मुंबईतल्या एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या शगुफ्ता खान नावाच्या महिलेची हत्या झाली होती. मारेकऱ्याचं नाव समजलं पण बाकी काहीच माहिती नव्हती. वेळ अत्यंत कमी होता, कारण मारेकरी देश सोडून गेला असता तर कधीच हाती लागला नसता. मुंबई गुन्हे शाखेने त्याला पकडण्यासाठी ‘मिशन २४ तास’ची आखणी केली. केवळ तर्क आणि अंदाजाचा सारा खेळ होता..

मालाडच्या रायव्हिरा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या शगुफ्ता खान (३८) या महिलेची भरदुपारी चाकूचे वार करून हत्या झाली होती. तिची हत्या करून मारेकऱ्याने घरातील ७० लाखांचे दागिनेही लंपास केले होते. मारेकरी बाहेर पडत असताना शगुफ्ताच्या दोन लहान मुली नेमक्या घरात येत होत्या. मारेकऱ्याने त्यांनाही मारण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रसंगावधान दाखवत ११ वर्षांच्या रियाने बहिणीसह दुसऱ्या खोलीत धाव घेतली आणि त्यांचे प्राण वाचले. हा मारेकरी आरामात जिन्याने खाली उतरला. बाहेर उभ्या केलेल्या रिक्षातून पसार झाला.

या हत्येने एकच खळबळ उडाली होती. मालाड पोलीस, गुन्हे शाखा ११चे पथक घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्हीत मारेकरी दिसत होता, पण कोण होता याची माहिती नव्हती. मग शगुफ्ताच्या मुलीने रियाने माहिती दिली. तो मारेकरी गुड्डू अंकल होता. गुड्डू पूर्वी त्यांच्या घरी येत असायचा, पण त्याची काहीच माहिती नव्हती. या गुड्डूची माहिती काढल्याशिवाय पुढचा तपास करता येणार नव्हता. त्याची माहिती काढण्यासाठी पोलिसांनी खबऱ्यांना कामाला लावलं. गुड्डू ऊर्फ अरविंद गुप्ता (२८) असे त्याचे नाव होते. गुड्डूची कुंडली तयार होऊ  लागली. गुड्डू हा मॅकडोनाल्डमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून कामाला होता. गोरेगावला तो आई-वडील आणि तीन भावांसह राहत होता. नंतर तो रिक्षा चालवू लागला. हे कामही त्याने सोडलं होतं. दरम्यान, त्याची गोरेगावच्या सीटी मॉलमधील सिराज खान याच्याशी ओळख झाली. सिराजचे मोबाइलचे दुकान होते. तेथे गुड्डू सिराजसाठी काम करू लागला. सिराजच्या दुकानात शगुफ्ता येत होती. तेथे सिराज आणि शगुफ्ताचे सूत जुळले होते. दोघांनी निकाह केला होता. सिराज क्रिकेटवर बेटिंग करायचा. ते पैसे तो गुड्डूच्यामार्फत शगुफ्ताच्या घरी नेऊन देत होता. त्यामुळे शगुफ्ताच्या मुली त्याला गुड्डू अंकल म्हणून ओळखत होत्या. शगुफ्ता कधी कधी गुड्डूला पैसे देत होती.

पोलीस पथक गुड्डूच्या गोरेगावच्या येथील मूनलाइन सोसायटीत पोहोचले, पण त्याने काही महिन्यांपूर्वीच घर सोडले होते आणि कुटुंबीयांशी संबंधही तोडले होते. पोलिसांनी त्याचे छायाचित्र मिळवले. त्याचा माग काढण्याच्या कामाला पोलीस यंत्रणा लागली. सिराजकडे पण चौकशी केली, पण त्यालासुद्धा आता गुड्डूबद्दल काहीच माहिती नव्हती. पोलिसांच्या खबऱ्यांनी माहिती मिळवली. गुड्डू एका बांगलादेशी वेश्येच्या प्रेमात पडला आहे. तिचं नाव होतं मिश्ती काझी. दोघे लग्न करणार होते. हीच मिश्ती आपल्याला गुड्डूपर्यंत पोहोचवू शकेल, अशी पोलिसांना खात्री वाटली. पोलिसांनी मिश्तीचा शोध सुरू केला.

पोलिसांना गुड्डूला तात्काळ पकडायचे होते. तो कुठे जाऊ  शकतो याचा तर्क लावला. पोलिसांकडे काही ठोस माहिती किंवा पुरावा नव्हता. गुड्डच्या हल्ली संपर्कात असणारे कुणी नव्हते. मग केवळ ह्य़ुमन इंटेलिजन्सचा आधार होता. ह्य़ुमन इंटेलिजन्स म्हणजे केवळ अनुभवातून आलेले तर्क लावून तपास करणे. गुड्डू कुठे जाऊ  शकतो याचा पोलिसांनी तर्क लावला. उत्तर प्रदेशात जरी तो गेला असता तरी पोलिसांनी त्याला पकडले असते, त्यामुळे तो बांगलादेशात जाण्याची शक्यता जास्त होती. कारण मिश्ती ही बांगलादेशात राहत होती. बंगालच्या सीमेवरून एजंट बांगलादेशाच्या हद्दीत प्रवेश मिळवून देतात ही माहिती पोलिसांनी काढली. गुड्डू जर या मार्गाने बांगलादेशात निसटला असता तर कधीच हाती लागला नसता. पोलिसांनी ‘मिशन २४ तास’ची आखणी केली. गुन्हे शाखा ११चे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश सावंत, पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव, हितेंद्र विचारे, शरद झिने आदींनी व्यूहरचना तयार केली. गुड्डूला कुठेही पळून जायचे असेल तर केवळ ट्रेनने गेला असता. वांद्रे टर्मिनस, दादर टर्मिनस आणि सीएसटी टर्मिनसला पोलिसांनी सापळा लावला. त्यांनी त्याचा मोबाइल क्रमांक मिळवला, पण तो वांद्रे येथून बंद झाला होता. म्हणजे पोलिसांचा अंदाज खरा ठरत होता. त्यामुळे लगेच पोलिसांचे पथक कोलकात्याला रवाना झाले. पोलिसांनी लावलेल्या तर्कानुसार तो ट्रेनने कोलकात्यासाठी रवाना होणार होता.

पोलीस पथक कोलकात्यात पोहोचले. त्यांनी सापळा लावला. जर नजर चुकली असती तर गुड्ड निसटला असता. हावडा ब्रिज रेल्वे स्थानकावर साध्या वेषातील पोलीस त्याचे छायाचित्र घेऊन बसले होते. काहीच ठोस माहिती नव्हती. केवळ तर्क आणि विश्वास या जोरावर त्यांनी हा निर्णय घेतला होता. अखेर पोलिसांचा तर्क खरा ठरला. हावडा मेलने तो उतरला. पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांचे ‘मिशन २४ तास’ यशस्वी झाले.

अरविंद मिश्तीच्या प्रेमात पडला होता. तिच्यासोबत त्याला लग्न करायचे होते आणि कायमस्वरूपी बांगलादेशात स्थायिक व्हायचे होते. त्यासाठी पैशांची आवश्यकता होती. हे पैसे कसे मिळवायचे याचा तो विचार करत होता. तेव्हा त्याला शगुफ्ता आठवली. शगुफ्ता गुड्डूसाठी सॉफ्ट टार्गेट होती. तिच्याकडे खूप पैसा होता हे त्याला माहिती होते. ती दोन मुलींसह राहात होती. त्यामुळे तिची हत्या करायची आणि थेट भारतातून पसार व्हायचे, अशी त्याने योजना आखली होती. ठरविलेल्या योजनेप्रमाणे त्याने दुपारी शगुफ्ताच्या घरी प्रवेश केला. गुड्डू नियमित येत असल्याने इमारतीच्या सुरक्षारक्षकाने अडविले नाही. शगुफ्ताने त्याला घरात घेतले. त्या वेळी त्याने पैसे मागण्याचे निमित्त केले. शगुफ्ताने नकार दिला. सोबत आणलेल्या चाकूने त्याने शगुफ्ताच्या गळ्यावर वार केला. कपाटातील दागिने आणि रोख रक्कम काढून बॅगेत भरली. नेमक्या त्याच वेळी त्याच्या दोन मुली आल्या होत्या. गुड्डू त्यांनादेखील मारणार होता, पण त्या छोटय़ा मुलीच्या प्रसंगावधानाने त्या बचावल्या.

गुड्डूने रिक्षातच रक्ताळलेले कपडे बदलले. विलेपार्ले येथून मित्राकडून नवीन मोबाइल घेतला आणि ट्रेनने वांद्रे येथे गेला. संध्याकाळी साडेसहाची हावडा मेल पकडून कोलकात्यासाठी रवाना झाला होता. या हत्येची योजना त्याने तीन महिन्यांपूर्वी बनवली होती. त्यासाठी त्याने कुटुंबीय आणि मित्रांशी संपर्क तोडला होता. त्यामुळे त्याच्याबद्दल कुणाला फारशी माहिती नव्हती. पोलीस आपल्याला पकडायला फार तर गावी उत्तर प्रदेशात जातील, असा त्याचा कयास होता. परंतु पोलीस तर्काच्या आधारे त्याच्यापर्यंत पोहोचले. पोलिसांना जराही उशीर झाला असता, तर बांगलादेशात पसार झाला असता.