मुंब्रा : येथील अमृतनगर भागातील नूरजहाँ सोसायटीत एका व्यक्तीला बंदुकीचा धाक दाखवून तिघा चोरटय़ांनी त्याची रिक्षा चोरून नेल्याची घटना मंगळवारी घडली. मंगळवारी रात्री शेवटचे भाडे सोडून ते घरी परतत होते. त्या वेळी कब्रस्थानसमोरील रस्त्यावर आसिफ अली मुश्ताक, मोहम्मद सैय्यद, मोहम्मद खान या तिघांनी त्यांची रिक्षा अडवली. बंदुकीचा धाक दाखवून त्यांना रिक्षातून बाहेर खेचले आणि त्यानंतर त्यांची रिक्षा चोरून नेली. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीड लाखांचे दागिने चोरले
ठाणे : मुंबईहून ठाण्यात काही कामानिमित्त आलेल्या एका ६० वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी आणि मंगळसूत्र चोरटय़ांनी खेचून नेल्याची घटना सोमवारी घडली. दहिसर भागात ही महिला राहत असून ती ठाण्यात काही कामानिमित्त आली होती. राम मारुती रोडवरील शुभंकरोती सभागृहासमोर त्या रिक्षाची वाट पाहात उभ्या होत्या. त्या वेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरटय़ांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे दीड लाख रुपये किमतीची सोनसाखळी व मंगळसूत्र खेचून पोबारा केला. नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वृद्धेचे मंगळसूत्र खेचले

डोंबिवली : पूर्वेतील गीतांजली सोसायटीत राहणाऱ्या एका सत्तर वर्षीय महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरटय़ांनी खेचल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या महिलेचा सहा वर्षांचा नातू स्वानंद हा मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये शिकत असून त्याला शाळेतून घरी आणण्यासाठी ही महिला रस्त्याने जात होती. त्या वेळी जैन मंदिराच्या पाठीमागील गल्लीत त्या जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोघांपैकी एक चोरटा खाली उतरला आणि त्याने तिचे केस ओढून तिच्या गळ्यातील सत्तर हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र खेचले. त्यानंतर मोटारसायकलवरून दोघा चोरटय़ांनी पोबारा केला. या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.