नव्या नियमावलीनुसार अहवाल दाखवण्याची सक्ती

ठाणे : अत्यावश्यक सेवेतील, घरपोच वस्तूंचा पुरवठा करणारे, बांधकाम तसेच औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना दर १५ दिवसांनी करोना चाचणी करणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रातील १२ करोना चाचणी केंद्रांवर गुरुवारपासून कामगारांची गर्दी होऊ लागली आहे. मात्र, गर्दीत वाढ झाल्याने चाचणी केंद्रांवरील अंतर नियम गुंडाळले जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने नवा आदेश लागू केला आहे. या आदेशानुसार बांधकाम तसेच औद्योगिक क्षेत्रातील कामगार, घरपोच खाद्य तसेच वस्तू पुरवठा करणारे कर्मचारी, सार्वजनिक वाहनचालक तसेच अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण होत नाही, तोपर्यंत त्यांना करोना चाचणीचा नकारात्मक अहवाल सोबत ठेवणे बंधनकारक केले आहे. असा अहवाल येत्या १० एप्रिलपासून स्वत:कडे ठेवणे कामगारांना बंधनकारक आहे. तसेच या नियमांचे उल्लंघन झाले तर संबंधित कंपनी किंवा व्यक्तीवर कारवाई होणार आहे. राज्य सरकारने दिलेली मुदत समीप आल्यामुळे करोना चाचणी करण्यासाठी कामगारवर्गाची मोठय़ा प्रमाणावर गर्दी होऊ लागली आहे.

ठाण्यातील मानपाडा, टेंभी नाका, कळवा, वागळे, सावरकरनगर, लोकमान्यनगर, कोपरी आनंदनगर या केंद्रांबाहेर कर्मचाऱ्यांच्या लांब रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी शेकडोच्या संख्येने कर्मचारी चाचणीसाठी आले होते. तसेच शहरातील काही करोना चाचणी केंद्र सकाळी ११ वाजता सुरू होतात. त्यामुळे उन्हाच्या झळा सोसत नागरिक रांगेत उभे असल्याचे चित्र दिसून आले.

चाचणी केंद्रावर वाढलेल्या गर्दीच्या तुलनेत केंद्रावरील मनुष्यबळ अपुरे असल्याचे दिसून येत होते. या संदर्भात ठाणे महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांच्याशी संपर्क साधला असता, कामगारांची गर्दी होत असल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे त्यांनी सांगितले.