पालघर जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण २०१६ मध्ये घटले

वाढती गुन्हेगारी आणि ते रोखण्याचे आव्हान बनलेल्या पालघर जिल्ह्यतील पोलिसांनी गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यात यश मिळवले आहे. २०१६ या वर्षांत गंभीर गुन्ह्यंच्या आकडेवारीचा आलेख उतरल्याने पोलिसांना दिलासा मिळाला आहे. २०१५ च्या तुलनेत २०१६ या वर्षांत हत्यांचे प्रमाण २५ने, घरफोडी ११२ने, सोनसाखळी २५ने घटले आहे. विनयभंगाच्या गुन्हे ३६ने कमी झाले असले तर बलात्कार आणि अपघातांचे प्रमाण मात्र वाढले आहे.

ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन तयार झालेला पालघर जिल्हा गुन्हेगारीसाठी सवंदेनशील मानला जातो. गेल्या काही वर्षांंपासून जिल्ह्यत गुन्हेगारीचे प्रमाण सातत्याने वाढत होते. अनेक गुन्हेगारी टोळ्या सक्रिय झाल्या होत्या. पालघर जिल्ह्यात २३ पोलीस ठाणी आहेत. वाढती लोकसंख्या, अपुरे मनुष्यबळ, साधनसामुग्रीची कमतरता आदी विविध समस्यांचा सामना पोलिसांना करावा लागत होता. मात्र २०१६ या वर्षांत पोलिसांना गुन्हेगारीला आळा घालण्यात यश आले आहे. २०१५ च्या तुलनेत २०१६ मधील गुन्हेगारी कमालीची कमी झाली आहे.

vs01

२०१५ मध्ये ९२ हत्या झाल्या होत्या, तर २०१६ मध्ये ६७ हत्या झाल्या आहेत.  २०१५ मध्ये २३२ जबरी चोरी होत्या ते प्रमाण ६६ ने घटून १६६ झाले आहे. इतर चोरीचे १०३ वरून ६२ एवढे कमी झाले आहे. घरफोडीचे प्रमाणही ६३४ वरून ५३१ एवढे कमी झाले आहे. विनयभंगाच्या घटनांमध्ये फारशी घट झालेली नसली तरी त्याचे प्रमाणे २२६ वरून १९० एवढे कमी झाले आहे. सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली होती तसेच ते रोखणे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले होते. त्यात १२९ वरून १०४ वर आणण्यात पोलिसांना यश आले आहे.  गंभीर गुन्हय़ांचे प्रमाण कमी झालेले असले तरी अनेक महत्वाच्या गुन्हय़ांची उकल झालेली नाही. त्यामुळे त्यांची उकल करण्याचे आव्हान पोलिसांसमोर कायम आहे.

गंभीर गुन्हे रोखण्यासाठी पोलीस अधीक्षिका शारदा राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष योजना राबवली होती. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मोक्का लावण्यास सुरुवात केली असून वर्षभरात तब्बल १६ गुन्ह्यंच्या प्रकरणात मोक्का लावण्यात आला आहे. अनेक कुख्यात गुन्हेगार, गुंड टोळ्यांचे सदस्य असे मिळून ८० हून अधिक गुंड मोक्का अंतर्गत तुरूंगात आहेत. आम्ही सोनसाखळी चोरांनादेखील मोक्का लावला आहे. त्यामुळे ही गुन्हेगारी कमी झालेली आहे. पोलिसांनी मोठय़ा प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई केली असून सराईत गुन्हेगांरांना तडीपार केले आहे. त्याचा परिणाम ही गुन्हेगारी कमी होण्यात झाला आहे.

– अशोक होनमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा