मुलुंड कचराभूमीत कचरावेचकांना गोणीत एका महिलेचा मृतदेह मिळाला आणि परिसरात खळबळ माजली. नवघर पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर गुन्ह्य़ाची नोंद होऊन तपासाला सुरुवात झाली. ही महिला कोण, तिची कोणी व का हत्या केली, हा गुंता पोलिसांपुढे होता. गुन्हे शाखा कक्ष ७ चे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. अत्यंत क्लिष्ट अशा प्रकारच्या या गुन्ह्य़ाचा तपास करायचा तरी कसा, याची चर्चा कक्षातील अधिकाऱ्यांमध्ये झाली. मग अत्यंत नियोजनबद्ध तपासाला सुरुवात करून अवघ्या चार दिवसांत पोलिसांनी या गुन्ह्य़ाची उकल केली.

१४ सप्टेंबर २०१४ सालची सायंकाळची वेळ होती. मुलुंड कचराभूमीवर एकामागून एक ट्रक येऊन संपूर्ण शहरातील कचरा रिकामा करत होते. कचरा वेचणारी मुलेही कचराभूमीवर फिरत होती. एका मुलाला एक गोणी दिसली. त्यात काय आहे हे पाहावे म्हणून तो पुढे सरसावला, गोणी उघडतो तर काय, त्यात एका महिलेचा मृतदेह आढळून आला. कचराभूमीतील कर्मचाऱ्यांनी तातडीने नवघर पोलिसांना त्याची माहिती दिली. पोलिसांचे पथक त्या ठिकाणी धडकले. कचरावेचक मुलाची चौकशी केल्यानंतर रोज येणाऱ्या गाडय़ांमधील गोणीतूनच हा मृतदेह आल्याचे पोलिसांना समजले.

गुन्हे शाखा कक्ष सातचे तात्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय सुर्वे यांनी तपासाला सुरुवात केली. घटनास्थळावर जाऊन पाहणी केल्यानंतर तपासाला नेमकी सुरुवात कशी करायची, याचा खल सुरू झाला. महिलेची ओळख पटविण्यात फार वेळ घेतला तर कदाचित गुन्हेगार निसटून जायचा आणि महिलेची ओळख पटली नाही तर नेमकी ती राहते कुठे हेही कळायचे नाही. अखेर, दोन ते तीन पातळ्यांवर हा तपास करण्याचे ठरले. राजावाडी रुग्णालयात महिलेचे शवविच्छेदन झाल्यानंतर तिच्या मृत्यूला दोन दिवसांपेक्षा जास्त अवधी झाला नसल्याचा अहवाल पोलिसांच्या हाती आला. तसेच तिला मृत्यूआधी बेदम मारहाण करण्यात आली असून त्यानंतर विषप्रयोग करून मारल्याचे स्पष्ट झाले. कक्ष सातच्या अधिकाऱ्यांनी कचराभूमीत कोणकोणत्या भागातून कचरा आणून टाकला जातो याची माहिती घेतली. १४ सप्टेंबरआधीच्या तीन दिवसात जितके ट्रक कचराभूमीत आले, त्यांची माहिती घेऊन त्यांचा माग काढला जाऊ लागला.

दरम्यान, सुर्वे यांनी त्यांच्या खबऱ्यांना मुंबईभर माग काढण्यास सांगितले, तर कचराभूमीतील घनकचरा व्यवस्थापनाच्या कामात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या चौकशीला सुरुवात केली. शेकडो कर्मचारी, हमाल व कचरा वेचणाऱ्या व्यक्तींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही गोणी धारावी परिसरातून आली असावी, अशा निष्कर्षांपर्यंत पोहोचले. पोलिसांनी मग महिलेची ओळख आणि रहिवासाचा पत्ता शोधण्याच्या कामाला सुरुवात केली. पथकाने धारावी परिसरात मृत महिलेचे छायाचित्र दाखवत घरोघरी जाऊन चौकशीला सुरुवात केली. गणेशोत्सवाचा काळ होता, त्यामुळे सायंकाळच्या वेळेस रहिवासी ठिकठिकाणी असलेल्या गणेशोत्सवाच्या मंडपात जमत. तिथे पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली. १८ सप्टेंबरच्या रात्री एका मंडळातील कार्यकर्त्यांने मृत महिलेसारखी एक महिला जवळच राहात होती, पण ती दोन-तीन दिवसांपूर्वी हरविल्याची माहिती दिली. पोलिसांचा संशय बळावला. महिलेचा पती सगळ्यांना, जीवदानीला जाताना वांद्रे रेल्वे स्थानकातून ती हरविल्याचे सांगत असे. पतीची चौकशी करण्याआधी पोलिसांनी वांद्रे रेल्वे पोलीस आणि पूर्व-पश्चिम दोन्हीकडील पोलीस ठाण्यांमध्ये महिला हरविल्याची तक्रार आहे का, हे तपासले. मात्र, कुठेही त्या महिलेच्या हरविल्याची तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती. पोलिसांनी मग महिलेच्या पतीला ताब्यात घेण्याचे ठरवले.

संजयकुमार गौतम (वय २८) हा अतिशय किरकोळ यष्टीचा तरुण होता. व्यवसायाने िशपी. त्याला पोलिसांनी चौकशीला बोलावल्यानंतर अतिशय थंडपणे तो येऊन पोलिसांना उत्तरे देऊ लागला. पत्नी राधादेवी विरारच्या जीवदानी मंदिर येथे जात असताना लोकलमध्ये हरविल्याचे सांगत होता. पथकाने संजयकुमार याच्या सखोल चौकशीला सुरुवात केली. पण पत्नी हरविल्याचीच कथा तो सातत्याने सांगत होता. पण त्याला पत्नी हरवून आठवडा उलटला तरी त्याची तक्रार का केली नाही, असे विचारल्यावर त्यावर त्याचे समाधानकारक उत्तर त्याच्याकडे नव्हते. आमच्यात सतत भांडणे होत म्हणून ती रागावून गेली असावी, ती पुन्हा घरी परतेल, म्हणून मी कुठे तक्रार केली नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे तो देऊ लागला.

पोलिसांनी मग पुन्हा वेगळ्या पद्धतीने तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी त्याच्या वैवाहिक जीवनाबद्दल विचारपूस करण्यास सुरुवात केली. मूळचा उत्तर प्रदेशचा असलेल्या संजयकुमारने दीड महिन्यापूर्वीच पत्नीला आपल्या धारावीच्या घरी आणले होते. मात्र मुंबईत आणल्यानंतर काही दिवसांतच तो तिच्यावर संशय घेऊ लागला होता. त्यावरून संजय तिला सतत मारहाण करत असल्याचेही पोलिसांच्या चौकशीत त्याने कबूल केले.

हे सांगता सांगता अखेर त्याने या संशयाच्या भरातच १३ सप्टेंबरच्या मध्यरात्री तिला बेदम मारहाण केली, त्यानंतर जेवणात विष टाकून त्याने तिला मारून टाकले. पत्नी मेल्याचे पाहून तो मध्यरात्र होण्याची वाट पाहात राहिला. मध्यरात्र उलटल्यानंतर त्याने तो मृतदेह आधी प्लास्टिकच्या थलीमध्ये मग गोणीमध्ये बांधून जवळच्या कचऱ्याच्या डब्यात टाकून दिला.

आपल्या पत्नीचे दुसऱ्यांशी अनतिक संबंध होते, म्हणूनच आपण हे कृत्य केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. हत्या करण्यापूर्वी पोलिसांना कळलेच तर कशाप्रकारे वागायचे याची पूर्ण तयारी संजयकुमारने केली होती. मात्र, वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट पाटील, निरीक्षक संजय सुर्वे, साहाय्यक निरीक्षक अनिल ढोले, सपना क्षीरसागर, संतोष मस्तुद, उपनिरीक्षक संजय सुर्वे यांच्या पथकांनी अहोरात्र मेहनत करून अवघ्या चार दिवसांत या क्लिष्ट गुन्ह्य़ाची उकल केली. या तपासासाठी कक्ष सातला सप्टेंबर २०१७चे सर्वोत्तम तपासाचे आयुक्तांचे पारितोषिकही मिळाले.