सहा वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी जेरबंद

निवडणूक काळात प्रतिबंधात्मक नोटिसा बजावण्यासाठी गेलेल्या माणिकपूर पोलिसांना चक्क एका हत्येचा उलगडा झाला. हत्या करून तब्बल सहा वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी पोलिसांना अनपेक्षितरीत्या सापडला.

एप्रिल २०१३ मध्ये वसईत राहणाऱ्या भरत वाघेला या तरुणाचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. गळा आवळून त्याची हत्या करण्यात आली होती. प्रेमसंबंधातून त्याची हत्या झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले होते. हत्या झालेल्या भरत याचे ज्या मुलीशी प्रेमसंबंध होते, त्या मुलीचा एक नातेवाईक अमोल राजपूत याला हे प्रेमप्रकरण समजले होते. त्यामुळे राग आल्याने त्याने भरतची हत्या करण्याची योजना बनवली होती. अमोलने या योजनेत उमेश वाघेला याला सहभागी करून घेतले आणि दोघांनी मिळून भरत वाघेलाची हत्या केली. पोलिसांनी उमेशला त्यावेळी अटक केली होती, मात्र मुख्य आरोपी अमोल राजपूत पोलिसांना गुंगारा देत पसार झाला होता. सहा वर्षांपांसून माणिकपूर पोलीस त्याचा शोध घेत होते.

सध्या निवडणुकीच्या निमित्ताने पोलीस उपद्रवमूल्य असलेल्या अनेकांना प्रतिबंधात्मक नोटिसा पाठवत आहे. अशीच नोटीस बजावण्यासाठी पोलीस एका व्यक्तीकडे गेले होते. त्याने नोटीस बजावू नका, असे सांगून चांगल्या वर्तनाची हमी दिली. त्यावर पोलिसांनी काहीतरी चांगली माहिती दिली तर नोटीस बजावणार नाही, असे सांगितले. त्या व्यक्तीने मग हत्या करून फरार झालेल्या अमोल राजपूतची माहिती दिली. २०१३ मध्ये अमोल हत्या करून बिहारला जाऊन राहात असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. या अनपेक्षित माहितीने पोलिसांना सुखद धक्का बसला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी लगेच बिहारला पथक पाठवून आरोपी अमोल राजपूत याला अटक केली.

२०१३मध्ये वाघेलाची हत्या करून फरारी झालेला अमोल बिहारमध्ये नाव बदलून राहात होता. अनपेक्षित पोलीस दाराशी आल्यानंतर तो गडबडला. सुरुवातीला त्याने ‘तो मी नव्हेच’चा पवित्रा घेतला. मात्र पोलिसांनी इंगा दाखवताच त्याने हत्येची कबुली दिली. त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलीआहे.

अमोल राजपूतची माहिती मिळणे हा आमच्यासाठी सुखद धक्का होता. निवडणूक काळात आम्ही नियमित नोटिसा बजावत असतो. या व्यक्तीला नोटीस बजावणार होतो, पण त्याने नोटीस न बजवण्याच्या अटीवर हत्येच्या फरार आरोपीबद्दल ही माहिती दिली. खात्री करून आरोपी अमोल राजपूत याला अटक केली. – राजेंद्र कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, माणिकपूर