News Flash

गुन्हे रोखण्यासाठी पोलीस सक्रिय

५ पोलीस निरीक्षक असलेले तुळींज हे एकमेव पोलीस ठाणे बनले आहे

नालासोपाऱ्यामध्ये प्रतिबंधात्मक कक्ष स्थापन, नवीन पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती

वसई : नालासोपारा शहरातील वाढती गुन्हे रोखण्यासाठी तुळींज पोलीस ठाण्यात आणखी तीन पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जुन्या गुन्हेगारांची यादी तयार करून त्यांना पोलीस ठाण्यात हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे.

नालासोपारा पूर्वेला असलेले तुळींज पोलीस ठाणे हे गुन्हेगारीचे केंद्रबिंदू बनले आहे. तुळींज पोलीस ठाण्यात २२ अधिकारी आणि १३७ कर्मचारी आहेत. लोकसंख्या लाखोच्या घरात आहे. आतापर्यंत ३ महिन्यांत ९ हत्या घडल्या आहेत. एकाच महिन्यात ७ हत्या तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून नालासोपारा पूर्वेच्या तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या वाढत्या गुन्ह्यामुळे पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले असून रोखण्यासाठी  विविध उपायोजना करण्यात येत आहेत.

गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवता यावे आणि तपास जलदगतीने व्हावा यासाठी मीरा भाईंदर वसई विरारच्या पोलीस आयुक्तांनी तुळींज ठाण्यासाठी ३ पोलीस निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यातील एकूण पोलीस निरीक्षकांची संख्या आता ५ एवढी झाली आहे. ५ पोलीस निरीक्षक असलेले तुळींज हे एकमेव पोलीस ठाणे बनले आहे. नव्याने आलेल्या पोलीस निरीक्षकांना तुळींज, आचोळे आणि संतोष भुवन येथील बीट देण्यात आले आहे.

उपद्रव निर्माण करणाऱ्या तसेच कायदा सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या लोकांवर वचक ठेवण्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक पथक स्थापन केले आहे. या पथकाने प्रतिंबधात्मक कारवाईच्या कलम ११० आणि ५६ अंतर्गत नोटिसा पाठविण्यास सुरुवात केली आहे. शहरातील नशेबाजांची तसेच जुन्या गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली असून त्यांना दर आठवड्याला हजेरी लावणे बंधनकारक केले आहे. शांतता भंग करणाऱ्या आणि कायदा सुव्यवस्थेला अडथळा निर्माण करणाऱ्या ४५ नशेबाज आणि २३ जुन्या गुन्हेगारांची ही यादी तयार करण्यात आली आहे.

शहरातील गस्ती आता मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येणार आहे. सध्या तुळींज पोलिसांकडे २ चारचाकी वाहने आहेत. दुचाकींची संख्यादेखील वाढविण्यात येणार असून प्रत्येक बीटमध्ये २४ तासांच्या पाळीत प्रत्येक दोन-दोन बीट मार्शल गस्त घालणार आहेत.

तडीपारीचा प्रस्ताव आणि कोम्बिंग ऑपरेशन

नालासोपारा पूर्वेला मोठ्या प्रमाणात अनधिकृत वसाहती वाढल्या आहेत. या वसाहती गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनले आहेत. परराज्यातून आलेले अनेक गुंड या वसाहतीत राहत आहेत. यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कोम्बिंग ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय अभिलेखावरील सराईत गुन्हेगारांना शहरातून हद्दपार करण्यासाठी तडीपारीचे प्रस्ताव तयार करण्यात येत आहेत. आतापर्यंत ३ गुंडांच्या तडीपारीचे प्रस्ताव तयार करण्यात आले असून ते उपविभागीय अधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत.

वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी आम्ही प्रभावी उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. शहरातील गस्ती वाढविण्यात आल्या असून प्रतिबंधात्मक नोटिसा देणे, गुंडाच्या तडीपारीचे प्रस्ताव तयार करण्यात येत आहेत. शहरात कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले जाणार आहे. – राजेंद्र कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुळींज

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2021 12:02 am

Web Title: crime news police crime akp 94
Next Stories
1 महिनाभरात पालिकेची १६ लाख दंडवसुली
2 दंड निश्चिाती, पण वसुली शून्य
3 प्रदूषण रोखण्यासाठी ३२ कोटी
Just Now!
X