News Flash

वजन-मापे दलालावर गुन्हा दाखल

डोंबिवली येथील अधिकृत वजन मापे दुरुस्ती दलाल विठ्ठल अनाप्पा जाधव याच्यावर व्यापाऱ्यांची फसवणूक व शासकीय रकमेचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

| August 20, 2015 02:47 am

वजन-मापे दलालावर गुन्हा दाखल

डोंबिवली येथील अधिकृत वजन मापे दुरुस्ती दलाल विठ्ठल अनाप्पा जाधव याच्यावर व्यापाऱ्यांची फसवणूक व शासकीय रकमेचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यासंबंधी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. हे प्रकरण हाताळताना हलगर्जीपणा केल्याचा ठपका डोंबिवलीतील वजन मापे विभागाचे अधिकारी कापडणे व निखारे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांची विभागीय चौकशी करावी असा अहवाल वरिष्ठांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पाठवण्यात येणार आहे.
विठ्ठल जाधव हे कल्याण परिसरात विनय स्केल सव्‍‌र्हिसेस या नावाने वजन मापे दुरुस्तीचा व्यवसाय करतात. त्यांनी वजन मापे दुरुस्ती अधिकाऱ्यांच्या संगनमताने गैरव्यवहार केला असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल झाली होती. विभागाने या प्रकरणाची चौकशी केल्यावर त्यांना त्यात तथ्य आढळले.
साडेसहा लाखांची घरफोडी
अंबरनाथ – येथील वांद्रा पाडा परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरी चोरी झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी घरी कोणी नसताना चोरटय़ांनी घरातील टीव्ही, सोन्याचे दागिने व इतर वस्तू असा एकूण सहा लाख ७५ हजारांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
८० लाखांची फसवणूक
कल्याण – व्यवसायामध्ये भागीदारी देण्याच्या बहाण्याने मुंबई येथील शेअर ब्रोकरची ८० लाखांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. सायन येथे राहणारी एक व्यक्ती व त्यांचा साथीदार यांनी व्यवसायामध्ये पैसे गुंतविण्याच्या उद्देशाने कल्याण पश्चिमेतील ताराराणी शिप बिल्डर्स यांच्या जहाज बनविण्याच्या व्यवसायामध्ये ८० लाखांची गुंतवणूक केली. मात्र भागीदारी न करून घेऊन घेतलेली रक्कमही परत न केल्याने मंगळवारी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अडीच लाख रुपयांचा गंडा
ठाणे – आयकर अधिकारी असल्याची बतावणी करून भामटय़ांनी कोपरखैरणे येथे राहणाऱ्या व्यक्तीला अडीच लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. मंगळवारी दुपारी ही व्यक्ती काही कामानिमित्त ठाणे येथे आली होती. या वेळी दोघा भामटय़ांनी त्यांना आम्ही आयकर विभागाचे अधिकारी व कर्मचारी असल्याची बतावणी करून गोटेघर येथील गोडाऊनमध्ये नेले. तेथे त्यांच्या खिशातील मोबाइल व रोख रक्कम काढून घेतली. त्यानंतर त्यांना गाडीत घालून त्यांच्या घराची झडती करायची असल्याचे सांगून घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण दोन लाख ७२ हजारांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी शीळ डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळसूत्राची चोरी
डोंबिवली – पश्चिमेतील शास्त्रीनगर येथे राहणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील ९० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची घटना घडली आहे. मंगळवारी कोपरगाव येथे त्या त्यांच्या मैत्रिणीसोबत जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या चोरटय़ांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरले. या प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपळेश्वर मंदिरातील दानपेटी फोडली
डोंबिवली – तीर्थक्षेत्राचा दर्जा लाभलेल्या येथील पिंपळेश्वर महादेव मंदिरात मंगळवारी पहाटे चोरटय़ांनी दानपेटी फोडल्याची घटना घडली आहे. सुरक्षारक्षकाला चाकूचा धाक दाखवून दानपेटीतील २० हजार रुपयांचे दान चोरटय़ांनी लंपास केले आहे. श्रावण महिना सुरू असल्याने मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी असते. या दिवसांत भाविकही मोठय़ा प्रमाणात दानधर्म करतात हे चोरांना ठाऊक असल्याने पहिला श्रावणी सोमवार होताच मंगळवारी पहाटे चोरटय़ांनी डाव साधत मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरली. सुरक्षारक्षक हरिराम बिष्ट हे मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ बसले होते. त्यांना डुलकी लागली असता दोघा चोरटय़ांनी त्यांच्या गळ्याला चाकू लावत आवाज केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर त्यांना मंदिर परिसरातील एका खोलीत डांबून ठेवून चोरटय़ांनी मंदिराच्या दाराचे कुलूप तोडून तेथील दानपेटी मंदिराच्या मागे नेऊन फोडली. पेटीतील २० हजार रुपयांची रोकड व नाणी चोरटय़ांनी लांबवली. हरिराम यांनी नोंदविलेल्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश म्हात्रे म्हणाले, मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र चोरटय़ांनी कॅमेरा चुकवून मंदिरात प्रवेश केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2015 2:47 am

Web Title: crime story of thane
Next Stories
1 शहीद स्मारकाची अखेर डागडुजी
2 टिळकनगर पुनर्भेट संमेलनांची दशकपूर्ती
3 दुष्काळामुळे यावर्षी दहीहंडी रद्द करण्याचा जितेंद्र आव्हाडांचा निर्णय
Just Now!
X