लाचप्रकरणी तहसीलदारास अटक
कल्याण : बांधकाम साहित्य पुरविणाऱ्या व्यावसायिकाकडून २५ हजारांची लाच घेताना नायब तहसीलदार अभिजित देशमुख व तलाठी जनार्दन सूर्यवंशी यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहाथ पकडले. कल्याण पश्चिेमतील रामबाग भागात तक्रारदार राहत असून त्यांचा बांधकाम साहित्य पुरवठा करण्याचा व्यवसाय आहे. त्यांनी जमिनीतून १०० ब्रास माती खणन करण्याच्या परवान्याचे काम हाती घेतले होते. या कामासाठी त्यांनी तहसीलदार कार्यालयात आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज केला होता. तसेच त्याची रॉयल्टी भरून परवाना देण्याकरिता देशमुख व सूर्यवंशी यांनी त्यांच्याकडे तीस हजार रुपयांची लाच मागितली. परंतु तडजोडअंती २५ हजार रुपये देण्याचे ठरले. या प्रकरणी त्यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार या विभागाच्या पथकाने सापळा रचून सोमवारी सकाळी ही कारवाई केली.

लाचखोर शिपायाला अटक
भिवंडी : भिवंडी महापालिकेतील जन्म-मृत्यू नोंदणी विभागातील शिपाई एकनाथ जाधव याला पाचशे रुपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. तक्रारदार अयाज मोमीन हे त्यांच्या आजीचे मृत्यू प्रमाणपत्र मिळविण्यासाठी २६ ऑक्टोबर रोजी पालिकेत गेले होते. प्रमाणपत्रासाठी जाधव यांनी त्यांच्याकडे पाचशे रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन लाखांचे कपडे चोरीस
डोंबिवली : पूर्वेतील चिपळूणकर रोडवरील स्मॉल वर्ल्ड या दुकानात रविवारी रात्री चोरी झाल्याची घटना घडली असून दुकानातील दोन लाख रुपये किमतीचे कपडे चोरटय़ांनी चोरून नेले आहेत. रविवारी रात्री दुकान बंद असताना चोरटय़ांनी दुकानाच्या छतावरील सिमेंटचा पत्रा फोडून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर लहान मुलांचे सुमारे दोन लाख रुपये किमतीचे कपडे चोरून नेले. डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.