वसई: परराज्यात जायचे असेल तर सनसिटी मैदानात जा, अशा आशयाचे बनावट संदेश समाजमाध्यमावर फिरू लागल्याने गुरुवारी पुन्हा वसईच्या सनसिटी मैदानात हजारो नागरिकांची गर्दी उसळली होती. मात्र पोलिसांनी खबरदारी म्हणून ज्यांची नावे ट्रेनसाठी आरक्षित आहेत त्यांनाच मैदानात प्रवेश दिला. मात्र आपल्याला प्रवेश मिळेल या आशेने हजारो नागरिक परिसरात उन्हात दिवसभर ताटकळत बसले होते.

पराराज्यात जाणारे नागरिक आणि स्थलांतरित मजुरांसाठी वसई रेल्वे स्थानकातून श्रमिक ट्रेन सोडण्यात येत आहेत. ज्या प्रवाशांची नावे आरक्षित केली जातात त्यांना वसईच्या सनसिटी मैदानात बोलावण्यात येते. तहसीलदार कार्यालयातून त्या लोकांना संदेश पाठविण्यात येतात. गुरुवारी उत्तर प्रदेशातील जौनपूरसाठी दोन ट्रेन सोडण्यात आल्या. मात्र समाजमाध्यमावरून ट्रेन सुटणार आहेत, सनसिटीत या अशा आशयाचे बनावट संदेश फिरत असल्याने सकाळपासून हजारो नागरिक सामान घेऊन आपल्या कुटुंबीयांसह या मैदानाकडे आले होते. मात्र गुरुवारी पोलीस आणि महसूल प्रशासन यांनी खबरदारी घेत ज्यांची नावे आहेत, ज्यांना तहसीलदार कार्यालयाने भ्रमणध्वनीवर संदेश पाठवले आहेत, अशा लोकांनाच मैदानात सोडले होते. त्यामुळे उर्वरित लोकांनी आसपासच्या परिसरात बस्तान मांडले होते. सनसिटी परिसर, १०० फुटी रस्ता, सेंट फ्रान्सिस शाळेच्या परिसरात हे प्रवासी जागा मिळेल तिथे बसले होते. मंगळवारी उष्माघाताने एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यामुळे गुरुवारी मैदानात उन्हापासून संरक्षण करण्यासाठी अतिरिक्त मंडप उभारण्यात आला होता.

बुधवारी दोन ट्रेन रद्द झाल्याने हजारो नागरिकांची निराशा झाली होती. रात्रीपासून नागरिकांचे जथ्थेच्या जथ्थे या परिसरात येत होते. या मैदान परिसराला अक्षरश: जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या नागरिकांना विविध सामाजिक संस्थांकडून जेवण आणि पाणी पुरविण्यात येत आहे.

बनावट संदेशावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

एका ट्रेनमधून सामाजिक दूरीच्या नियमांमुळे केवळ १२०० प्रवाशांना सोडण्यात येते. त्यांची नावे संबंधित प्रवाशांना कळवली जातात. त्यामुळे अन्य प्रवाशांनी विनाकारण मैदानात येऊ  नये, असे आवाहन वसईचे तहसीलदार किरण सुरवसे यांनी केले आहे. सध्या समाजमाध्यमावरून  संदेश फिरत आहेत. त्यामुळे  गर्दी वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.