37कळव्यातील वाघोबानगरात राहणारे सियाराम गौतम हे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. घरी पत्नी, दोन मुले आणि दोन मुली असा परिवार. सियाराम यांचा स्वभाव रागीट असल्याने चारही मुले त्यांच्या धाकात राहणारी. पण सहा महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनेने या कुटुंबातले वातावरणच बदलून टाकले.

सियाराम यांचा दोन नंबरचा मुलगा ग्यानेंद्र हा सहा महिन्यांपूर्वी एका दुपारी जेवून घराबाहेर खेळायला गेला. सायंकाळ झाली तरी तो न परतल्याने त्याची शोधाशोध सुरू झाली. दहा वर्षांचा ग्यानेंद्र पाचवीत शिकत होता. रात्रभर शोधाशोध करूनही ग्यानेंद्रचा पत्ता न लागल्याने सियाराम यांनी कळवा पोलीस ठाणे गाठले. ग्यानेंद्रचे अपहरण झाले असावे, असा सियाराम यांचा संशय होता. पण सियाराम यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. शिवाय चोवीस तास उलटूनही अपहरणकर्त्यांचा फोन न आल्याने ती शक्यता पोलिसांनी फेटाळून लावली. तरीही तपास सर्वच अंगांनी सुरू होता. ग्यानेंद्रचे मित्र, गौतम कुटुंबाचे नातलग, शेजारी या सर्वाकडे चौकशी करूनही हाती काही धागेदोरे लागत नव्हते. असं करत करत दोन महिने उलटून गेले आणि कालांतराने तपासही थंडावला.
ग्यानेंद्रला बेपत्ता होऊन सहा महिने लोटले. पण अजूनही त्याचा पत्ता लागत नव्हता. त्यामुळे गौतम कुटुंबीयांचा धीर सुटत चालला होता. असं असतानाच आठ दिवसांपूर्वी ठाणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात फोन खणखणला. बिहारची राजधानी पाटणा शहरातील ‘अपना घर कल्याण समिती’ या आश्रमातून तो फोन आला होता. कळव्यातील सुनील जैस्वाल नावाचा एक दहा वर्षांचा मुलगा आमच्या आश्रमात राहत असल्याचे आश्रमातील शिक्षिता श्रीवास्तव यांनी सांगितले. मात्र, ठाणे नियंत्रण कक्षाकडे सुनील जैस्वाल नावाच्या कोणत्याच मुलाच्या बेपत्ता होण्याची तक्रार नव्हती. त्यांनी श्रीवास्तव यांना कळवा पोलिसांचा दूरध्वनी देऊन तेथे चौकशी करायला सांगितले. मग श्रीवास्तव यांनी कळवा पोलिसांशी संपर्क साधला. मात्र, तेथेही सुनीलच्या बेपत्ता होण्याची तक्रार नव्हती. तरीही पोलिसांनी सहा महिन्यांपूर्वीपासूनच्या सर्व बेपत्ता मुलांच्या तक्रारी पडताळल्या. त्यापैकी ग्यानेंद्रचे वर्णन सुनीलच्या वर्णनाशी मिळतेजुळते होते. मात्र नाव वेगळे असल्याने पोलीस चक्रावून गेले. त्यामुळे हे प्रकरण ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटकडे सोपवण्यात आले.
पोलीस उपायुक्त पराग मणेरे, सहायक पोलीस आयुक्त भरत शेळके आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांची बैठक झाली आणि या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक नवल हायलिंगे यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यांनी त्या शिक्षिकेला दूरध्वनी केला आणि सुनीलचे वर्णन, शरीरबांधा, अशी सविस्तर माहिती घेतली. चौकशीदरम्यान ते वर्णन ग्यानेंद्रशी तंतोतंत जुळले. त्यानंतर खऱ्या अर्थाने तपासाला दिशा मिळाली आणि पोलिसांच्या तपासाची चक्रे फिरली.
त्यांनी एक शक्कल लढवली आणि त्या शिक्षिकेला पुन्हा दूरध्वनी केला. ग्यानेंद्र नावाने हाक मारा आणि सुनीलने पाठीमागे वळून पाहिले तर आम्हाला लगेच कळवा, असे सांगितले. तिने तसे करताच ग्यानेंद्रने प्रतिसाद दिला आणि संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. श्रीवास्तव यांनी लगेच पोलिसांना कळवले. मग उपनिरीक्षक नवल हायलिंगे, पोलीस हवालदार प्रमोद हरिश्चंद्र पाटील आणि पोलीस नाईक कैलास जोशी यांचे पथक पाटण्याला रवाना झाले. त्यांच्यासोबत सियारामही होते.
आश्रमात वडिलांना पाहून ग्यानेंद्रने त्यांना मिठी मारली. सहा महिन्यांनंतर ग्यानेंद्र भेटल्याने सियाराम यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. थोडय़ा वेळाने उपनिरीक्षक हायलिंगे यांनी त्याची भेट घेतली. तेव्हा तो हळूहळू सविस्तर हकीकत सांगू लागला. तसतसे त्याचे बेपत्ता होण्यामागचे रहस्य उलगडत गेले. कळवा परिसरात एक तलाव असून तिथे तो पोहण्यासाठी जात असे. दोन मित्रांनी त्याला पाहिले होते. हे दोघे वडिलांना याबाबत सांगतील, अशी भीती त्याला वाटत होती. दोघा मित्रांनी तशी धमकीही त्याला दिली. त्यामुळे तो आणखी भेदरला. वडील रागीट असल्याने आता आपली काही खैर नाही, या भीतीपोटी तो घरी गेलाच नाही. त्याने थेट कळवा रेल्वे स्थानक गाठले. तिथून मग त्याचा रेल्वे प्रवास सुरू झाला.
पुणे, बक्सर (बिहार), हावडा आणि पाटणा असा त्याने रेल्वेने प्रवास केला. बक्सरमध्ये एका व्यक्तीकडे त्याने घरकाम केले, मात्र त्या व्यक्तीच्या लहान मुलाने पाच रुपये चोरल्याचा आरोप केला. यामुळे तो तेथून पळाला आणि तो पाटणा स्थानकात आला. तिथे पोलीस त्याला भेटले. पण त्याला घरी परतायचे नव्हते, म्हणून त्याने पोलिसांना सुनील जैस्वाल असे खोटे नाव सांगितले. तसेच कुटुंबाविषयी काहीच माहिती दिली नाही. यामुळे पोलिसांनी त्याला ‘अपना घर कल्याण समिती’ या आश्रमात दाखल केले. तेथे तो रमला होता, पण शाळेत जाण्यास नकार दिला होता.
मित्रांजवळ त्याने कळव्याचा उल्लेख केला आणि शिक्षिकेने ग्यानेंद्र नावाने दिलेल्या आवाजाला प्रतिसाद दिल्याने तो पालकांना सापडला. चार दिवसांपूर्वीच त्याला पाटण्याहून ठाण्यात आणले असून तो आता पालकांच्या ताब्यात आहे. मात्र तो पुन्हा पळून जाऊ नये म्हणून पथकाने त्याचे आणि त्याच्या पालकांचे समुपदेशन केले.