समुद्राच्या पाण्यावर तेलाचे तवंग; प्रदूषण, तेल कंपन्यांच्या सर्वेक्षणाचा परिणाम

वसईतील भुईगाव समुद्रकिनाऱ्यावर तेलाचे थर आणि पाण्यात तेलाचे तवंग दिसून आले आहे. प्रदूषण आणि तेल कंपन्यांच्या सर्वेक्षणामुळे पाणी तेलकट होत असल्याचे समजते. त्याचा परिणाम सागरी जीवांवरही होत असून मासे मृत होत असल्याचे मच्छीमार सोसायटीकडून सांगण्यात आले. माशांची चवही बदलत असल्याचे काही मच्छीमारांकडून सांगण्यात आले.

मूळ हंगेरीची नागरिक असलेली सुझ्ॉना फेरॉव ही महिला काही स्वयंसेवी संघटनांबरोबर गेली अनेक वर्षे वसईतील समुद्रकिनाऱ्यावरील कचरा गोळा करून परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम करत आहे. रविवारी त्या नेहमीप्रमाणे भुईगाव किनाऱ्यावर गेल्या असता त्यांना किनाऱ्यावरील वाळू तेलकट लागली. बारकाईने निरीक्षण केले असता त्यावर तेलाचे थर आढळले. ‘‘मी नियमित किनाऱ्यावर जात असते, पण पहिल्यांदाच असे तेलकट पाणी दिसले. नेमके हे तेल कसे आले ते माहीत नाही, परंतु समुद्रातील प्रदूषणामुळे पाणी तेलकट झाले आहे,’’ असे फेरॉव यांनी सांगितले. असे तेलकट झालेले पाणी समुद्री जीवांना आणि एकूणच पर्यावरणाला घातक असते, असेही त्यांनी सांगितले.

मच्छीमार क्षेत्रातील तेल सर्वेक्षणास विरोध

विविध तेल कंपन्यांच्या समुद्रातील सर्वेक्षणामुळे असे तेल किनाऱ्यावर आले आहे, असे वसई मच्छीमार सोसायटीचे संचालक दिलीप माठक यांनी सांगितले. तेल कंपन्यांच्या मच्छीमार क्षेत्रातील सव्रेक्षणास आमचा विरोध आहे. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो त्यामुळे हे तेल समुद्रावर येते. यामुळे समुद्रातील मासे मरतात, तसेच या काळात मिळणाऱ्या माशांची चवही बदललेली असते, असे ते म्हणाले.

धोक्याची घंटा

वसईच्या विविध समुद्रकिनाऱ्यांवर डॉल्फिन, व्हेल आणि दुर्मीळ प्रजातीचे कासव मृतावस्थेत आढळून आल्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. हे या प्रदूषणाचेच दुष्परिणाम असल्याचे पर्यावरणवाद्यांनी सांगितले. वसईचे नैसर्गिक समुद्रकिनारे अशा प्रकारे दूषित होणे ही धोक्याची घंटा असून प्रशासनाने वेळीच कारवाई करून ते थांबवायला हवे, असे वसईतील अमित रॉड्रिक्स यांनी सांगितले.