सहा महिन्यांपासून काम बंद असल्याने नागरिकांची कोंडी

चिंचोळे रस्ते, दाटीवाटीने उभ्या असलेल्या इमारती, अरुंद रस्त्यावरच फेरीवाल्यांनी मांडलेले बस्तान यातून मार्ग काढताना किसननगरचे रहिवासी मेटाकुटीला आलेले असतानाच गेल्या सहा महिन्यांपासून मलवाहिनीसाठी खोदून ठेवलेल्या खड्डय़ांमुळे मोठी गैरसोय होत आहे. बाजारपेठेतील दुकान आणि इमारतीच्या प्रवेशद्वारासमोरच हा खड्डा खणण्यात आल्याने या अरुंद रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात कोंडी होत आहे. या भागातच ठाणे महानगरपालिकेची शाळा असल्याने सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत या परिसरातून चालणेही कठीण होत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. त्यात अनेक महिन्यांपासून मलवाहिनीसाठी खोदण्यात आलेल्या या खड्डय़ात नागरिकांनी घरातील भांडय़ांची कपाटे, प्लास्टिकच्या बाटल्या, कचरा टाकल्याने दरुगधी पसरलेली आहे.

किसननगर परिसर इमारतींची गर्दी, अनधिकृत बांधकामे, बेकायदा पार्किंग, अस्वच्छता यासाठी कायमच चर्चेत असतो. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला अशी किसननगर परिसराची ओळख आहे. मात्र कायमच असुविधांच्या गर्तेत असणाऱ्या किसननगर परिसराला हवा तसा विकास साधता आलेला नाही. किसननगर येथील ठाणे महानगरपालिका शाळेसमोरील निमुळत्या रस्त्यावरच बाजारपेठ आहे. या अरुंद रस्त्यावर दोन्ही बाजूस सकाळ आणि संध्याकाळ फेरीवाल्यांचे बस्तान असते. यातच गेल्या सहा महिन्यांपासून मलवाहिनीच्या कामासाठी रस्त्याच्या मध्यभागी महापालिकेने खड्डा खोदला आहे. मात्र अनेक दिवस मलवाहिनीचे काम बंदच असल्याने नागरिकांची मोठय़ा प्रमाणात अडचण होत आहे. रस्त्याच्या मध्यभागीच दुकानांच्या प्रवेशद्वारासमोर हा खड्डा खोदल्याने या भागातून वाहनांना मार्ग काढण्यास अडथळा निर्माण होत आहे. तसेच सकाळी आणि सायंकाळी शाळेचे विद्यार्थी प्रवास करत असल्याने येथे मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.

घरातील कचरा खड्डय़ात

या खड्डय़ाला चारही बाजूस संरक्षणाच्या दृष्टीने पत्रे लावण्यात आले असले तरी गेल्या अनेक दिवसांपासून हे काम बंद असल्याने येथील नागरिकांनी या खड्डय़ाची कचरा कुंडी केली आहे. येथील नागरिकांच्या घरातील कचरा, प्लास्टिकच्या बाटल्या, घरातील सामान, भांडय़ांची कपाटे येथे ठेवली असल्याने महापालिकेच्या दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.