक्षात घेऊन या स्थानकाच्या सुरक्षेसाठी काही महिन्यांपूर्वी रेल्वे सुरक्षा दलाने ‘ठाणे रेल्वे स्थानक सुरक्षा कृती योजना’ तयार केली होती. या योजनेत सुरक्षा दलाने ठाणे स्थानकातील चोर मार्ग रोखण्यासाठी आरखडा तयार केला आहे. त्यानुसार स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिमेतील एकूण १६ मार्ग बंद करण्यात येणार आहेत. यात पश्चिमेकडील १० तर पूर्वेकडील ६ मार्गिका बंद करण्यात येणार आहे. यातील पश्चिमेकडील एक मार्ग सुरक्षा दलाने बंदही केलेला आहे. येत्या काळात उर्वरित मार्गही बंद करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाने दिली. मार्गिका बंद करण्यासाठी लोखंडी प्रवेशद्वार, काही ठिकाणी शटर तर काही ठिकाणी अडथळे उभारण्यात येणार आहे. एखाद्या वेळी स्थानकात गर्दी झाल्यास हे शटर आणि प्रवेशद्वार उघडता येऊ शकणार आहे.

ठाणे रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेसाठी काही महिन्यांपूर्वी योजना तयार केली होती. त्यानुसार, स्थानकातील १६ मार्ग बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी केवळ नऊ मार्ग खुले राहणार आहेत. त्यामुळे गर्दुल्ले, भिकारी आणि चोरटय़ांना रोखणे सहज शक्य होणार आहे.     – राजेंद्र पांडव, वरिष्ठ निरीक्षक, रेल्वे सुरक्षा दल, ठाणे रेल्वे स्थानक.