अंगठीसाठी ज्येष्ठ नागरिकाचे अपहरण

अनाथाश्रमाला देणगी देण्याची बतावणी; डोंबिवलीमध्ये खळबळ
सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या डोंबिवली पूर्वच्या शिवमंदिर भागातील एका ७३ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाचे अपहरण करून त्यांच्या बोटामधील सोन्याची अंगठी लांबविल्याचा प्रकार डोंबिवलीत घडला आहे. चंद्रशेखर लोथे यांचे अपहरण करून त्यांना मुंब्रा परिसरात नेण्यात आले आणि त्यानंतर बोटामधील अंगठी काढून त्यांना सोडण्यात आले. लोथे यांचे अपहरण एका ६५ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने केल्याची तक्रार त्यांनी पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. या घटनेमुळे डोंबिवली परिसरात खळबळ उडाली आहे.
एका व्यक्तीने अनाथश्रमासाठी आर्थिक मदत करतो. आपल्या घरी चला अशी बतावणी करत लोथे यांना मुंब्रा कौसा भागात रिक्षेने निर्जनस्थळी नेत लोथे यांच्या हातामधील सोन्याची अंगठी काढून घेतली. नंतर त्यांना सोडून दिले. तब्बल पंधरा दिवसांपूर्वी डोंबिवली पूर्व भागात शिवमंदिर रस्त्यावर हा प्रकार घडला आहे. रामनगर पोलीस ठाण्यात यासंबंधीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोथे हे शिवमंदिर रस्त्यालगत असलेल्या पुसाळकर उद्यानात सकाळच्या वेळेत फिरण्यासाठी गेले होते. तेथून ते घरी परतत असताना घराजवळ एका ६५ वर्षांची व्यक्ती भेटली. आपण गोव्याहून आलो असून निवृत्त शिक्षक आहे. तेथील सर्व मालमत्ता विकून अडीच कोटी मिळाले आहेत. डोंबिवलीमध्ये स्थायिक व्हायचा विचार असून काही पैसे अनाथालयाला देणार आहे. आपल्या परिचित संस्था असेल तर सांगा, अशी विचारणा त्या व्यक्तीने लोथे यांच्याजवळ केली. लोथे यांनी वनवासी आश्रमाला हा निधी द्यावा, असे सुचविले. सदर व्यक्तीने आपण धनादेश पुस्तिका घरी विसरल्याचे व एक अर्ज पण भरून द्यावा लागेल, असे सांगत आपल्यासोबत शिळफाटा, दत्तमंदिरा जवळील घरी येण्याची विनंती केली.
यानंतर लोथे यांना एका रिक्षेत घेऊन ही व्यक्ती गप्पा मारीत शिळफाटा चौकातून रिक्षा कौसा-मुंब्रा या दुर्गम भागात आली. लोथे यांना संशय आल्याने त्यांनी संबंधिताला विचारले तर त्याने घर आतल्या बाजूला आहे, असे सांगितले. एका महाविद्यालयाजवळ लोथे यांना रिक्षेतून उतरवण्यात आले. नंतर थोडे पुढे चालत नेल्यावर तेथे धमकावत लोथे यांच्या बोटातील अंगठी काढून घेतली.

खर्चासाठी पैसे देण्याचा प्रयत्न
यानंतर धनादेश मिळणार नसल्याचे सांगून लोथे यांना तेथून निघण्यास सांगितले. तसेच त्याने ५० रुपये देण्याचा प्रयत्न केला. ते लोथे यांनी नाकारले. लोथे यांच्या खिशात ७० रुपये होते. कौसाहून शिळफाटा चौक तेथून वाशी बसने डोंबिवलीत आले. घडलेला सर्व प्रसंग त्यांनी रामनगर पोलिसांना कथन केला आहे. केवळ हातातील सोन्याची अंगठी पाहून भामटय़ाने हे कृत्य केले असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

ठाण्यात घरफोडी
ठाणे : येथील सावरकर नगर भागातील स्वामी समर्थ सोसायटीमधील एका घरात चोरी झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. चोरटय़ांनी घरातून सुमारे ८४ हजारांचा ऐवज चोरून नेला. बुधवारी रात्री सोसायटीतील एका बंद घराचा कडी कोयंडा तोडून चोरटय़ांनी आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटातून ऐवज चोरून नेला. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळसूत्र चोरले
कल्याण : पश्चिमेतील सवरेदय गार्डन सोसायटी परिसरात सोनसाखळी चोरटय़ांनी एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून नेल्याची घटना बुधवारी रात्री घडली. भानुसागर टॉकीज परिसरात राहणारी महिला पतीसोबत बुधवारी रात्री सर्वोदय मॉलच्या दिशेने पायी जात होती. त्यावेळी मोटारसायकवरून आलेल्या सोनसाखळीत चोरांनी मंगळसूत्र खेचून पोबारा केला. महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंबिवलीत घरफोडी
डोंबिवली : पूर्वेतील शिव मंदिराजवळील सीताबाई म्हात्रे चाळीमध्ये चोरी झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. एका बंद घराच्या पाठीमागील खिडकीचे लोखंडी ग्रिल वाकवून चोरटय़ांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातून २० हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलीच्या भावाकडून प्रियकर, मित्राचा खून

खास प्रतिनिधी, ठाणे
गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या दोघा मित्रांचे खून झाल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपासामध्ये उघडकीस आली आहे. सोहेल मुस्ताक कुरेशी (२०) आणि शब्बीर अन्सारी (२०) अशी दोघांची नावे असून याप्रकरणी पोलिसांनी दीपक ऊर्फ सॅम अशोक वाल्मिकी आणि मोहमद अहमद जाहीदअली चौधरी ऊर्फ बाबू या दोघांना अटक केली आहे. तसेच त्यांच्या उर्वरित साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. दीपकचे बहिणीसोबत असलेल्या प्रेमसंबंधास शब्बीरचा विरोध होता. त्यावरून झालेल्या भांडणातून हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मुंब्रा येथील अमृतनगर भागात सोहेल तर नवी मुंबईतील दिघा भागात शब्बीर रहायचा. हे दोघेही जीवलग मित्र होते. गेल्या काही दिवसांपासून दोघेही बेपत्ता होते. या प्रकरणी सोहेलच्या आईने मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीच्या आधारे ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने समांतर तपास सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तपास करीत होते. त्यामध्ये सोहेल आणि शब्बीर यांचे काही मित्रांसोबत भांडण झाले असून तेव्हापासूनच दोघे बेपत्ता असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यामुळे दीपक वाल्मिकी आणि मोहमद अहमद जाहीदअली चौधरी या दोघांना पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले असता, दोघांनी त्यांच्या खुनाची कबुली दिली.
या दोघांनी साथीदारांच्या मदतीने शब्बीरचे चॉपरने मुंडके धडापासून वेगळे केले, त्यानंतर दिघा येथील इलटन पाडय़ाजवळील डोंगरात त्याचे धड पुरले आणि डोंगराच्या जवळ असलेल्या एका तलावात त्याचे मुंडके फेकून दिले. मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून तो शब्बीरच्या वडिलांनी ओळख पटविली आहे. तसेच या दोघांनी सोहेलचाही खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.