खंडग्रास सूर्यग्रहणाच्या दर्शनासाठी ठिकठिकाणी गर्दी

सूर्यग्रहण म्हणजे औदासिन्य, अशुभ ही अंधश्रद्धा मोडित काढून गुरुवारी हजारो ठाणेकरांनी खंडग्रास सूर्यग्रहणाचे दर्शन घेतले. सूर्यग्रहणाचा सोहळा पाहण्यासाठी विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमांत नागरिक मोठय़ा उत्साहाने सहभागी झाले होते. सुरुवातीला ढगाळ वातावरणामुळे ग्रहण निरीक्षण करता येत नव्हते. मात्र, ढगांची गर्दी ओसरल्यानंतर उपस्थितांमध्ये पुन्हा उत्साह संचारला.

ठाणे शहरातील अबालवृद्धांनी चंदनवाडी येथील गोदुताई परूळेकर उद्यानात सूर्यग्रहण पाहण्यासाठी गुरुवारी मोठी गर्दी केली होती. ठाण्यातील चंदनवाडी परिसरात असणाऱ्या गोदुताई परूळेकर उद्यानात दुर्बिणीच्या सहाय्याने सुर्यग्रहण पाहता यावे, यासाठी विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी खगोलशास्त्रज्ञ दा.कृ.सोमण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी चाळणीद्वारे घरच्या घरी ग्रहण कसे पाहाता येते, याची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी ग्रहण पाहण्यासाठी विशेष चष्मेही आयोजकांकडून देण्यात आले होते. ठाण्यातील सरस्वती मंदिर शाळेतर्फे विद्यार्थ्यांना सुर्यग्रहण पाहायला मिळावे, यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेच्या गच्चीवरून विशेष चष्म्यांच्या सहाय्याने विद्यार्थाना सुर्यग्रहण दाखवण्यात आले. तसेच शिक्षकांनी सुर्यग्रहणाविषयी माहिती दिली. तर डोंबिवलीतील भागाशाळा मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डोंबिवलीकरांनी मोठय़ा संख्याने उपस्थिती दर्शवली. काही खगोलतज्ज्ञ ग्रहणाचा सखोल अभ्यास करण्यासाठी यावेळी उपस्थित होते. ग्रहणाविषयी लोकांमध्ये अनेक अंधश्रद्धा आहेत. मात्र, या अंधश्रद्धा बाळगण्याऐवजी त्याचा अभ्यास करणे अधिक गरजेचे आहे, असे मत दा. कृ. सोमण यांनी व्यक्त केले.

ढगाळ वातावरणाचा अडथळा

सकाळी ८ वाजता उपस्थितांना सूर्यग्रहण पाहायला मिळाले. मात्र, सुर्यग्रहण सुरु होताच ढगाळ वातावरण झाल्याने उपस्थितांच्या चेहऱ्यावर निराशा दिसून आली. काही वेळाने ढग नाहीसे झाल्यावर पुन्हा सुर्यग्रहण स्पष्ट दिसू लागले. सकाळी ११ वाजेपर्यंत अनेकांनी सुर्यग्रहण पाहण्याचा आनंद लुटला.