भारतात सध्या ‘मेक इन इंडिया’चे वारे वाहात असताना जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या ‘गंधर्व’ महोत्सवावरही यंदा त्याचीच छाप दिसली. ‘स्वदेशी- मेड इन इंडिया’ या संकल्पनेवर झालेल्या या महोत्सवात यंदा विविधतेने नटलेल्या भारतीयत्वाचे दर्शन पाहायला मिळाले.
या वर्षीचे गंधर्व महोत्सवाचे नववे वर्ष होते. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीसुद्धा विविध नावीन्यपूर्ण स्पर्धानी गंधर्व महोत्सव रंगला होता. गंधर्व महोत्सवाचे उद्घाटन पालक जागृती संस्था या समाजसेवी संस्थेच्या हस्ते करण्यात आले. महोत्सवात सामूहिक आणि वैयक्तिक गायन, नृत्य, रॅप आणि बीट बॉक्सिंग, एकपात्री अभिनय, उत्कृष्ट व्यक्तिमत्त्व स्पर्धा, पथनाटय़ यांसारख्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच क्रीडा प्रकारात रिंक फुटबॉल, बकेट बॉल, लगोरी, बलून फोड, बॉक्स क्रिकेट अशा खेळांचे आयोजन करण्यात आले होते. खेळाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या कलेला वाव देणाऱ्या कंदील बनवणे, भित्तिपत्रक तयार करणे, मेहंदी, रांगोळी या स्पर्धा घेण्यात आल्या.
महोत्सवाची संपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांवर होती त्यामुळे विद्यार्थ्यांनी मेहनत करून महोत्सव यशस्वी केला. विद्यार्थ्यांचे विविध गट पाडून कामाचे वाटप करण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनातच व्यवस्थापन, समूहाने काम करणे, नेतृत्व गुणांचा विकास आणि जबाबदारीची जाणीव यांचा अनुभव येतो. गंधर्वमध्ये एकूण १५० विद्यार्थी स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता, असे गंधर्व महोत्सव विद्यार्थी प्रमुख निहार सवादे याने सांगितले.
गंधर्वमध्ये एकूण ९० ते ९५ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धामध्ये सहभाग घेतला होता. या ‘गंधर्व २०१६’ची चॅम्पियन ट्रॉफी मिळवण्याचा मान आर. ए. पोद्दार महाविद्यालयास मिळाला.

पाककला आणि ग्रेट सेल्फी
तरुणाईतील सध्याच्या खवय्येगिरीची आणि सेल्फीची आवड लक्षात घेऊन पाककला आणि गेट्र सेल्फी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. ग्रेट सेल्फी स्पर्धेत महोत्सवात होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमात सेल्फी काढण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले होते. यासोबत सापशिडीसारख्या स्वदेशी खेळांचे आयोजन महोत्सवात होते. गंधर्व महोत्सवातील व्यक्तिमत्त्वावर आधारित कॅम्यून अ थॉन, स्पेलिंग बी, सू-डोकू , पार्लमेंटरी वादविवाद, बॉलीवूड प्रश्नमंजुषा यांसारख्या स्पर्धा विशेष आकर्षण ठरल्या.

गंधर्व महोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धामध्ये विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

मताधिकार जनजागृतीसाठी वापरा!
जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांचे युवकांना आवाहन
प्रतिनिधी, ठाणे<br />‘तरुणांनी आपल्याला मिळालेल्या मतदानाचा अधिकार जनजागृतीसाठी वापरावा आणि कर्तव्य भावनेतून मतदान करावे,’ असे आवाहन ठाण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनी जोशी-बेडेकर महाविद्यालयात पार पडलेल्या राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमात व्यक्त केले. आपल्या नातेवाईकांना, मित्रांनाही मतदान करण्यात प्रोत्साहित करावे, असे त्यांनी या वेळी सांगितले.
निवडणूक आयोगाची स्थापना झाली तो दिवस मतदार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने महाविद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अपर जिल्हाधिकारी अशोक शिणगारे, जिल्हा उपनिवडणूक अधिकारी फरोग मुकादम, लेखक प्रशांत देशमुख, हॉर्मोनिअम वादक विघ्नेश जोशी, लेखिका संपदा कुलकर्णी, तसेच वरिष्ठ निवडणूक अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. जोशी म्हणाल्या, ‘मुंबई, ठाणे या शहरी पट्टय़ात लोकसंख्या जास्त आहे. परंतु मतदान करण्याचे प्रमाण कमी आहे. मतदानात वाढ होणे गरजेचे आहे, मतदानाचा अधिकार मिळालेल्या युवक-युवतींनी हे परिवर्तन करण्यासाठी आपल्याला मिळालेला अधिकार आहे हे समजून मतदान करावे. मतदारांनी प्रलोभनाला बळी पडू नये.’ ‘मतदार होणे हा माझा अधिकार आहे या कर्तव्य भावनेतूनच मतदान करा,’ असे प्रतिपादन विघ्नेश जोशी यांनी या वेळी केले. तर ‘मतदार हा अधिकार न उच्चारता पार पाडायचा असतो. तरुण-तरुणींनी मतदान करावे यासाठी यांना प्रोत्साहित करा आणि प्रामाणिकपणे मतदान करा,’ असे संपदा कुलकर्णी म्हणाल्या. ‘ घटनेने आपल्याला मोठा अधिकार दिला आहे त्याचा उपयोग करावा,’ असे लेखक प्रशांत देशमुख यांनी सांगितले. या वेळी मान्यवरांच्या हस्ते चित्रकला, निबंध, रांगोळी, वादविवाद स्पर्धा यात प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.

महिलांसाठी विधि साक्षरता कार्यशाळा
प्रशांत घोडविंदे, युवा वार्ताहर
‘चला समजून घेऊ या लोकशाही- आपले कायदे’ या विषयावर जीवनदीप महाविद्यालय गोवेली आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय विधि साक्षरता कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये ४४ महिला बचत गटातील १५० पेक्षा अधिक महिलांनी उपस्थित राहून आपली लोकशाही आणि कायदे समजून घेतले. तसेच महिलांनी एकत्रितरीत्या हुंडाबंदीविषयी शपथ घेतली. भारतीय संविधानाचे वाचन या वेळी कार्यशाळेत करण्यात आले.
या कार्यशाळेत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे मार्गदर्शक एम. बी. पवार आणि कायदेविषयक तज्ज्ञ हेमंत केजाळकार, अजय केतकर आणि नीलेश पावसकर यांनी महिलांना व विद्यार्थ्यांना भारतीय फौजदारी दंडसंहिता, माहितीचा अधिकार कायदा, ग्राहक संरक्षण कायदा, फौजदारी प्रक्रियासंहिता यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर महिलांना मार्गदर्शन केले. तसेच महिलांशी चर्चात्मक संवाद साधून महिलांमध्ये कायद्याबद्दल असलेल्या शंकांचे निरसन करत गैरसमज दूर करून त्यांच्यातील आत्मविश्वास वंृद्धिगत केला. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा विभाग, डी.एल.एल.ई. विभाग आणि महिला मंच विभागाच्या सहकार्याने विधि साक्षरता कार्यशाळा यशस्वीपणे पार पाडली. या वेळी प्रत्येक महिलेला प्रमाणपत्र आणि महिला बचत गटांना स्मृतिचिन्हाने गौरवण्यात आले. जोपर्यंत आपल्याला पोलीस स्थानक आणि न्यायालयाची पायरी चढण्याची वेळ येत नाही तोपर्यंत आपण कायद्याविषयीची माहिती घेत नाही, परंतु विधि साक्षरता कार्यशाळेमुळे आम्हाला लोकशाही व कायद्यांविषयी माहिती मिळाली व त्याचे महत्त्व पटले असे मत उपस्थित महिलांनी मांडले.

‘एनकेटीटी’च्या विद्यार्थ्यांची मानवी साखळी
प्रतिनिधी, ठाणे
राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यासाठी ठाण्याच्या एन.के.टी.टी. महाविद्यालयाने मतदानाचा हक्क, मतदानाचे कर्तव्य या विषयी तसेच मतदार नोंदणी प्रक्रियेविषयी युवा वर्गात जनजागृती करण्याच्या उद्देशाने ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर मानवी साखळीचे आयोजन केले होते. महाविद्यालयातील तीस विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मानवी साखळी निर्माण करून विविध भित्तिपत्रकाच्या माध्यमातून जागृती केली. तसेच विविध लक्षवेधी घोषणांच्या आधारे ठाण्यातील नागरिकांना मतदार नोंदणीचे आणि योग्य उमेदवार मतदान करून निवडण्याचे आवाहन केले. संपूर्ण मानवी साखळीचे आयोजन महाविद्यलयाच्या आर्ट सर्कल या समितीने प्रा. आरती सामंत यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरीत्या पूर्ण केले. कार्यक्रमाच्या आयोजनात महविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. कारखेले यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.
मानवी साखळीच्या आयोजनाच्या दरम्यान ठाण्यातील ज्या तरुण मुलांना ऑनलाइन मतदार नोंदणी प्रक्रियेविषयी माहिती हवी होती अशा तरुणांची एक यादी महाविद्यालयाने तयार केली आहे. या तरुणांना मतदार ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेची संपूर्ण माहिती महाविद्यालय ई-मेलद्वारे पाठवून जोपर्यंत ते मतदार म्हणून नोंद करीत नाहीत तोपर्यंत त्याचा पाठपुरावा करणार आहे. महाविद्यालयातील तरुण विद्यार्थ्यांनी वयाची १८ वर्षे पूर्ण करताच त्यांची मतदार म्हणून नोंदणी व्हावी या उद्देशाने विद्यार्थ्यांचा एक गट कार्यरत राहणार आहे, अशी माहिती आर्ट सर्कलच्या विद्यार्थ्यांनी दिली.

पदवी प्रदान सोहळा
प्रतिनिधी, डोंबिवली
एम.एस.पी. मंडळाच्या जी. आर. पाटील महाविद्यालयाचा पदवी वितरण सोहळा नुकताच पार पडला. शिक्षणशास्त्रात प्रावीण्य मिळविलेल्या अ‍ॅड. जी. आर. पाटील यांचे विद्यार्थी असलेले डॉ. रामप्रकाश नायर यांचे मोलाचे मार्गदर्शन या वेळी विद्यार्थ्यांना लाभले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन, वंदन व दीप प्रज्वलनाने झाली. मुलांना प्रेरणा व स्फूर्ती मिळण्यासाठी माननीय संस्थापक जी. आर. पाटील यांच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक कार्याबद्दल माहिती सांगणारी चित्रफीत दाखविण्यात आली. डॉ. रामप्रकाश नायर व अ‍ॅड. पूजा यांचा सत्कार प्रा. डॉ. अंजनकुमार सहाय यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर पदवी व पदव्युत्तर ६१ उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवेन कारिया व लता वाघ यांनी केले.

सोनावणे महाविद्यालयाला ‘फिनिक्स’चे वेध
प्रतीक सावंत, युवा वार्ताहर
विज्ञान शाखेतील मुले महोत्सवांमध्ये सहभाग घेत नाहीत, असा इतर शाखेच्या विद्यार्थ्यांचा समज असतो. परंतु कल्याण येथील लक्ष्मण देवराम सोनावणे महाविद्यालयाच्या आयटी आणि कॉम्प्युटर सायन्सचे विद्यार्थी मागील वर्षांपासून खास विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी ‘फिनिक्स’ महोत्सवाचे आयोजन करतात. जानेवारी महिना म्हणजे सर्वच महाविद्यालयांत फेस्टिव्हलचा माहोल असतो. या फेस्टिव्हल्समुळे इतर महाविद्यालयाशी संबंध चांगले टिकून राहणे तसेच तेथील विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या विविध कलेला वाव देणे हा यामागचा मुख्य हेतू असतो. म्हणूनच कल्याण येथील लक्ष्मण देवराम सोनावणे या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही या फिनिक्स या महोत्सवाचे आयोजन केले आहे. हा महोत्सव गुरुवार, २९ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत सोनावणे महाविद्यालयात होणार असून यामध्ये विविध स्पर्धाचे आयोजन टीमने केले आहे. या वेळी अ‍ॅड मेकिंग, व्रेकिंग न्यूज, याचबरोबर शार्पशूटर, वेब डिझायनिंग यांसारख्या वैविध्यपूर्ण स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
या फेस्टिव्हलमुळे महाविद्यालयाला स्वत:ची ओळख निर्माण करता येते असे सेक्रेटरी देवांशू सोलंकी आणि अंकुर शुक्ला याने सांगितले. आत्तापर्यंत २०० विद्यार्थी सहभागी झाले असून आणखी विद्यार्थ्यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे.

संकलन : किन्नरी जाधव