परवानगी असलेल्या दुकानांत गजबज; रेल्वे, एसटी गाडय़ांनाही प्रवाशांची गर्दी

ठाणे, कल्याण, बदलापूर : राज्यात बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा पहिला दिवस मुक्त संचारातच गेल्याचे दिसून आले. संचारबंदी असतानाही गुरुवारी ठाणे, कल्याण, डोंबिवली यांसह सर्वच शहरांतील बाजारांत नागरिकांची लगबग दिसून आली. निर्बंध जाहीर करताना राज्य सरकारने अनेक गोष्टींना परवानगी दिली असल्याने नेमके अडवायचे कुणाला आणि कारवाई कुणावर करायची, असा प्रश्न पोलिसांनाही पडला होता. दुसरीकडे, रेल्वेगाडय़ांमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची परवानगी असताना ठाणे स्थानकात सर्वच प्रवाशांना तिकिटे दिली जात होती. दोन आठवडय़ांच्या टाळेबंदीमुळे कल्याण, भिवंडी येथील एसटी स्थानकांत गावाकडे जाणाऱ्या गाडय़ांनाही गुरुवारी गर्दी दिसून आली.

राज्य सरकारने लागू केलेल्या संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी ठाणे शहरातील अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्वच दुकाने बंद होती. असे असले तरी ढोकाळी, कळवा, विटावा, यशोधननगर, वागळे इस्टेट यासारख्या  दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये नागरिकांचा संचार मात्र सुरू होता. अनेकजण विनाकारण बाहेर पडल्याचे चित्र होते. यापूर्वी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ई-पास देण्यात आला होता. यावर्षी तशी कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने पोलिसांनाही नागरिकांना अडविताना संभ्रम निर्माण झाला होता. तसेच उन्हाचे चटके वाढत असल्याने बंदोबस्ताच्या काही ठिकाणी पोलीस सावलीत बसून होते. तर ज्या ठिकाणी पोलीस कारवाई करत होते त्याठिकाणी अनेकजण अत्यावश्यक सेवेतील असल्याचे सांगत प्रवास करत होते. ठाणे बाजारपेठेतील इतर दुकाने बंद असली तरी येथील भाजी बाजार तसेच लसूण बाजार, मसाला बाजार, कांदा बाजारात नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. लहान-सहान वस्तू खरेदीसाठीही घोडबंदर, वागळे इस्टेट भागातून अनेकजण आले होते. त्यामुळे अंतर नियमांचे उल्लंघन झाल्याचे चित्र होते. ठाणे रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांना तिकिटे दिली जात होती. याबाबत रेल्वे सुरक्षा दलातील एका कर्मचाऱ्याला विचारले असता, राज्य सरकारकडून अद्याप आम्हाला कोणतीही सूचना आली नसल्याचे त्याने सांगितले.

भिवंडी येथील तीन बत्ती भाजी बाजारामध्येही नागरिकांनी अशाचप्रकारे गर्दी केली होती. भिवंडी तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील रहिवाशांसाठी ही बाजारपेठ मुख्य असल्याने तसेच किरकोळ व्यापारीही या बाजारपेठेत खरेदीसाठी येत असल्याने भाजी खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे चित्र होते. बदलापूर शहरात शासनाने मंजुरी दिलेली दुकानेच सुरू होती. रस्त्यांवर नागरिक मोठय़ा संख्येने बाहेर फिरताना दिसत होते. खाद्यपदार्थाच्या गाडय़ा, भाजी मंडई परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती. अंबरनाथ शहरातही हीच परिस्थिती पाहायला मिळत होती. भाजीविक्रीच्या हातगाडय़ा, भाजी मंडईत नागरिकांनी नेहमीप्रमाणे गर्दी केली होती. फळ विक्रेते, खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या गाडय़ांवर गर्दी पाहायला मिळत होती. अनेक ठिकाणी पार्सल सुविधा देण्याऐवजी त्याच ठिकाणी खाद्यपदार्थ खाण्यासाठी दिले जात असल्याचे चित्र होते.

कल्याण-डोंबिवलीतही गर्दी

कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील भाजीपाला, फळ बाजार, अत्यावश्यक सेवेच्या दुकानांमध्ये खरेदीसाठी रहिवाशांनी गर्दी केली. पोलीस चौकाचौकांत गस्त घालत असले तरी रहिवासी आपले व्यवहार नियमितपणे करत आहेत. रिक्षा, केडीएमटी, एसटी बस नियमितपणे धावत आहेत. रेल्वे स्थानकात प्रवेश देताना प्रवाशाचे अत्यावश्यक सेवेचे ओळखपत्र पाहण्यास पुन्हा सुरुवात झाली होती. कल्याण रेल्वे स्थानकाच्या बाहेर परप्रांतात जाण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून प्रवाशांनी गर्दी केली होती.  कल्याणमधील शिवाजी चौक, दीपक हॉटेल ते पुष्पराज हॉटेल, बोरगावकरवाडीतील फेरीवाले बसले होते. डोंबिवलीतील फडके रस्ता, बाजीप्रभू चौक, नेहरू रस्ता, रामनगर रेल्वे स्थानक परिसरात विक्रेते बसले होते.

गावाकडे जाण्याची घाई

कल्याण आगारात औरंगाबाद, परभणी, धुळे, जळगाव, कोकणात जाण्यासाठी कुटुंबीयांनी गर्दी केली आहे. बसमध्ये गर्दी होणार नाही असे नियोजन करून बसमध्ये वाहकाकडून प्रवाशांना प्रवेश दिला जात होता. मुखपट्टी नसलेल्या प्रवाशाला बसमध्ये प्रवेश दिला जात नव्हता. गस्ती नाक्यांवर पोलीस अनावश्यक वाहन चालविणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहन चालकांना अडवून त्याच्या प्रवासाचे, तो अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आहे की नाही. त्याच्या कामाची गरज ओळखून मगच त्याला पुढील प्रवासाला मुभा देत असल्याचे चित्र कल्याण, डोंबिवलीतील चौकांमध्ये दिसत होते.

शासनाच्या निकषांनुसार रेमडेसिवीरचा जिल्ह्य़ाला पुरवठा केला जाणार आहे. बुधवार आणि गुरुवार हा पुरवठा करण्यात आलेला नाही. शुRवारी रेमडेसिवीर उपलब्ध होणार आहे. त्यानंतर कोविड रुग्णालयांना उपलब्ध साठय़ाच्या प्रमाणात पुरवठा केला जाईल. त्यावेळी नियंत्रण कक्षाची यंत्रणा खऱ्या अर्थाने कार्यान्वित होईल.

– राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे.

वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्टॉलवर कारवाई

बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगर भागात काही वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्टॉल बंद करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला गेला. फेरीवाल्यांकडे खरेदीसाठी गर्दी असताना त्यांच्यावर कारवाई होत नाही. मात्र,  वृत्तपत्र विक्रेत्यांवर कारवाई केली जाते, असा सवाल वृत्तपत्र विक्रेते करत होते.