भाईंदर रेल्वे स्थानकाबाहेरील कामावर करोना काळात कोटय़वधीचा खर्च

भाईंदर : भाईंदर रेल्वे स्थानकाबाहेर पालिकेमार्फत सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आल्यामुळे भविष्यात प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडीची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे करोनामुळे आर्थिक संकट असताना सुशोभीकरणासाठी कोटय़वधी रुपये खर्च केले जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, नागरिकांच्या वाढत्या विरोधामुळे या कामाला तात्पुरती स्थगिती दिल्याचे पालिकेने सांगितले.

भाईंदर पूर्व आणि पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेरील रस्ता अरुंद असल्यामुळे पूर्वीपासून या भागात प्रचंड  प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. या परिस्थितीत रेल्वे स्थानकाबाहेरील पश्चिमेकडील  सुशोभीकरणावर तब्बल ८ कोटी २२ लाखांचे तर पूर्वेच्या कामाकरिता सुमारे दीड कोटी रुपयांचा खर्च महापालिकेने मंजूर केला आहे. शिवाय या कामामुळे भविष्यात आणखी वाहतूक कोंडीत भर पडण्याची शक्यता असल्यामुळे या कामाला विरोध करण्यात येत आहे.

२०१७ साली भाईंदर पश्चिमेकडील जुनी बांधकामे पाडण्यात येऊन रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले होते. परंतु आता जागा मोकळी करून घेतल्यानंतर सुशोभीकरणाचे काम सुरू केल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होणार आहे.

यापूर्वी देखील या भागात मीठ विभागाचे बांधकाम तोडून ती जागा कब्जा केली म्हणून पालिका कार्यकारी अभियंत्यासह अन्य लोकांवर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. परंतु आता पुन्हा त्याचप्रकारे काम करण्यात येत असल्यामुळे सामान्य नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

सध्या मीरा-भाईंदर शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे रुग्णांच्या सोयीकरिता पालिका प्रशासनाला राज्य शासनाकडून तसेच कर्ज काढून उपयोजना कराव्या लागत आहेत. या परिस्थितीत सुशोभीकरणाच्या कामावर कोटय़वधी रुपये खर्च करण्यात येत असल्यामुळे आमदार गीता जैन यांनीदेखील काम बंद करण्याची मागणी केली आहे.

पुढील आदेश येईपर्यंत ठेकेदाराला कामे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आदेश आल्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

– दीपक खांबित, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग