News Flash

कळवा ‘व्यापारी क्षेत्रा’ला सीआरझेडचा अडसर!

सत्ताबदल होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाची घोषणा केली होती.

‘बीकेसी’च्या धर्तीवर १०० एकरांवरील प्रकल्प अडचणीत; एमएमआरडीएपुढे नवा पेच

मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलाच्या धर्तीवर ठाणे शहराला लागूनच असलेल्या कळवा येथील १०० एकरच्या विस्तीर्ण भूखंडावर मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून ‘सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट’ विकसित करण्याच्या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला खारफुटी आणि किनारपट्टी अधिनियम क्षेत्राचा मोठा अडसर उभा राहत असल्याने हा प्रकल्प घोषणेपुरता मर्यादित ठरण्याची चिन्हे आहेत.

सत्ताबदल होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाची घोषणा केली होती. महानगर विकास प्राधिकरणाने कळवा-खारेगाव पट्टय़ातील या विस्तीर्ण जागेचे प्राथमिक सर्वेक्षण महसूल विभागाच्या मदतीने पूर्ण केले. त्यानुसार ११० एकरांपैकी जवळपास ६० एकर जमिनीला अतिक्रमणे आणि घनदाट तिवरांच्या जंगलांनी घेरल्याचे स्पष्ट झाले. उर्वरित जागेपैकी प्रत्यक्ष बांधकामांसाठी जेमतेम ३० एकरचा मोकळा पट्टा उरत असल्याने जागतिक दर्जाचे व्यावसायिक केंद्र उभारण्यासाठी आवश्यक जमीन उपलब्ध होत नाही, या निष्कर्षांप्रत महानगर प्राधिकरण आले असल्याचे समजते.

या पट्टय़ात जिल्ह्य़ातील विविध शासकीय संस्थांची एकत्रित कार्यालये उभारण्याचा प्रकल्प काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात मंजूर करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रस्ताव बदलून मुंबई-नाशिक महामार्गापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या जागेवर मध्यवर्ती व्यावसायिक क्षेत्र उभारण्याची घोषणा केली. ठाणे जिल्ह्य़ात वेगाने होत असलेल्या नागरीकरणाला औद्योगिक विकासाची जोड मिळावी, हा हेतू यामागे होता.

त्यानुसार गेल्या वर्ष-दीड वर्षांत मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने या संपूर्ण जमिनीचे प्राथमिक सर्वेक्षण केले असून या जागेत किनारपट्टी अधिनियम क्षेत्राचा मोठा अडसर उभा राहत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

अडचणींचे संकुल!

  • संपूर्ण वांद्रे-कुर्ला संकुल तब्बल २५० एकरांच्या मोठय़ा पट्टय़ात उभारण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय धर्तीवरील व्यावसायिक संकुलांची उभारणी करताना मोकळ्या जागा, वाहनतळ, हिरव्या पट्टय़ांचे आरक्षणाचे काही कठोर नियम पाळावे लागतात. त्यामुळे अशा संकुलांच्या उभारणीसाठी किमान १०० एकर जागा असावी असे अपेक्षित धरण्यात आले आहे.
  • कळवा-खारेगाव पट्टय़ातील एकूण जागा ११० एकरची असली तरी त्यापैकी ३८ एकर अतिक्रमणांनी बाधित आहे. २० एकर जागा सीआरझेड-१ मध्ये मोडत असल्याने त्यावर कोणतेही बांधकाम करणे शक्य नाही. शिल्लक ५० एकरांपैकी २० एकरांचा पट्टा सीआरझेड-२ मध्ये मोडतो. त्यामुळे या जागेचा वापर मोकळ्या जागा तसेच वाहनतळासाठी केला जाऊ शकतो का, याची चाचपणी प्राधिकरण करीत असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
  • जागतिक व्यावसायिक संकुलासाठी ३० एकर क्षेत्रफळाचा भूखंड पुरेसा नसला तरी आयटी क्षेत्रासाठी लागू असलेल्या तरतुदींनुसार वाढीव चटईक्षेत्राचा वापर करून प्रकल्पाची आखणी होऊ शकते का हे तपासले जात आहे, असेही एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2016 4:29 am

Web Title: crz restrict to kalwa merchant area
Next Stories
1 कल्याण-डोंबिवली पालिकेतील १६ कर्मचारी निलंबित
2 रेल्वेप्रवाशांना धुक्याचा धक्का!
3 प्रजासत्ताक दिन संचलनात लेझीमचा नाद घुमणार!
Just Now!
X