विविध समस्यांचा सामना करणारे वसई-विरार शहर गुन्हेगारीच्या दुष्टचक्रात अडकले आहे. गुन्हेगारीमुळे भरडला गेलाय तो सर्वसामान्य माणूस. वाढत्या सोनसाखळ्या चोऱ्या, घरफोडय़ांनी सर्वसामान्य वसईकर त्रस्त आहे, भयभीत आहेत. साधनसामग्रीची कमतरता पोलिसांना भेडसावत असली तरी त्याच वेळी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक गंभीर गुन्ह्य़ांची प्रकरणे प्रलंबित आहेत. महत्त्वाच्या गुन्ह्य़ातले आरोपी मोकाट आहेत. पोलिसांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. बिल्डरांना अटक न करण्याच्या नावाखाली पोलीस गब्बर झाले आहेत. वाळूमाफियांनी तर पोलीस कसे पैसे घेतात त्याचे दरपत्रकच प्रसिद्ध केले आहे. पेट्रोलअभावी पोलिसांच्या गस्ती बंद आहेत. लोकसंख्या वाढत असून पोलीस बळ अपुरे आहे. गुन्हेगारी टोळ्या शहरात सक्रिय झालेल्या आहेत. वाढती गुन्हेगारी रोखण्याचे तसेच पोलीस दलाची फेररचना करण्याचे मोठे आव्हान पोलीस दलापुढे आहे.

नालासोपारा गुन्हेगारीचे केंद्र

वसई-विरार-नालासोपारा हा भाग मुंबईलगत आहेत. तुलनेने स्वस्त घरे मिळत असल्याने मध्यमवर्गीय या भागात राहायला येऊ  लागले. नालासोपारा पूर्वेला अनधिकृत चाळींचे साम्राज्य उभे राहिले. चाळमाफियाने बेकायदा चाळी बांधल्या. याच अनधिकृत वसाहतीत गुन्हेगारीची पाळेमुळे रुजू लागली. मुंबईतले तडीपार, गुंड, गुन्हेगार यांचे आश्रयस्थान या वसाहती बनू लागल्या आहेत. मुंबईत गुन्हेगार करणारे गुन्हेगार नालासोपारा भागात राहतात. अगदी मुंबई बॉम्बस्फोटातले आरोपीदेखील नालासोपारा शहरात राहत होते. शहरातील गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस चढतोय. नागरिकांच्या तक्रारी आल्या की आम्ही गुन्हे दाखल करतो, असा दावा पोलीस करत असतील. पण घरफोडी, चोऱ्या, दरोडे आणि हत्यांचे प्रमाण वाढले आहे. लहान मुलांचे अपहरण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. वसई-विरार शहरातील गुन्हेगारीचा आलेख सतत चढता आहेत. त्यात सातत्याने वाढ होत आहे. २०१५ मध्ये ४४ हत्या, ३३४ अपहरण, ५४३ चोरी, ४४६ घरफोडी, १९५ जबरी चोरी, १४ दरोडे आदी मिळून तब्बल १ हजार १९८ गुन्ह्य़ांची नोंद करण्यात आली होती, तर बलात्काराचे ७९ गुन्हे दाखल होते. या गंभीर गुन्ह्य़ांचे प्रमाण २०१६ मध्येही वाढले आहे. जानेवारी २०१६ ते सप्टेंबर २०१६ या नऊ महिन्यांच्या गुन्ह्य़ांची आकडेवारी चिंताजनक आहे. या नऊ  महिन्यांत ३२ हत्या, १२ हत्येचा प्रयत्न, ९ दरोडे, ९४ जबरी चोरी, ८० घरफोडी (दिवसा) २२४ रात्रीच्या घरफोडय़ा, ७५ बलात्कार, ९२ विनयभंग आणि ६१ सोनसाखळी चोरीच्या घटना घडलेल्या आहेत

गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक चाळमाफिया आणि अनधिकृत बांधकामांच्या व्यवसायात शिरले आहेत. लोकांची फसवणूक करून घरे बांधत आहेत. त्यामुळेच मुंबईतला सर्वसामान्य माणूस त्यांच्याकडे चकरा मारत असतो. या दहशतीच्या जोरावर आणि पैसे चारून हे माफिया कोटय़धीश झाले आहेत. पालिका आयुक्तांनी सुरू केलेल्या धडक कारवाईनंतर या माफिया बिल्डरांची पळापळ झाली आहे. दीडशेहून अधिक बिल्डरांवर गुन्हे दाखल आहेत. मात्र पोलिसांच्या आशीर्वादानेच हे बिल्डर सक्रिय होते. अनधिकृत बांधकाम असलेल्या चाळी आणि इमारतीमधील प्रत्येक खोली मागे पोलीस पैसे घेत होते. पोलिसांमुळेच बिल्डर माफिया सक्रिय झाले आहेत. सर्वसामान्य माणूस तक्रारी घेऊन आला की पोलीस त्याला हाकलून लावत बिल्डरांची मदत करत असताना दिसून येत होते (अपवाद वगळता).

पोलिसांकडे अपुरे मनुष्यबळ आणि साधनसामग्री नाहीत हे जरी मान्य केले तर अनेक प्रकरणात पोलिसांचा निष्क्रिय तपास दिसून येत आहे. सात महत्त्वाच्या हत्यांचा उलगडा झालेला नाही. कोठडीतून आरोपी पळून गेलेले आहेत. अमली पदार्थाचा व्यवहार शहरात वाढलेला आहे. त्यावर कुणाचे नियंत्रण नाही. अजूनही तुरुंगात असलेल्या गुंड टोळ्या वसईतील बांधकाम व्यावसायिकांकडून खंडणी वसूल करत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी  रेतीमाफियांवर कारवाई केली, तेव्हा आम्ही चोर आहोत पण आमच्याकडून पैसा घेणारे पोलीसपण तेवढेच चोर असून त्यांच्यावरही कारवाई करा, अशी जाहीर मागणी करत त्यांनी रास्ता रोको केला होता. रवी पुजारीसारखे गुंड वसईत सक्रिय झाले आहेत. ते खंडणीसाठी हॉटेल आणि बांधकाम व्यावसायिकांना धमकावत आहेत. या गुंडांचे लोकल कनेक्शन पोलीस उद्ध्वस्त करू शकलेले नाही. वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे महिलांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे.

साधनसामग्रीची कमतरता

पूर्वीच्या ठाणे जिल्ह्य़ाची भौगोलिक रचना अवाढव्य होती. जव्हार-मोखाडासारखे आदिवासी तालुके, पालघर, डहाणू, वसईची किनारपट्टी आणि जंगलपट्टीचा भाग तसेच मीरा-भाईंदर आणि वसई-विरार यांसारखी नव्याने विकसित होत असलेली शहरे ही या जिल्ह्य़ाची रचना होती. पालघर जिल्ह्य़ाची निर्मिती झाल्यानंतर पोलीस दलाची नव्याने रचना होईल, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना होतील, अशी अपेक्षा होती. परंतु मुळात अपुरे मनुष्यबळ, साधनसामग्रीची कमतरता पूर्ण झाली नाही. अगदी दोन महिन्यांपूर्वीपर्यंत पोलिसांना वाहने नव्हती. त्यासाठी पालिकेकडून वाहने विनंती करून मागण्यात आली होती. अद्याप मोटारसायकली नसून त्यासुद्धा पालिकेकडून मागविण्यात आल्या आहेत. पालघर पोलिसांकडे श्वान पथक, बॉम्बशोधक पथक, अमली पदार्थविरोधी पथक, खंडणीविरोधी पथक अद्याप नाही. त्यामुळे गुन्हेगारांचा माग कसा काढणार असा प्रश्न आहे. शहरात गस्ती घालण्यासाठी बीट मार्शल उपक्रम राबविण्यात आला. महिलांचे दामिनी पथक सुरू करण्यात आले. पण गेल्या तीन महिन्यांपासून पेट्रोल नसल्याने बीट मार्शल पोलिसांच्या गस्ती बंद आहेत. या मोटारसायकली भंगार होऊ  लागल्या आहेत. १९ मोटारसायकली बंद अवस्थेत आजही बीट मार्शल कार्यालयाबाहेर पडलेल्या पाहता येऊ  शकतात.

पोलीस आयुक्तालयाची गरज

ठाणे जिल्हा असल्यापासून भाईंदरच्या उत्तरपासून डहाणूच्या झाई किनाऱ्यापर्यंत सागरी आयुक्तालयाची मागणी करण्यात आली होती. वसईच्या पश्चिमेकडील विस्तीर्ण किनारपट्टीवरून दहशतवादी हल्ल्याचा धोका आहे. यापूर्वी मुंबई शहरात हल्ला करणारे याच सागरी मार्गाने आले होते. त्यामुळे सागरी पोलीस आयुक्तालय निर्माण करणे आवश्यक होते. निर्भय जनमंच या संघटनेने त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. या प्रस्तावाला अंतिम मंजुरीदेखील मिळाली होती. परंतु जिल्हा विभाजन झाले आणि हा प्रस्ताव बारगळला. मीरा-भाईंदर शहर ठाणे ग्रामीण मध्ये गेले. तर वसई विरार शहर पालघर जिल्ह्य़ात गेले. मात्र पालघर जिल्ह्य़ात जाऊनही काही बदल झाला नाही. अपुरे मनुष्यबळ, अपुरी साधनसामग्री यांची कमतरता होती. लोकसंख्या झपाटय़ाने मात्र वाढत आहे. पालघर जिल्हा नवीन होती. सर्वच पोलीस दलाची नव्याने उभारणी करायची होती. जिल्ह्य़ाच्या पोलीस अधीक्षिका शारदा राऊत यांनी हे आव्हान घेतले आणि एकापाठोपाठ एक प्रस्ताव सुरू केले. त्यांनी वसईत तीन नवीन पोलीस ठाणे तसेच दोन विभागीय पोलीस उपअधीक्षकांची नेमणूक करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. बोळींज, कामण आणि जुचंद्र अशा तीन पोलीस ठाण्यांचा हा प्रस्ताव आहे. त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवता येईल असा त्यांना विश्वास आहे.

पोलीस अधीक्षिकांच्या प्रयत्नांना आज ना उद्या यश येईल, परंतु शहरातील पोलिसांनीही त्याच तत्परतेने गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यास प्रयत्न करणे तेवढेच गरजेचे आहे.