News Flash

पीक विमा योजनेपासून शेतकरी वंचित राहणार ?

मुदत वाढवून देण्याची मागणी

संग्रहित छायाचित्र

निखिल मेस्त्री

पालघर : खरीप हंगामातील पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी आज शेवटचा दिवस असल्याने अनेक अडचणींमुळे शेतकरी या विम्यापासून वंचित राहणार असल्याची दाट शक्यता आहे. पीक विम्याची मुदत वाढवून देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

खरीप हंगामातील भात व इतर कडधान्य या पिकांना विमा संरक्षण म्हणून शासनामार्फत शेतकरीसाठी पिक विमा योजना राबवली जाते. यामध्ये कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना विमा संरक्षित रकमेचे हप्ते भरून आपली शेती विमा संरक्षणाखाली आणली जाते. या विमा संरक्षणाची शेवटची मुदत 31 जुलै म्हणजे आज आहे. मात्र तरीही जिल्ह्यातील ग्रामीण भागातील हजारो शेतकऱ्यांनी अजूनही अनेक अडचणींमुळे विमा उतरवलेला नाही. ग्रामीण भागामध्ये इंटरनेट सुविधेचा अभाव असल्यामुळे शेतकऱ्यांना हा विमा उतरवता आलेला नाही.

जव्हार ,मोखाडा, तलासरी, विक्रमगड अशा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे पीक विमा योजना राबवण्यासाठी आपले सेवा सरकार केंद्रांसह इतर केंद्रात ही योजना राबवली जाते. मात्र या केंद्रांमध्ये इंटरनेट सुविधेचा अभाव असल्यामुळे अजूनही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता आलेला नाही. याच बरोबरीने शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त असल्याने हा ऐनवेळी विमा काढण्यासाठी विलंब होत असल्याचे शेतकरी सांगत आहे.

पालघर जिल्ह्यात सुमारे पंचवीस हजार शेतकऱ्यांचे पीक विमा योजना काढण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाने ठेवले होते. मात्र गुरुवारपर्यंत १९ हजार शेतकऱ्यांनाच याचा लाभ घेता आला. याचा अर्थ सहा हजार पेक्षा अधिक शेतकरी अजूनही या योजनेपासून वंचित आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीन पडली आहे. शेवटच्या दिवशी शेतकऱ्यांनी पीक विमा योजना उतरवला नाही तर त्यांना या योजनेच्या बाहेर राहावे लागणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात निराशा निर्माण झाली आहे.

अनेक अडचणींमुळे तसेच या करोना काळात हा विमा उतरविण्यासाठी कृषी विभागा समोरही मोठे आव्हान उभे आहे. असे असले तरी कृषी विभाग शेतकऱ्यांना प्रत्यक्षात भेटून हा विमा उतरवण्यासाठी प्रयत्नशील आहे व राहील असे विभागामार्फत सांगण्यात आले आहे. जव्हार तालुक्यात दरवर्षी बिसा या सामाजिक संस्थेमार्फत सात ते आठ हजार शेतकऱ्यांचा सुमारे वीस लाखांचा विमा संरक्षित रक्कम उतरविला जातो. मात्र करोना आपत्ती काळ असल्यामुळे हा निधी संस्थेला उपलब्ध झाला नाही. परिणामी या शेतकऱ्यांना स्वतःचा विमा रक्कम भरावी लागली.तर काही आजही वंचित आहेत. या सर्व परिस्थितीमध्ये अनेक अडचणी शेतकर्‍यांसमोर उभे राहिल्याने त्यांना पिक विमा योजना काढता आलेली नाही. परिणामी शेवटचा दिवस असल्याने या पीक विम्याची मुदत शासनाने वाढवून द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.

पीक विमा काढण्याचे काम विविध स्तरावर युद्ध पातळीवर सुरू आहे.कोणीही शेतकरी वंचित राहू नये यासाठी पुरेपूर प्रयत्न सुरू असून जिल्ह्याचा लक्षांक पूर्ण होईल असा विश्वास आहे. -के.बी.तरकसे, जिल्हा कृषी अधीक्षक

जनजागृती नसल्याने शेतकरी विमा योजनेपासून वंचित आहेत.त्यांच्या सोयिकरिता मुदत वाढवून दिल्यास दिलासा मिळेल व सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल. -महेंद्र अधिकारी, अध्यक्ष पालघर तालुका कृषी विकास खरेदी विक्री संघ

शेतकऱ्यांच्या पीक विमा योजनेच्या समस्या अवगत केल्या असून त्वरित विमा योजनेची मुदत वाढवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री व कृषी मंत्री यांना विनंती करणार आहे. -सुनील भुसारा, आमदार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2020 10:06 am

Web Title: crop insurance gain not get to farmers bmh 90
Next Stories
1 अतिसंक्रमित क्षेत्रे घटणार?
2 वाढीव उपचार बिलांचा परतावा
3 महामार्गावरील सेवा रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग
Just Now!
X