विवाह करूनही सासरच्या मंडळींच्या विरोधामुळे तिला पतीसोबत राहता येत नव्हते. पोटी मूल जन्मले तर मातृत्वाच्या आनंदासोबतच तिला पतीसोबत एकत्रित संसाराचे सुखही लाभणार होते. पण नियतीने येथेही तिला साथ दिली नाही. आपण आई बनू शकणार नाही, हे समजल्यानंतर तिचे आयुष्यच विखरून पडले. ते सावरण्यासाठी मग तिने ‘उसन्या मातृत्वा’ची कास धरली.
कल्याणला राहणारा अब्दुल करीम शेख आणि त्याची पत्नी रुक्साना रडवेले होऊन छत्रपती शिवाजी टर्मिनस पोलीस ठाण्यात बसले होते. हातावर पोट घेऊन जगणारे कुटुंब. गावी जायला निघाले होते. गाडी चुकल्याने फलाटावर रात्र काढली. पण पहाटेच्या सुमारास शेख पत्नी आणि दोन मुलांसह फलाटावर झोपलेले असताना कुणीतरी त्यांच्या ४ महिन्यांच्या मुलीला आरियाला पळवून नेलं होतं. हजारोंच्या गर्दीतून त्या बाळाला शोधण्याचं आव्हान पोलिसांपुढे होतं.
रेल्वेच्या मध्य परिमंडळ विभागाच्या पोलीस उपायुक्त रूपाली खैरमोडे-अंबुरे तात्काळ पोलीस ठाण्यात पोहोचल्या. घटना गंभीर होती. ज्या ठिकाणी शेख कुटुंबीय झोपले होते. तेथील सीसीटीव्ही तपासले. तेव्हा एक महिला बाळ घेऊन जात असताना दिसली. मग उपायुक्त रूपाली यांनी सर्व स्थानकांतील सीसीटीव्ही कॅमेरे तपासायचे आदेश दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक कामाला लागले. रेल्वे स्थानकाच्या बाहेर एक महिला बाळ घेऊन टॅक्सीत बसताना दिसली. बाळ पळवणारी आणि टॅक्सीत बाळ घेऊन बसणारी महिला दुसरी होती. म्हणजे या कामात दोन महिला होत्या हे स्पष्ट होत होतं. पण दुर्दैवाने त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातले चित्रण स्पष्ट नव्हते. एका टॅक्सीत बसून ती महिला जात आहे एवढेच दिसत होते. टॅक्सीचा क्रमांक दिसत नव्हता. मग तो टॅक्सीवाला शोधायचा कसा. पण पोलिसांनी हिंमत हारली नाही. पोलीस ठाण्याबाहेर लॅपटॉप घेऊन पोलिसांना बसविण्यात आले. सीएसटी स्थानकातील प्रत्येक टॅक्सीवाल्याला ते फुटेज दाखवून त्या महिलेबाबत माहिती विचारण्यात येत होती. दुपार झाली तरी हाती काही लागत नव्हते. कुठलाच टॅक्सीवाला त्या महिलेला ओळखण्यास तयार नव्हता. सीएसटी स्थानकाबाहेर टॅक्सी स्टँड आहे. पण बाळाचे अपहरण करणारी महिला स्थानकाच्या आत आलेल्या टॅक्सीत बसली होती. लांबून येणारे बाहेरचे प्रवासी थेट स्थानकात टॅक्सी आणतात. हे टॅक्सीचालक येथील नियमित धंदा करणारे नसतात. त्यामुळे अशाच कुठल्यातरी बाहेरच्या टॅक्सीचालकाच्या रिक्षात ही महिला बसली असावी हे नक्की झालं होतं. पोलीस निराश झाले. आता क धीही ते बाळ पुन्हा मिळण्याची शक्यता मावळली होती. स्वत: रूपाली खैरमोडे-अुंबरे पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसल्या होत्या. संध्याकाळ झाली. पण हिंमत हारू नका प्रयत्न सुरू ठेवा असे त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितले होते. पोलीस आयुक्त मधुकर पांडे स्वत: घटनेवर लक्ष ठेवून मार्गदर्शन करत होते.
एव्हाना रात्र झाली होती. पोलीस सर्व टॅक्सीचालकांना सीसीटीव्ही फुटेज दाखवत होते. अन्य मार्गाने तपास सुरूच होता. दरम्यान एका टॅक्सीवाल्याने सीसीटीव्ही फुटेजमधील त्या महिलेला ओळखले. त्याने मानखुर्दला त्या महिलेला सोडलं होतं. पोलीस त्याच्या सोबत मानखुर्दला गेले. महाराष्ट्र नगर या म्हाडा कॉलनीजवळ ती महिला उतरली आणि आतल्या वसाहतीत गेली. कुठे गेली ते माहीत नव्हतं. टॅक्सीचालकाने मोठे काम केले होते. पण सगळ्यात मोठे आव्हान पुढेच होते. कारण त्या वसाहतीत दीडशेहून अधिक इमारती होत्या. रात्रीचे दोन वाजले होते. त्यातून त्या महिलेला आणि तिने पळवलेल्या बाळाला शोधायचं होतं. पोलिसांनी रात्रीच ‘सर्च ऑपरेशन’ करायचे ठरवले.
प्रत्येक घरात जाऊन कुणी तान्हं बाळ आहे का ते शोधायचे होते. महिला पोलीस सोबत घेण्यात आल्या. प्रत्येक इमारतीच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून विश्वासात घेतलं. प्रत्येक घराची झडती घेऊन घरात तान्हुलं बाळ आहे का ते तपासलं जात होतं. एका घरात एक डॉक्टर माने राहात होते. त्यांनी आजच संध्याकाळी रत्नाकर भावे (बदललेले नाव) यांच्या घरात एका बाळाचं बारसं झाल्याचं सांगितलं. पण तो मुलगा असल्याचे ते म्हणाले. पोलिसांना मुलीचा शोध होता. पण तरी पोलिसांना आशेचा किरण दिसू लागला. ते रत्नाकर भावे यांच्या घरात पोहोचले. दाराची बेल वाजली. पहाटेचे चार वाजत आले होते. रत्नाकर भावे यांनी दार उघडलं. दारात पोलीस पाहून त्यांना आश्चर्य वाटलं.
पोलिसांनी त्यांच्याकडील बाळाची चौकशी केली. भावे यांनी आपल्या बाळाचं आजच बारसं केल्याचं सांगितलं. तो मुलगा आहे, असं ऐकताच पोलीस माघारी वळणार होते. मात्र, तरीही खातरजमा करण्यासाठी एका पोलीस महिलेने बाळाचे डायपर काढून तपासले. ती मुलगी होती. मुलगा म्हणून बारसं केलं आणि मुलगी असल्याचं पाहून रत्नाकर भावेही गोंधळले. ती मुलगी अब्दुल शेख यांचीच होती. लगेचच मुलगी सापडल्याची वार्ता वरिष्ठांना कळवण्यात आली.
पोलिसांनी रत्नाकर आणि त्यांच्या पत्नीला पोलीस ठाण्यात आणलं. रात्रभर पोलीस ठाण्याच्या पायरीवर हताश होऊन बसलेल्या अब्दुल शेख आणि रुक्साना यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळू लागले. पोलिसांचा खाक्या दाखवताच मानसी बोलती झाली. पण तिने जे पोलिसांना सांगितलं त्यावर पोलिसांचा विश्वास बसत नव्हता.
रत्नाकर भावे एका रुग्णालयात काम करत होते. त्यांनी मानसीशी प्रेमविवाह केला होता. पण घरच्यांना ते मान्य नसल्याने त्यांनी मानसीला मानखुर्दला भाडय़ाचे घर घेऊन दिले. ते स्वत: शीव येथे राहात होते. दिवसा ते रुग्णालयात कामाला जायचे. घरी आल्यावर रात्रपाळीचा बहाणा करत कामावर जायचे ते थेट मानखुर्दला मानसीकडे यायचे. कुटुंबाला वाटायचे ते रात्रपाळी करतेय. पण ते पत्नीकडे येऊन राहात होते.
बाळ झाल्यानंतर घरचे आपला स्वीकार करतील असं त्यांनी मानसीला सांगितलं होतं. पण मानसीला बाळ होत नव्हतं. जिवाची घालमेल सुरू होती. काय करावं सुचत नव्हतं. जर बाळ झालं नाही तर रत्नाकरने तिला सोडून दिलं असतं. त्यामुळे तिने एक योजना आखली. तिने गर्भवती असल्याचं भासवलं. पोटाला पिशवी बांधून तिने गर्भवती असल्याचं नवऱ्याला भासवलं. तिच्या हातात नऊ महिने होते. या काळात तान्हुलं बाळ दत्तक घ्यायचं आणि मला बाळ झालं असं भासवणार होती. पण तिने खूप प्रयत्न करूनही तिला कुठल्याही संस्थेने बाळ दत्तक दिलं नव्हतं. वेळ निघून चालला होता. रात्री रत्नाकर घरी आल्यावर गर्भवती असल्याचं नाटक ती हुबेहुब वठवत होती. पण बाळ नव्हतं. बाळ दत्तक मिळत नसल्याने रत्यावर राहणाऱ्या भिक्षेकऱ्यांक डून तान्हं बाळ विकत घेण्याचा तिने प्रयत्न केला. तेव्हा तान्हे बाळ आमच्या उपजिविकेचं साधन असतं असं सागून तिला कुणी दिलं नाही.
दरम्यान, नऊ महिने उलटले होते. मग मानसीने नवऱ्याला मुलगी झाल्याचं कळवलं आणि बाळाची प्रकृती नाजूक असल्याने ऑक्सिजनच्या पेटीत ठेवलं असं नवऱ्याला सांगितलं. त्यामुळे त्याला रुग्णालयात बाळाला बघता आलं नाही. आठवडय़ाभरात बाळाला घरी सोडतील, असं तिने सांगितलं होतं. त्या रात्री ती निराश होऊन छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकात बसली होती.
त्यावेळी तिच्या शेजारी बसलेल्या एका बंगाली महिलेशी तिची ओळख झाली. तिला तिने आपली व्यथा सांगितली. तेव्हा त्या बंगाली महिलेने तिला समोर झोपलेल्या कुटुंबाचे तान्हे बाळ चोरण्याचा सल्ला दिला. पण मानसीची बाळ चोरण्याची िहमत होत नव्हती. मग ही बंगाली महिला गेली आणि तिने सलीम आणि फातिमा झोपलेले असताना त्यांचं बाळ उचललं आणि मानसीच्या हातात दिलं. या कामासाठी तिला मानसीने पंधरा हजार रुपये दिले. ही बंगाली महिला मग पश्चिम बंगालला निघून गेली. मानसीने ते बाळ घेतलं आणि टॅक्सी करून मानखुर्दला आली. पोलिसांनी अपहरण प्रकरणात मानसीला अटक केली. उसन्या मातृत्वाच्या आसेपोटी हा गुन्हा केला होता.