वादग्रस्त होर्डिगप्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा
ठाणे- ठाण्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी सोमवारी शहरातील हरिनिवास सर्कल येथील हॉलीवूड आय केअर दुकानाच्या समोरील पोळी-भाजी केंद्र दुकानाच्या वरील भागात ४० बाय ३० फुटांचे विनापरवानगी वादग्रस्त मजकूर असणारे होर्डिग लावले होते. प्रशासनाविषयी गैरसमज आणि अविश्वास निर्माण होईल अशा अशयाचा मजकूर या बॅनरवर लावण्यात आला होता. याविषयी कायदेशीर मनाई आदेश देण्यात आला असतानाही हे बॅनर शहरात झळकवण्यात आले. या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी राष्ट्रवादी पक्ष कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शहर विद्रुपीकरण आणि पोलीस कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कचोरीच्या घरपोच सेवेत २० हजारांचा गंडा
ठाणे- घरामध्ये ३५ कचोऱ्या हव्या आहेत असे सांगून त्याचे पैसे देण्यासाठी सुट्टे पैसे नसल्याने २० हजारांचे सुट्टे पैसे देण्याची विनंती एका अनोळखी महिलेने फोनवरून नौपाडा येथील कचोरी विक्रेत्याला केली. हे पैसे आणि कचोरी घेऊन या विक्रेत्याचा कर्मचारी त्या इमारतीजवळ गेला. त्याच वेळी  त्या इमारतीच्या जिन्यावर एका व्यक्तीने आपणच पैसे मागितल्याचे सांगून कर्मचाऱ्याकडून पैसे काढून घेतले. तर इमारतीमधील सहाव्या मजल्यावर जाऊन कचोरी देऊन पैसे घेऊन जाण्याचे सांगितले. मात्र या इमारतीमध्ये सहाव्या मजल्यावर त्या व्यक्तीचे घरच नसल्याचे निदर्शनास आल्याने दुकानदाराने अज्ञात महिला आणि पुरुषाविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
‘घर बैठे जॅकपॉट’ स्पर्धेच्या नावे लाखोचा गंडा
ठाणे- घर बैठो जॅकपॉट या स्पर्धेत २५ लाख जिंकले असल्याचे खोटे आमिष दाखवून ते पैसे घेण्यासाठी वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगणाऱ्या तीन अज्ञात लुटारूंनी एका महिलेकडील सुमारे ३ लाख ५६ हजारांची रक्कम लुबाडली. कळव्यातील खारेगाव परिसरामध्ये ४९ वर्षीय महिला राहत असून त्यांना १५ ऑगस्ट रोजी एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. त्या व्यक्तीने व्होडाफोन कंपनीतून बोलत असल्याचे सांगत ‘घर बैठे जॅकपॉट’मध्ये २५ लाख रुपये जिंकले असल्याचे या महिलेला सांगितले. शिवाय ही रक्कम घेण्यासाठी राजवीर सिंग या व्यक्तीशी संपर्क साधण्यास सांगितले. मात्र राजवीर सिंग यांनी त्यांना हे पैसे घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे पैसे भरण्यास सांगण्यास सुरुवात केली. त्यानुसार या महिलेने कॅनरा, आयसीआयसीआय, एसबीआय, बँक ऑफ बडौदा, बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांच्या खात्यावर वेगवेगळी अशी सुमारे ३ लाख ५६ हजारांची रक्कम जमा केली. मात्र तरीही पैसे मागण्याचा हा प्रकार सुरू झाल्याने अखेर या महिलेने कळवा पोलीस ठाण्यात राजवीर सिंग, राजवीर कुमार आणि अमित शुक्ला असे नावे सांगणाऱ्या तीन अनोळखींविरोधात तक्रार दाखल केली.