ठाणे ते बदलापूर मार्गावरील रेल्वे स्थानकांत महिला प्रवाशांची गर्दी कमीच

ठाणे / डोंबिवली : मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वेगाडय़ांमधून बुधवारपासून महिला प्रवाशांना ठरावीक वेळेत प्रवास करण्यास मुभा देण्यात आल्याने स्थानकांवर गर्दी होऊन गोंधळ उडण्याची भीती होती. मात्र, ठाणे ते कल्याण स्थानकांवर महिला प्रवाशांची फारशी गर्दी दिसून आली नाही. मुंबईतील कार्यालये सकाळी १० वाजता सुरू होतात आणि महिलांना लोकलमधून प्रवास करण्यासाठी सकाळी ११ वाजेनंतर मुभा आहे. त्यामुळे लोकल सुरू होऊनही त्यांना कार्यालयीन वेळेअभावी त्यातून प्रवास करणे शक्य झाले नसल्याचे चित्र दिसून आले.

रेल्वेच्या उपनगरी गाडय़ांमध्ये अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना रेल्वे प्रवास करण्याची मुभा आहे. परंतु खासगी कंपन्यांतील नोकरदार वर्गाला रेल्वे प्रवासाबाबत कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. महिला प्रवाशांसाठी तरी  लोकल सेवा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागल्यानंतर बुधवारपासून महिलांना लोकल प्रवासास मुभा देण्यात आली.

रेल्वे प्रशासनाने महिलांसाठी सकाळी ११ ते दुपारी ३ आणि रात्री ७ नंतर ते शेवटची उपनगरीय रेल्वेगाडी सुटेपर्यंत रेल्वे प्रवास करण्यास मुभा दिली आहे. मात्र, खासगी कंपनीत काम करणाऱ्या बहुतांश महिलांच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळा १० वाजेपासून सुरू होतात. त्यामुळे बुधवारी ११ वाजेपासून सुरू झालेल्या लोकल प्रवासाला महिलांकडून फारसा प्रतिसाद मिळू शकलेला नाही.  ठाणे, डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानकातील फलाटांवर महिला प्रवाशांची फारशी गर्दी दिसून आली नाही.

महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांतील चित्र..

’ ठाणे रेल्वे स्थानकातून यापूर्वी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची वाहतूक सुरू होती. त्यात बुधवारपासून केवळ १० ते १५ टक्के महिला प्रवाशांचा भार वाढला आहे. अनेक महिला खरेदीसाठी मुंबईला जात असल्याचे दिसून आले. तर, ज्या महिलांच्या कार्यालयीन वेळा सकाळी ११ वाजेनंतर होत्या, त्याच महिला लोकलने प्रवास करीत होत्या. इतर महिलांनी नेहमी प्रमाणे बसगाडय़ांतून प्रवास करत कार्यालय गाठले.

’ डोंबिवली रेल्वे स्थानकातील चारपैकी दोन तिकीट खिडक्या बंद होत्या. त्यामुळे त्याचा भार उर्वरित दोन तिकीट खिडक्यांवर आला होता. या प्रकारामुळे अंतरनियमांचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. असे असले तरी रेल्वे स्थानकातील फलाटांवर मात्र महिला प्रवाशांची फारशी गर्दी नव्हती.

’ कल्याण रेल्वे स्थानकातही अशीच परिस्थिती होती. या स्थानकातील तिकीट खिडक्यांवर महिला प्रवाशांची गर्दी होती. तर, फलाटांवर मात्र महिला प्रवाशांची गर्दी नव्हती.

’ अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकात सकाळी ११ वाजेच्या सुमारास काही काळ गर्दी झाली. मात्र, अर्धा ते पाऊण तासानंतर येथील गर्दी ओसरल्याचे चित्र होते.

ठाण्याला एका बँके चे कर्जाबाबतच्या कामासाठी आले होते. गेल्या सहा महिन्यात बसने जाताना तासन्तास प्रवासाला लागत होता. हा वेळ कमी झाला. लोकल प्रवास पूर्णपणे थांबला होता. पुन्हा प्रवास करण्यास मिळाल्याने बरे वाटले.

अंजू तिवारी, डोंबिवली

ठाण्याला ब्युटी शॉपमध्ये काम करते. टाळेबंदीमुळे पहिले तीन महिने शॉप बंद होते. नंतर कामावर जाण्यास सुरुवात के ली. परंतु प्रवासासाठी बराच वेळ लागत असल्याने नोकरीसाठी जाता येत नव्हते. लोकल सुरू झाल्यानंतर पुन्हा नोकरीसाठी बोलावण्यात आले. लोकलसाठी असलेल्या वेळा बदलाव्यात

मीना साडविलकर, दिवा