ठाणे : म्हाडा गृहसंकुलात स्वस्त किमतीमध्ये घरे मिळवून देतो तसेच रिझव्‍‌र्ह बँकेत नोकरी लावून देतो, असे सांगून फसवणूक करणाऱ्या भामटय़ाला ठाणे खंडणीविरोधी पथकाने शुक्रवारी ताब्यात घेतले.

प्रशांत बडेकर ऊर्फ अरविंद सोनटक्के (४२) असे या आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात मुंबई, पुणे, नागपूर, सातारा, नंदुरबार, औरंगाबाद येथील विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. पुढील कारवाईसाठी त्याला सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.

प्रशांत हा म्हाडा गृहसंकुलात स्वस्त किमतीत घरे देतो तसेच रिझव्‍‌र्ह बँकेत ‘क्लार्क’ पदावर नोकरीला लावून देतो असे सांगून फसवणूक करत असल्याचे तपासात पुढे आले आहे. प्रशांतचे शिक्षण पदव्युत्तपर्यंत पूर्ण झाले आहे. तो कल्याण येथे खासगी शिकवण्या घेतो. गेल्या काही वर्षांपासून त्याने मुंबईत उद्योजक असल्याचा बनाव करून ग्रामीण भागातील अनेक नागरिकांची फसवणूक केली आहे.