जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या परिसराला सोहळ्याचे स्वरूप
महाविद्यालयाची मजामस्ती कधीही संपू नये, असे प्रत्येकालाच वाटत असते. मात्र तरीही महाविद्यालयातील शिक्षण संपते. असे असले तरी मित्र-मैत्रिणींबरोबर केलेल्या धम्माल-मस्तीने प्रत्येकाच्या मनात घर केलेले असते. यांनतर प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त होतो आणि मित्र-मैत्रिणींची आठवण येऊनसुद्धा फोन करायलाही वेळ मिळत नाही. यासाठी दरवर्षी ठाण्याच्या जोशी-बेडेकर महाविद्यालयात गंधर्व महोत्सवाचा उपक्रम म्हणून माजी विद्यार्थ्यांसाठी अ‍ॅल्युमिनाय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या रविवारीही महाविद्यालयाचा परिसर माजी विद्यार्थ्यांचे आगमन त्यांचा कल्ला, मस्ती, धम्माल यांमुळे गजबजून गेला होता. निमित्त होते गंधर्व महोत्सवाच्या ‘अ‍ॅल्युमिनाय’ कार्यक्रमाचे.
या महोत्सवात माजी विद्यार्थ्यांसाठी लगोरी, ट्रेझर हंट, बलून्स गेम्स अशा खेळांचे आयोजन केले जाते. माजी विद्यार्थीही या सर्व खेळांमध्ये हिरिरीने भाग घेतात आणि अनेक वर्षे महाविद्यालयात केलेल्या मजा-मस्तीच्या आठवणींना उजाळा देऊन पुन्हा वर्षभरासाठी या आठवणी गोळा करून मनाच्या कप्प्यात साठवतात. यावर्षीही लगोरी खेळण्यासाठी आलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे संघ तयार करण्यात आले. प्रत्येक संघाला आपापल्या गटाचे नाव ठेवण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले होते. या वेळी कोणी ‘झिपरा गट’ तर कोणी ‘स्ट्रॉन्गेस्ट टीम’ अशी नावे दिली. त्यानंतर या सहा संघांनी एकमेकांसमवेत लगोरी खेळण्याचा आनंद लुटला. अंतिम फेरीत पोहोचलेल्या दोन संघांमध्ये ‘कॅच बलून्स’ हा गेम खेळण्यात आला. तर दुसरीकडे लगोरीमध्ये हरलेल्या संघांनी स्वत:चा दुसरा लगोरी गेम सुरू केला होता. त्यानंतर ‘ट्रेझर हंट’ या खेळामध्ये प्रत्येक जण संघाला दिलेल्या रंगाच्या चिठ्ठय़ा कॅम्पसमध्ये कुठे लपवल्या आहेत हे शोधण्यास दंग होते. या प्रकारच्या उपक्रमामुळे सर्व जुन्या मित्र-मैत्रिणींना भेटता येते. त्यांच्याशी हितगूज साधून कोण काय करतेय याची माहिती जाणून घेण्याबरोबरच कॉलेजचे जुने दिवस पुन्हा आठवता येतात. कधी गंधर्व महोत्सवाच्या निमित्ताने केलेल्या खेळाच्या आयोजनामुळे संपूर्ण कॉलेज परिसराची जुन्या आणि नव्या पद्धतीने ओळख करून घेणे या सर्व गोष्टींचा मेळ येथे यंदाही साधला गेला. अशा प्रकारचा ‘अ‍ॅल्युमिनाय’ कार्यक्रम सुरू करण्याची संकल्पना २०१० साली महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रमुख असणाऱ्या आश्विन धाक्रस यास सुचली होती. त्यानंतर पुढील सर्वच गंधर्व महोत्सवाच्या प्रमुख विद्यार्थ्यांनी त्यात गरजेप्रमाणे बदल करून ६ वर्षे हा महोत्सव सुरू आहे.

आंतरमहाविद्यालयीन अभंग भावार्थ कथन स्पर्धा
प्रतिनिधी ठाणे</strong>
अभ्यासासोबत इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करताना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी संत साहित्याचा देखील अभ्यास करावा, या उद्देशाने मातोश्री वेलबाई देवजी हरिया महाविद्यालयात शुक्रवार, २२ जानेवारी रोजी आंतरमहाविद्यालयीन अभंग भावार्थ कथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळाने या स्पर्धाचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांना सहभाग घेता येणार आहे. सदर स्पर्धेत विजयी होणाऱ्या प्रथम आणि द्वितीय क्रमांकांच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धेत वेगवेगळ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्राचार्या अलका शिंदे यांनी केले आहे. स्पर्धेत सहभागाच्या प्रवेश नोंदणीसाठी संपर्क : समन्वयक प्रा. चिंतामण भोईर ९२२३८७६६४८, सहसमन्वयक भास्कर बिऱ्हाडे ९४२०८०६४६३.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Nursing Student s Suicide Prompts Summer Vacation
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…
MBBS student medical Nagpur
नागपूर : ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्याने स्वत:ला खोलीत कोंडले !

आमच्याच देशात आम्ही परके कसे?
पूर्वेकडील राज्यातील विद्यार्थ्यांचा मर्मभेदी सवाल
ठाण्यातील महाविद्यालयांत पूर्वाचल राज्यातील विद्यार्थ्यांची भेट
प्रज्ञा पोवळे, युवा वार्ताहर
देशाच्या दुसऱ्या राज्यात गेलो की कुणी आम्हाला चिनी म्हणतात, तर कुणी नेपाळी म्हणतात, परंतु आम्ही भारतीय आहोत. भारत हीच आमची भूमी आहे. थोडे वेगळे दिसतो म्हणून अशी सापत्न वागणूक का? आमच्याच देशात आम्ही परके कसे ठरतो, असा मर्मभेदी सवाल पूर्वाचल राज्यातील विद्यार्थ्यांनी केला. आम्हाला दूर करू नका नाही तर चीनसारखा देश भारताचा हा निसर्ग समृद्ध भूभाग बळकावायला टपून बसला आहे, अशी धोक्याची घंटाही त्यांनी वाजवली.
जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या स्टुडण्ट फोरम, स्पीकर्स अकादमी आणि एनएसएस विभागाने या पूर्वोत्तर राज्यातील विद्यार्थ्यांना तेथील समाज जीवन, संस्कृती आणि समस्या यावर चर्चा करण्यासाठी खास भेटीचे निमंत्रण दिले होते. या वेळी या विद्यार्थ्यांनी मनमोकळा संवाद साधला. देशाच्या पूर्व भागातील सेव्हन सीस्टर्स समजल्या जाणाऱ्या आसाम, मणिपूर, मिझोराम, मेघालय, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश आणि नागालॅण्ड या सात राज्यांतील समाज जीवनाचा लेखाजोखा मांडला. ‘अलग भाषा, अलग वेश फिर भी अपना एक ही देश’ असे म्हणत या मुलांनी ‘भारत हमको जान से प्यारा है’ असा नारा या कार्यक्रमात दिला. देशाच्या इतर राज्यांच्या तुलनेत आमच्या राज्यांचा विकास म्हणावा तसा झालाच नाही. नेमका याचाच गैरफायदा इथले नक्षलवादी घेतात. आमच्या राज्यांना कसे वेगळे ठेवले जाते याचा अपप्रचार करून ते इथल्या लोकांची विशेषत: तरुणांची माथी भडकवतात. पण आम्हाला असे नको. आम्हाला विकास हवा आहे, आमचा देश हवा आहे. लक्पा पानसा, देबिका संगमा, प्रेमीना, हुवाजीब नेमा, लंग्वंग कोरु, निलांजना कोच हे विद्यार्थी जोशी-बेडेकरच्या विद्यार्थ्यांशी गप्पांत रंगून गेले होते. या वेळी त्यांनी पूर्वेकडील लोकगीते म्हणून दाखवली.हाच धागा पकडून जोशी-बेडेकरच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची संस्कृती कशी मिळती-जुळती आहे हे सांगत संस्कृतीचे आदानप्रदान या वेळी करण्यात आले. विवेकानंदांचे विचार आचरणात आणा, आयुष्यात खूप प्रगती कराल, असा मोलाचा सल्ला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शकुंतला सिंग यांनी विद्यार्थ्यांना दिला.

एन.के.टी. महाविद्यालयातही स्वागत
प्रतिनिधी ठाणे
एन.के.टी. महाविद्यालयात आंतरराज्य छात्र जीवन दर्शन अर्थात सीलअंतर्गत विविध राज्यांतील विद्यार्थी भेट देण्यासाठी आले होते. मेघालय, अरुणाचल प्रदेश, आसाम येथून विद्यार्थी यात सहभागी झाले होते. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी ढोलताशाचे सादरीकरण केले. तसेच नृत्य, गायन असे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून या विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. हा अनुभव आमच्यासाठी फारच छान आहे, आपल्या स्वागताने, आपुलकीने आमची परकेपणाची भावना दूर झाली. आम्हाला आमच्या घरी आल्यासारखे वाटत आहे, अशा भावना या विद्यार्थ्यांनी एन.के.टी. महाविद्यालयात व्यक्त केल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. कारखेले तसेच प्राध्यापक, विद्यार्थ्यांशी अनौपचारिक संवाद साधला.

पाडगावकरांनी कवितेला रसिकाभिमुख केले!
जोशी-बेडेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची पाडगावकरांना मानवंदना
प्रतिनिधी, ठाणे
‘कविवर्य मंगेश पाडगावकरांनी महाराष्ट्रभर भ्रमंती करून कविता ऐकवल्या. रसिकांवर मनापासून प्रेम केले. कविता कशी पेश करावी आणि कशी ऐकावी हे शिकविले म्हणूनच कवितेला रसिकाभिमुख करायचे श्रेय पाडगावकरांना जाते,’ असे विचार जोशी-बेडेकर कला-वाणिज्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुभाष शिंदे यांनी काढले. मराठी भाषा विभागाने आयोजित केलेल्या श्रद्धांजलीपर कार्यकमात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर प्रा. नारायण बारसे, डॉ. प्रतिभा टेंबे, डॉ. इंद्राणी रॉय, प्रा. संतोष राणे उपस्थित होते.
या वेळी उपप्राचार्य शिंदे म्हणाले, पाडगांवकरांच्या कवितेने रसिकांना भरभरून आनंद दिलेला आहे. अवजड तत्त्वज्ञान सोप्या भाषेतून कवितेत मांडले, म्हणूनच पाडगांवकरांची कविता सामान्यांना जवळची वाटली. लहान मुलांपासून आबालवृद्धांपर्यंत सर्वानीच पाडगांवकरांच्या कवितेवर प्रेम केले.
जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहणाऱ्या मंगेश पाडगांवकरांनी मराठी भाषा अधिक समृद्ध केल्याचे सांगून प्रा. नारायण बारसे म्हणाले, ‘पाडगावकरांनी त्यांच्या काव्य सृष्टीतून या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करायला शिकविले. त्यांच्या भावगीतांनी रसिकांना दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्यावाचून झुलायचे म्हणायला भाग पाडले. पाडगांवकर गेलेत असे वाटतच नाही, कारण त्यांच्या कवितांतून ते सतत रसिकांच्या जवळच आहेत. या वेळी विविध भाषिक विद्यार्थ्यांनी मंगेश पाडगांवकरांना श्रद्धांजली अर्पण केली. सबा शेख, जेनिस वर्गिस, आमरिन शेख, प्रतीक्षा कुलकर्णी, प्रथमेश डोळे, नितीन खापरे, गणेश खेकल, यांनी पाडगांवकरांच्या कविता सादर केल्या. पंकज चव्हाण याने सूत्रसंचालन केले.

‘मंजुनाथ’चा ‘युथ कॉनक्लेव्ह’ दणक्यात
प्रतिनिधी, ठाणे
मंजुनाथ महाविद्यालाच्या राष्ट्रीय सेवा योजना व आशाए ग्रुपच्या संयुक्त विद्यमानाने, ‘युथ कॉनक्लेव्ह २०१६.. आवाज तरुणांचा’ या आगळ्यावेगळ्या कार्यशाळेचे आयोजन मंजुनाथ महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले होते. तरुणांसाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हास्तरीय या कार्यशाळेत डोंबिवली, ठाणे, कल्याण, भिवंडी विविध कॉलेजमधील १००हून अधिक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. तरुणांचे समाजकार्यातील योगदान, पर्यावरण व विकासाचा राजकारण अशा विविध विषयांवर या वेळी चर्चा करण्यात आली. तरुणांना स्वत:बद्दल निगडित विषयाबद्दल माहिती मिळावी त्यांच्या विषयावर शंकांचे निरसन व्हावे यासाठी प्रश्नोत्तर तासाचे आयोजनही करण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून मॉडेल कॉलेज, कल्याणचे संतोष भक्त व मंजुनाथ महाविद्यालयाच्या सानिका करकरे यांनी काम पाहिले. या वेळी पार पडलेल्या पीपीटी स्पर्धेत मंजुनाथ कॉलेजच्या रोशनी भोसले व पवित्रा शेट्टी यांनी पहिले बक्षीस पटकावले तर दुसरे पारितोषिक एसआयए कॉलेज डोंबिवली यांनी पटकावले.

ज्ञानसाधना महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ
ठाणे : मुंबई विद्यापीठाच्या वतीने ज्ञानसाधना महाविद्यालयाचा वार्षिक पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या वेळी डॉ. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे निवृत्त संचालक डॉ. हेमचंद्र प्रधान यांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येणार आहे. २३ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता आठवा मजला, ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे (प.) येथे हा सोहळा होणार आहे. शैक्षणिक वर्ष २०१४-१५ मध्ये पदवी संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन महाविद्यालयाने केले आहे.

‘विवेकानंदांनी असहिष्णुतेचा इशारा दिला होता’
अभ्यासक सुहास पटवर्धन यांचे मत
प्रशांत घोडविंदे, युवा वार्ताहर
धर्मनिरपेक्षता आणि असहिष्णुतेचे वातावरण देशात तयार होऊ शकते, असे मत स्वामी विवेकानंद यांनी त्यांच्या काळात मांडले होते. जे आज जसेच्या तसे लागू पडते. यावरून स्वामी विवेकानंदांची दूरदृष्टी आणि महानता लक्षात येते, असे मत स्वामी विवेकानंदांच्या चरित्राचे अभ्यासक सुहास पटवर्धन यांनी व्यक्त केले. जीवनदीप शैक्षणिक संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गोवेली येथे तत्त्वज्ञान विचार मंच आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती सोहळ्यात ते बोलत होते. स्वामी विवेकानंदांचे विचार आजच्या आयुष्यातही तितकेच लागू पडतात, त्यामुळे ते चिरकाल टिकणारे आहेत, असेही ते या वेळी म्हणाले.
स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांचा संयुक्त जयंती सोहळा नुकताच गोवेलीच्या जीवनदीप महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी गुलाबताई भाऊ गायकर यांना आदर्श माता जिजाऊ पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच ऐतिहासिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मोलाचा ठेवा संग्रहाच्या माध्यमातून जपून ठेवणाऱ्या अविनाश हरड आणि योगा क्षेत्रात कमी वयात प्रावीण्य मिळवणाऱ्या अक्षय टेंभे यांना विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले. स्वामी विवेकानंदांच्या विचाराला पुढे नेत युवकांची संघटना बांधत समाजकार्य करणाऱ्या विविध सामाजिक संस्था आणि संघटनांचाही या वेळी सत्कार करण्यात आला. या वेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ असोसिएशनचे अध्यक्ष उमेश तायडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख व्याख्याते म्हणून सुहास पटवर्धन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे संस्थापक नारायण घोडविंदे, अध्यक्ष रवींद्र घोडविंदे, जीवनदीप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. बी. कोरे आदी मान्यवर आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग कार्यक्रमात उपस्थित होते.

घाणेकर नाटय़गृहात ‘ईशान्ये’चे संस्कृती दर्शन
पूर्वाचलातून आलेल्या २७ विद्यार्थ्यांचा एकत्रित समारंभ नुकताच डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात पार पडला. याच माध्यमातून ठाणे शहरात हे विद्यार्थी १२ जानेवारी २०१६ रोजी आले. हे विद्यार्थी ठाण्यातील व्यावसायिक, पत्रकार तसेच इतर प्रतिष्ठित व्यक्तींच्या निवासस्थानी वस्तीला होते.
ठाण्यातील एन.के.टी.टी. महाविद्यालय, ज्ञानसाधना महाविद्यालय, जोशी-बेडेकर महाविद्यालय, ए. पी. शाह महाविद्यालय आणि मनीषा महाविद्यालय या ठिकाणी भेट दिल्यावर एकत्रित सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी पूर्वाचलातून आलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या राज्यांतील सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या सर्व विद्यार्थ्यांना मुंबई दर्शनचे आयोजन करण्यात आले होते. गेटवे ऑफ इंडिया, वांद्रा वरळी सी लिंक, मरिन ड्राइव्ह, नेहरू तारांगण व चित्रनगरी दाखवण्यात आली.

बांदोडकर महाविद्यालयात पदवीदान समारंभ
ठाणे : ‘पदव्यांचे प्रमाणपत्र मिळाले आहे याचा अर्थ बाहेरील विश्वात आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी तयार आहात. मात्र या समाजात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची जबाबदारी आपलीच असते व आपले सामाजिक भान सुजाणपणे जागी ठेवून या विश्वात आपण स्वतंत्रपणे आपला ठसा उमटवण्यासाठी क्रियाशील असायला हवे. नवनवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा, आपल्या ज्ञान-विज्ञानाच्या संशोधनाचा पूरक उपयोग करून घेऊन आपण स्वत:ला सिद्ध करायला हवे,’ असे प्रतिपादन विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांनी बा. ना. बांदोडकर महाविद्यालयात झालेल्या विद्यार्थ्यांच्या दीक्षांत समारंभात व्यक्त केले. जोशी-बेडेकर महाविद्यालय, बा. ना. बांदोडकर विज्ञान महाविद्यालय, टी.एम.सी. विधि महाविद्यालय, व्ही. एन. बेडेकर व्यवस्थापन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ थोरले बाजीराव पेशवे सभागृहात पार पडला. या वेळी २०१४-१५ वर्षांत उच्च श्रेणी मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तेव्हा बेडेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ‘सध्याच्या युगातील तरुण हा मोबाइल क्रांतीमुळे सेल्फीमधून सेल्फिश होण्याकडे झुकतो आहे. मी आणि माझे ही संकल्पना टाकून समाज व देश ही भावना निर्माण व्हायला हवी,’ असा उपदेश त्यांनी दिला. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. माधुरी पेजावर, उपप्राचार्य डॉ. आर. पी. आठल्ये या वेळी उपस्थित होते.

 किन्नरी जाधव