दुपारची वेळ.. पाल्र्यात राहणाऱ्या डॉ. अनघा जोशीच्या घरातील फोन खणखणला. हा फोन आपल्या आयुष्यात मोठं वादळ घेऊन येईल, याची तिला सुतराम कल्पना नव्हती. डॉ. अनघा जोशी आणि अभियंता पती आशुतोष जोशीे यांचा उत्तम संसार सुरू होता. आशुतोष बहुराष्ट्रीय कंपनीत कामाला होता. त्यामुळे अधूनमधून त्याचे परदेश दौरे सुरू असायचे. आदल्या रात्रीच तो जर्मनीला निघाल्याने अनघा त्याला विमानतळावर निरोप देऊन परतली होती. सगळं काही नेहमीसारखं व्यवस्थित सुरू असताना हा फोन वाजला. अनघाने तो उचलताच ‘मी पुणे क्राइम ब्रँचमधून पोलीस निरीक्षक सावंत बोलतोय’ असा आवाज ऐकू आला. त्यापाठोपाठ ‘घरात कोण कोण आहे, पती कुठे आहेत,’ अशी एकामागून एक सरबत्ती त्या पोलिसाने सुरू केली. अनघाने आपला परिचय दिला आणि पती जर्मनीला गेल्याचे सांगितले; पण त्या पोलिसाने पुढे जे सांगितलं ते तिच्यासाठी धक्कादायक होतं.
‘‘तुमच्या पतीला सेक्स रॅकेटमध्ये अटक करण्यात आली आहे. याच क्रमांकावरून तो सेक्स रॅकेट चालवत होता,’’ पोलिसाने उत्तर दिलं. हे ऐकून अनघाला काहीच सुचेना. तरीही तिने सावरत पोलिसाची मनधरणी करण्यास सुरुवात केली. त्यावर त्या पोलिसाने ‘आमच्याकडे भक्कम पुरावे आहेत’ असं सांगितलं. तरीही ‘‘साहेब, काही तरी करा. माझ्या पतीला सोडा. तुमचा गैरसमज झाला असेल,’’ अशी अनघाची विनवणी सुरूच होती. अखेर त्या पोलिसाचा सूर मवाळ झाला. ‘‘ठीक आहे. तुमच्या पतीला सोडण्याची संधी देतो; पण मी फोन केला हे कुणालाच सांगू नका. तुमच्या सासूबाईलासुद्धा सांगू नका. आता घरातील लॅण्डलाइन फोनची वायर काढा आणि तुमच्या मोबाइल क्रमांकाने मला कॉल करा. लगेच..’’ असं त्याने तिला सांगितलं. आशुतोषच्या अटकेच्या भीतीने भांबावलेल्या अनघाने पटकन पोलिसाच्या सूचनेबरहुकूम लॅण्डलाइनची वायर काढली. मधल्या वेळेत तिने आशुतोषला मोबाइलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला; पण त्याचा फोन ‘नॉट रिचेबल’ होता. त्यामुळे तिची खात्रीच पटली. तिने लगेच त्या पोलिसाला मोबाइलवर फोन केला.
‘‘मी तुमची मदत करतो. घरात किती पैसे आहेत, ते घेऊन या. मी सांगतो तिथे या; पण हे करताना फोन अजिबात ठेवायचा नाही,’’ असं त्याने सांगितले. त्याने सांगितल्याप्रमाणे अनघाने घरात असलेले २५ हजार रुपये घेतले आणि सासूला काही न सांगता घराबाहेर पडली.
पोलिसाच्या सांगण्यानुसार अनघा रिक्षाने वांद्रय़ाला, तेथून टॅक्सीने वाशीच्या रघुलीला मॉलकडे निघाली. वाटेत सुरू असलेल्या फोनवर तो अधिकारी तिला आशुतोषच्या कारनाम्यांविषयी सांगत होता. अनघासाठी हे प्रचंड धक्कादायक होतं; पण आशुतोषला बाहेर काढणं तिच्यासाठी तितकंच महत्त्वाचं होतं. रघुलीला मॉलजवळ तिला साध्या कपडय़ातील एका माणसाने गाठलं आणि आपण ‘पोलीस निरीक्षक सावंत’ असल्याचं सांगितलं. तेथेच त्याने तिचा मोबाइल काढून घेतला व बंद केला. अनघाने आशुतोषविषयी विचारताच ‘‘त्याची चौकशी सुरू आहे. तोपर्यंत आपण थोडं बोलू या,’’ असं सांगून तो तिला मॉलच्या गच्चीवर घेऊन गेला.

‘‘तुम्हीसुद्धा पतीच्या धंद्यात सामील आहात. रेश्मा या नावाने तुम्ही हा धंदा करता,’’ असे त्याने सांगताच अनघाची भीतीने अक्षरश: गाळण उडाली. त्यानंतर त्या पोलिसाने तिच्याकडून पैसे काढून घेतलेच; शिवाय तिच्यावर बलात्कारही केला. पतीच्या अटकेने घाबरलेल्या अनघाला काहीच सुचेनासे झाले होते. ‘‘तुम्ही घरी जा. तुमचे पती घरी येतील,’’ असं सांगून तो अधिकारी तिथून निघून गेला. अनघानेही परतीचा मार्ग गाठला. वाटेत सहज म्हणून तिने आशुतोषच्या मोबाइलवर फोन केला, तर त्याने तो उचलला. त्याचा स्वर नेहमीसारखा उत्साही होता. त्याच्याशी बोलताच सुरुवातीच्या काही क्षणांतच अनघाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि ती ओक्साबोक्शी रडू लागली..
एखाद्या गुन्हे मासिकातील काल्पनिक कथेप्रमाणे घडलेल्या या घटनेने गुन्हे शाखा क्रमांक आठच्या पोलिसांनाही चक्रावून सोडले. कुणी तरी तोतयाने आपण पोलीस असल्याचं सांगून अनघाची लुबाडणूक केली होती. असा प्रकार आधी घडल्याचं ऐकिवात नव्हतं; पण ज्या तऱ्हेने हे सारं घडलं, त्या पद्धतीने गुन्हेगार सराईत असल्याची पोलिसांना कल्पना आली आणि त्यांनी तपासास सुरुवात केली.
सर्वप्रथम पोलिसांनी ज्या क्रमांकावरून फोन आला होता, त्याची माहिती काढली. तो कुणा शबनम नावाच्या भांडुप येथे राहणाऱ्या मुलीच्या नावावर होता. पोलिसांनी तत्काळ तिचं घर गाठलं. तेव्हा वाशीला गेले असताना आपला मोबाइल हरवला होता, अशी माहिती तिनं दिली. त्यामुळे पोलिसांचा तपास तिथेच खुंटला.
मग त्यांनी रघुलीला मॉलमधील त्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात दिसलेल्या त्या अधिकाऱ्याला अनघाने लगेच ओळखले. आता आरोपीला शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गावशेते यांनी आपल्या खबऱ्यांना कामाला लावले. तेव्हा त्याचे नाव रवी वर्मा असून याआधी त्याला अटक झाली होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली; पण त्याच्याबाबत फार तपशील मिळत नव्हता. आधीच्या गुन्हय़ात वर्मासोबत अटक झालेल्या नातेवाईकाचा शोध पोलिसांनी सुरू केला. सुरेंद्र पाटील असे त्याचे नाव होते. पोलिसांनी कल्याण येथून सुरेंद्रला उचलले; पण त्यालाही वर्माचा ठावठिकाणा माहीत नव्हता. त्याच्याकडून पोलिसांना वर्माच्या सासूचा मोबाइल क्रमांक सापडला. मग तोच धागा पकडून पोलिसांनी या मोबाइल क्रमांकाचे कॉल रेकॉर्ड तपासण्यास सुरुवात केली. त्या नोंदीत वर्माची पत्नी माधवी हिच्या नावाचा मोबाइल क्रमांक आढळला. त्यावर खारघर सेक्टर ३५ येथील पत्ता होता; पण थेट माधवीला गाठण्याऐवजी पोलिसांनी एका स्थानिक केबलचालकाची मदत घेतली व रवी वर्मा तेथेच राहात असल्याची खात्री करून घेतली. त्यानंतर पोलीस निरीक्षक राजू कसबे, सुधीर दळवी यांच्या पथकाने सापळा लावून वर्मावर झडप घातली.
वर्माच्या चौकशीतून अनेक गुन्हय़ांचा छडा लागला. अशाच पद्धतीने त्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरांतील २५हून अधिक महिलांवर लैंगिक अत्याचार केले होते. दुपारच्या वेळी कुठल्याही लॅण्डलाइनवर तो फोन करत असे. पुरुषाने फोन उचलला की तो फोन कट करत असे. स्त्री असेल तर पोलीस असल्याचे दरडावून सांगत तो घरातील अन्य सदस्यांची माहिती काढत असे. घरात त्या वेळी कुणी नसेल तर ‘तुमच्या पतीला अटक करण्यात आली आहे’ असे सांगून तो त्यांना धमकावत असे. पुढे त्यांना निर्जन स्थळी बोलावून त्यांचे पैसे लुटत असे व त्यांच्यावर बलात्कारही करत असे. काही वर्षांपूर्वी त्याला दिल्लीत एक सिम कार्ड सापडले होते. त्यावरून त्याने हा प्रयोग केला. त्यात त्याला यश मिळाल्याने त्याची ही गुन्हय़ाची पद्धतच बनली होती. अनेक वेळा कुटुंबातून तसेच समाजातून अवहेलना होण्याच्या भीतीने पीडित महिला या प्रकरणाची वाच्यता करत नसत; पण अनघा आणि आशुतोषने धारिष्टय़ दाखवून पोलीस ठाणे गाठले, तर कसलाही दुवा नसताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगडे, पोलीस निरीक्षक सुधीर दळवी, पंढरीनाथ व्हावळ आदींच्या पथकाने या नराधमाच्या मुसक्या आवळल्या.