१५ हून अधिक टेम्पो भाजीपाला जप्त

कल्याण : कडक टाळेबंदी असताना कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी, शिळफाटा रस्त्यावरील दावडी येथील भाजी विक्रेते पालिका, पोलिसांच्या आदेशाला न जुमानता पहाटे दोन ते पाच वाजेपर्यंत भाजीपाला बाजार भरवून व्यवसाय करीत होते. या घाऊक विक्रेत्यांना नाशिक, जुन्नर परिसरातील भाजीपाला पुरवठादार टेम्पोने भाजीपाला पाठवीत होते. टाळेबंदीच्या काळात नियम मोडून व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात महापालिकेने गुन्हे दाखल केले असून भाजीपाल्याचे १५ हून अधिक टेम्पो जप्त करण्यात आले आहेत.

मानपाडा, कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे प्रकार घडले आहेत. विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाच्या बाहेर पहाटेच्या वेळेत भाजीपाला बाजार भरत असल्याने ड प्रभागाचे प्रभाग अधिकारी वसंत भोंगाडे यांच्या पथकाने दोन ते तीन वेळा कारवाई करून हे बाजार हटविले. तसेच पुन्हा बसू नये अशी तंबीही दिली. तरीही विक्रेत्यांनी विठ्ठलवाडी स्टेशन जवळील आडबाजूला पालिका अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून पुन्हा बाजार भरविणे सुरू केले. बाजाराच्या ठिकाणी सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन न करता किरकोळ विक्रेते गर्दी करत होते. हा विषय भोंगाडे यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहुराज साळवे यांना सांगितला. अखेर या बाजारातील घाऊक भाजीपाला पुरवठादार आणि विक्रेते यांची सापळा लावून कोंडी करण्याचा निर्णय पालिका, पोलीस अधिकाऱ्यांनी घेतला. दोन्ही पथकांनी अचानक बाजाराच्या ठिकाणी छापे टाकून तेथे उभे असलेले चार भाजीपाल्याचे टेम्पो आणि घाऊक विक्रेते यांना ताब्यात घेतले. कारवाई होताच बाजार सोडून इतर विक्रेते पळून गेले. सहा टेम्पोमधील भाजीपाला कचरा गाडीत भरून तो पालिकेच्या बायोगॅस केंद्रात पाठविण्यात आला.

शिळफाटा रस्त्यावरील दावडी येथे भाजीपाल्याचा बाजार अनेक वर्षे भरतो. हा बाजार पहाटेच्या वेळेत भरविण्यात येत होता. या ठिकाणी मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाहरी चौरे, ई प्रभाग अधिकाऱ्यांनी एकत्रित कारवाई केली. त्यांनी सहाहून अधिक भाजापाल्याचे टेम्पो जप्त केले. त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली. दावडी, पिसवली भागात करोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. तरीही या ठिकाणी बाजार भरविला जात होता. या बाजारांकडे स्थानिक नगरसेवक दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते.