पोलीस निष्क्रिय, महापालिका प्रशासन हतबल
वसईचे आकर्षण असलेल्या सुरुची बाग समुद्रकिनाऱ्यावर चोरटे आणि गुंडांनी हैदोस घातला आहे. ‘वसईची चौपाटी’ म्हणून प्रसिद्ध असलेले हे पर्यटनस्थळ मद्यपींचा अड्डा झाला आहे. येथे फिरायला येणाऱ्या जोडप्यांना आणि पर्यटकांना मद्यपी आणि गुंड त्रास देत असून काही जोडप्यांना मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत.
वसई पश्चिमेला अथांग पसरलेला समुद्रकिनारा सुरुची बाग या नावाने प्रसिद्ध आहे. येथे असलेल्या सुरुची झाडांमुळे या समुद्रकिनाऱ्याला सुरुची बाग हे नाव पडले आहे. शेकडो वसईकर आणि पर्यटक या समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात, परंतु पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याने या समुद्रकिनाऱ्यावर चोरटे आणि गुंडांनी हैदोस घातला आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना कपडे बदलण्याची सोय व्हावी म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याने लोखंडी कक्ष (चेंजिंग रूम्स) उभारले होते, परंतु चोरटय़ांनी त्याच्या खिडक्या आणि दरवाजे काढून नेले आहेत. त्यामुळे त्याचा वापर होत नाही आणि ते धूळ खात पडले आहे. किनाऱ्यावर जाण्यासाठी पालिकेने लाखो रुपये खर्च करून रस्ता बनवला असून पथदिवे लावले आहे, परंतु चोरांनी पथदिव्यांच्या खांब्यावर चढून दिवे काढून नेले आहेत, तर गटारावरील लोखंडी झाकणेही काढून नेली आहेत. या भागात सुरक्षारक्षकाची नेमणूक केली आहे, परंतु टोळीने येणाऱ्या मद्यपी आणि गुंडांपुढे त्याचे काहीही चालत नाही.
एक कोटीचे सुशोभीकरण
सुरुची बाग समुद्रकिनाऱ्याचे जतन करण्यासाठी पालिकने सुमारे एक कोटी रुपये खर्च करून सुशोभीकरणाची योजना आखली आहे. त्याअंतर्गत किनाऱ्यावर स्वच्छतागृह उभारणे, पिण्याच्या पाण्याची सोय करणे, उद्यान, रस्ते तयार करणे आदींचा समावेश करण्यात येणार आहे.
समुद्रकिनारी फिरायला येणाऱ्यांना मद्यपी आणि गुंडांचा त्रास होत आहे. दोन दिवसांपूर्वी गुंडांच्या टोळक्याने एका मुलीची छेड काढली आणि तिच्या मित्रास मारहाण केली. त्यामुळे या भागात फिरणे धोकादायक आहे. या ठिकाणी पोलीस व जीवरक्षक कधीही तैनात नसतात. पोलिसांना वारंवार गस्त वाढविण्याची विनंती करण्यात आली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
– प्रवीण शेट्टी, प्रभाग समिती सभापती