News Flash

बंदी आदेश धुडकावून नगरसेविकेच्या मुलीचा धडाक्यात विवाह

अनुपालन करण्याचे आश्वासन व्यवस्थापकाने दिले होते.

प्रातिनिधिक छायाचित्र

कल्याणमध्ये मंगल कार्यालय व्यवस्थापकासह वधुपित्यावर गुन्हे 

कल्याण: कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत करोनाने कहर केला आहे. दररोजची करोना रुग्णांची आकडेवारी बाराशेच्या पुढे सरकत असल्याने रहिवाशी हादरले आहेत. पालिका हद्दीत पोलीस, पालिकेकडून करोना प्रतिबंधासाठी कठोर निर्बंध लागू आहेत. असे असताना कल्याण पश्चिमेतील शिवसेनेचे माजी नगरसेवक सुनील वायले आणि विद्यमान नगरसेविका शालिनी वायले यांच्या मुलीचा विवाह सोहळा एक हजार वऱ्हाडींच्या उपस्थितीत शनिवारी पार पडला.

विवाह सोहळ्यापूर्वी महात्मा फुले पोलिसांनी मंगल कार्यालय व्यवस्थापकाला ५० वऱ्हाडींवर एकालाही  प्रवेश न देता, करोना प्रतिबंधाचे सर्व नियम पाळून विवाह सोहळा पार पाडण्याची नोटीस दिली होती. त्याचे अनुपालन करण्याचे आश्वासन व्यवस्थापकाने दिले होते. ते पाळले न गेल्याने व्यवस्थापकासह दोन वधुपित्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगल कार्यालय चालकाला तंबी दिल्याने तो करोना संसर्गाचे नियम पाळून विवाह सोहळा पार पाडण्याची जबाबदारी पार पाडील असे पोलिसांना वाटले होते. महात्मा फुले पोलिसांना संशय आल्याने साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, हवालदार विलास शिरसाठ इतर पथक चिकणघर रस्त्यावरील भगवा तलावा जवळील भवानी मॅरेज सभागृहाजवळ विवाहाच्या दिवशी शनिवारी रात्री नऊ वाजता गेले. तेथे दुचाकी, चारचाकी वाहनांची खूप वर्दळ असल्याचे पोलिसांच्या पथकाला दिसले. त्यांनी मंगल कार्यालयात जाऊन पाहिले तर एक हजार वऱ्हाडी विवाह सोहळ्यात सहभागी झाले होते.

मंगल कार्यालय व्यवस्थापक रमेश लक्ष्मण सिंग याला पोलिसांनी बोलावून विचारणा केली तेव्हा मंगल कार्यालयात दोन विवाह सोहळे आहेत, वधूवरांच्या नातेवाईकांनी गर्दी केल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी करोना संसर्गासाठी सभागृहातील गर्दी कमी करण्याचे आवाहन वऱ्हाडींना केले. अनेक वऱ्हाडींनी  मुखपट्टीचा वापर केला नव्हता. सामाजिक अंतर पाळले जात नव्हते. मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निर्जंतुकीकरण करणारे कर्मचारी नव्हते.

गेल्या आठवडय़ात कल्याण पूर्वेतील शिवसेना नगरसेवक नवीन गवळी यांनी धुमधडाक्यात वाढदिवस साजरा केला होता. तेथे गोळीबारही झाला होता. शिवजयंतीच्या दिवशी डोंबिवली पश्चिमेतील एका शिवसैनिकाने पोलिस, पालिकेचे आदेश धुडकावून गोपीनाथ चौकात शिवजयंती उत्सव धुमधडाक्यात साजरी करण्यासाठी शामियाना उभारला होता.

विष्णुनगर पोलिसांनी तंबी दिल्यानंतर हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला. पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे कार्यकर्ते कायदे मोडण्यात सर्वाधिक आघाडीवर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येते.

काय घडले?: ठाणे पोलीस आयुक्तांनी आयुक्तालय परिसरात रात्री आठ नंतर मनाई आणि जमावबंदी आदेश लागू केला आहे. पालिकेने विवाह सोहळे ५० वऱ्हाडींच्या उपस्थितीत आठ वाजण्याच्या आत उरकण्याचे आदेश दिले आहेत. साथरोग नियंत्रण, आपत्ती कायदे  लागू आहेत. अशा परिस्थितीत करोना प्रतिबंधाचे सर्व नियम धुडकावून, पोलिसांचे आदेश पायदळी तुडवून  सुनील राजाराम वायले,  सुरेश गंगाराम म्हात्रे (रा. डोंबिवली) आणि मंगल कार्यालय व्यवस्थापक  रमेश लक्ष्मण सिंग यांनी नियम तोडून विवाह सोहळ्याचे आयोजन केल्याबद्दल हवालदार विलास शिरसाठ यांच्या तक्रारीवरुन दोन यजमानांसह एका व्यस्थापकाविरुध्द महात्मा फुले पोलीस ठाण्यात साथरोग नियंत्रण कायद्याने फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  व्यवस्थापक सिंग यांना पोलिसांनी तातडीने ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात हजर केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2021 1:44 am

Web Title: crimes against the bridegroom including the mangal office manager in kalyan akp 94
Next Stories
1 ठाणे जिल्ह्य़ातही रुग्णसंख्याविस्फोट
2 मुखपट्टीविना फिरणाऱ्या  १७ हजार जणांवर कारवाई 
3 मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणातील आरोपी अटकेत
Just Now!
X