बदलापुरात ज्वेलर्समध्ये चोरांकडून वृद्धाची हत्या
प्रतिनिधी, बदलापूर
बदलापूर पश्चिमेतील दिव्या ज्वेलर्समध्ये चोरी करण्यासाठी आलेल्या चोरटय़ांनी ज्वेलर्सलगत राहणाऱ्या नारायण गणपत व्यापारी या ९६ वर्षीय वृद्धाची हत्या केली.
बदलापूर पश्चिमेकडील दिव्या ज्वेलर्स हे दुकान नारायण व्यापारी यांच्या मालकीचे असून त्यांनी ते भाडय़ाने दिले होते. व्यापारी यांचे घर व ज्वेलर्सचे दुकान एका लाकडी फळीने विभागलेले आहे. रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास अज्ञात चोरटय़ांनी मागील बाजूने दुकानात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी घरात एकटे राहणाऱ्या नारायण व्यापारी यांनी त्यांस विरोध केला असता चोरटय़ांनी धारदार हत्याराने त्यांच्या शरीरावर वार केले आणि त्यानंतर उशी व गादीने नाक-तोंड दाबून त्यांची हत्या केली. त्यानंतर चोरटय़ांनी ज्वेलर्समधील सोन्याचा मुलामा असलेले १० हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. सकाळी नारायण व्यापारी यांचा पुतण्या नेहमीप्रमाणे त्यांना जेवणाचा डबा घेऊन आला असता हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर पोळेकर यांनी दिली.

दिवा येथे लग्नाच्या वादातून तरुणीची हत्या

ठाणे : दिवा येथील सद्गुरूनगर परिसरात रविवारी रात्री स्वप्नाली संतोष घाडी या १८ वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी अमर देवानंद पाटील (२०) या तरुणाला मुंब्रा पोलिसांनी अटक केली. दोघांमध्ये लग्न करण्यावरून झालेल्या वादातून ही घटना घडल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. अमरने स्वप्नालीच्या मानेवर, गळ्यावर आणि हाताच्या पंजावर चाकूने वार केल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. स्वप्नाली आणि अमर यांचे एकमेकांवर प्रेम होते. स्वप्नाली त्याच्याकडे लग्नाचा आग्रह धरत होती. मात्र, अमर तिला काही कारणास्तव लग्न नंतर करू, असे सांगत होता. यातून झालेल्या वादातून त्याने तिचा खून केला, अशी माहिती पोलीस निरीक्षक पी. एम. पाटील यांनी दिली.

खंडणी मागणाऱ्यांवर गुन्हा
ठाणे : माजिवाडा गाव येथे राहणारे डॉ. रुपा नायर यांच्याकडे खंडणीखोरांनी पुजारी गँगचा सदस्य असल्याचे सांगत दोन लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास नायर यांच्या कुटुंबीयास जीवे ठार मारण्याची धमकीही या खंडणीखोरांनी दिली. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केली आहे.

घरफोडीच्या घटनांत वाढ
कल्याण : उसरघर गावात राहणारे भालचंद्र संते हे ३१ मे रोजी रात्री कामावर गेले असता चोरांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडूून सोन्याची माळ व रोख रक्कम चोरली. याच गावातील राजेश मढवी यांच्या घराच्या किचनमधील खिडकीची ग्रील तोडून चोरांनी मोबाइल, रोख रक्कम, सोन्याचा हार, साडय़ा चोरल्या. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पूर्वेतील चिंचपाडा रोड येथे राहणारे मोहन जोशी हे घरी नसताना चोरटय़ाने शुक्रवारी सकाळी त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून घरातील दोन लाख २१ हजाराचा ऐवज चोरला. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

निर्घृण खून
डोंबिवली : पूर्वेतील खंबाळपाडा परिसरात झुडपामध्ये एका ३५ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला. या व्यक्तीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहनांची चोरी
ठाणे : क़ळवा-खारेगाव येथे राहणारे ललीत रावल यांच्या घराजवळून ७० हजार रुपये किमतीची मोटारसायकल चोरटय़ांनी चोरून नेली. अल्मेडा रोडवरील चंदनवाडी येथे राहणारे बबन शेवाळे यांची साडे चार लाखाची कार पार्क चोरटय़ांनी चोरून नेली.

कारटेप चोरीच्या घटनांत वाढ
डोंबिवली : मानपाडा रोड येथे राहणारे प्रकाश गांधी यांनी त्यांची कार ३१ मे रोजी रात्री घराखाली पार्क केली असता अनोळखी व्यक्तीने त्यांच्या कारच्या दरवाजाची काच फोडून कारटेप, एसी कंट्रोल पॅनल, म्युझीक पॅनल चोरले. याप्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. स्टार कॉलनीमसमोर विनायक दर्शन इमारतीत राहणारे विनायक पाटील यांच्या कारमधून चोरटय़ाने कारटेप चोरी केला. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

हातगाडी व ट्रकवर कारवाई
ठाणे : तीनहात नाका येथे नागेश गोरे यांनी सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीने ट्रक उभा केला. त्यामध्ये १९ फुट लांबीचे १० टन लोखंडी पाईप होते. त्याविरोधात वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आयटी पार्क येथे रस्त्यावर हातगाडी उभी करून नागरिकांना अडथळा निर्माण केल्याप्रकरणी राजेश बाईन व शंकर जाधव यांच्यावर वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.