ठाणे पोलिसांची यंदा निराशाजनक कामगिरी
ठाणे पोलीस दलातील काही वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या अनियमिततेची वेगवेगळी प्रकरणे गाजत असतानाच गेल्या सात महिन्यांत जबरी चोरी, घरफोडी तसेच चोऱ्या यांसारख्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. मात्र या गुन्ह्यांचा शोध लावण्याचे प्रमाण जेमतेम १८ ते ४० टक्के इतके असून मार्चपर्यंत ही टक्केवारी जवळपास १३ ते २५ टक्के इतकीच होती. या टक्केवारीनुसार गेल्या पाच महिन्यात दाखल गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाणामध्ये पाच ते १५ टक्के इतकीच वाढ झाल्याचे समोर आले आहे.
ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर ही सर्वच शहरे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येतात. या शहरांत जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत जबरी चोरीचे ४०१ गुन्हे दाखल होते, पैकी १०२ गुन्हे उघडकीस आले. घरफोडीचे ४३४ गुन्हे दाखल होते, पैकी ७१ गुन्हे उघडकीस आले. तसेच चोरीचे ९१६ गुन्हे दाखल होते, पैकी १२३ गुन्हे उघडकीस आले. या तिन्ही गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण १३ ते २५ टक्के इतके आहे, तर मार्च ते जुलै या चार महिन्यात जबरी चोरीचे ७९९ गुन्हे दाखल होते, पैकी ३२५ गुन्हे उघडकीस आले. घरफोडीचे ९७० गुन्हे दाखल होते, पैकी २११ गुन्हे उघडकीस आले. तसेच चोरीचे २१५४ गुन्हे दाखल होते, पैकी ४०० गुन्हे उघडकीस आले. गुन्हे उघडकीस आणण्याच्या टक्केवारीमध्ये जेमतेम पाच ते १५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आल्याचे ठाणे पोलिसांच्या संकेतस्थळावरील आकडेवारी सांगते. या आकडेवारीचे पत्र धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना पाठविले आहे.