01 March 2021

News Flash

शहरबात ठाणे : सांस्कृतिक महोत्सवांचे दिवस

पूर्वी विरंगुळ्यासाठी केवळ तलावपाळी, नाटय़गृह, चित्रपटगृह ठरावीक उद्यानांकडे ठाणेकरांची पावले वळत होती.

पूर्वी मनोरंजनासाठी केवळ चित्रपटगृह, नाटय़गृह एवढेच पर्याय उपलब्ध होते. काळानुसार या मनोरंजनाच्या साधनांमध्ये बदल झाले आणि नागरिकांच्या मनोरंजनाची जागा ‘इव्हेंट’रूपी कार्यक्रमांनी घेतली. संगीत महोत्सव, खाद्यमहोत्सव ते अगदी वैचारिक खाद्य पुरवण्यासाठी उपयुक्त असलेल्या व्याख्यानमाला इथपर्यंतचा हा प्रवास शहरातील नागरिकांचे विरंगुळ्याचे साधन बनले आहे.

पूर्वी विरंगुळ्यासाठी केवळ तलावपाळी, नाटय़गृह, चित्रपटगृह ठरावीक उद्यानांकडे ठाणेकरांची पावले वळत होती. अलीकडे या विरंगुळ्याच्या ठिकाणांबरोबर आठवडय़ाच्या सुट्टीच्या दिवशी ठाणे शहरात भरणाऱ्या महोत्सवांमध्ये ठाणेकर विरंगुळा शोधत आहेत. एखादी ग्राहक पेठ असो, खरेदी महोत्सव असो किंवा फुलांचे प्रदर्शन असो. आठवडय़ाचा कामाचा शीण घालवण्यासाठी खास सुट्टीच्या दिवशी आयोजित करण्यात येत असलेल्या या महोत्सवांना ठाणेकरांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.  सध्या ठाणे शहरात अशाच महोत्सवांचा माहोल पाहायला मिळत आहे. आठवडय़ाची सुट्टी असल्यावर शनिवार-रविवारी शहरातील मैदानात हे महोत्सव भरवण्यात येत आहेत. या महोत्सवांपैकी खरेदी महोत्सव आणि खाद्यमहोत्सवांना ठाणेकर नागरिकांची विशेष पसंती मिळू लागली आहे. काही दिवसांपूर्वी ठाणे शहरात महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या फुलांच्या प्रदर्शनाला नागरिकांनी विशेष उपस्थिती दर्शवली होती. नुकताच पार पडलेला सीकेपी खाद्य महोत्सव आणि मिसळ महोत्सव नागरिकांच्या भरघोस प्रतिसादात पार पडला होता. मुळात हे महोत्सव शहरातील नागरिकांची सांस्कृतिक गरज ओळखून आयोजित करण्यात येतात. शहरात राहणाऱ्या कोणत्या वर्गाला त्यांची सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी कशाची आवश्यकता आहे, याचे अचूक निरीक्षण करत हे महोत्सव आयोजित करण्यात येतात. वेगवेगळ्या ज्ञाती, शहरात राहणारे वेगवेगळ्या धर्माचे नागरिक यांच्या एकत्रित कृतीतून हे महोत्सव आयोजित करण्यात येत आहेत.

एखादा समाज या महोत्सवाच्या निमित्ताने एकत्र येतोच. शिवाय या महोत्सवांच्या माध्यमातून शहरात राहणाऱ्या इतर ज्ञातींची ओळख इतरांना होत आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने विशिष्ट ज्ञातींचे खाद्यपदार्थ, चालीरीती यांची देवाणघेवाण होऊन सामाजिक बंध जपला जात आहे. मनोरंजनाचे साधन शोधणारा एक वर्ग ठाणे शहरात असतानाच बुद्धिमत्तेला चालना मिळेल, असा विरंगुळा शोधणारा दुसरा वर्ग या शहरात आहे. ठाणे शहरात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असणारी व्याख्यानमालांची परंपरा या बुद्धिवंत वर्गाची साहित्यिक भूक पूर्ण करीत आहे हे निश्चित. कित्येक वर्षे विचारवंतांच्या व्याख्यानातून रसिक श्रोत्यांना वैचारिक खाद्य पुरवण्यासाठी सुरूअसलेल्या रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेला आजही मिळणारा उत्तम प्रतिसाद हे त्यापैकी एक महत्त्वाचे उदाहरण. त्यामुळे मनोरंजनाबरोबरच साहित्य सजगता उत्तम राहण्यास या व्याख्यानमालांचा मोठा हातभार आहे. या महोत्सवांमध्ये मोठय़ा प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असेल पण सांस्कृतिक बंध जपण्याचा दुवा हे महोत्सव आहेत. सध्या ठाणे शहरात लागोपाठ भरणाऱ्या या महोत्सवामुळे शहरात आठवडय़ाच्या सुट्टीच्या दिवशी गजबजलेले वातावरण गेल्या काही महिन्यांपासून पाहायला मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2018 3:21 am

Web Title: cultural festivals day
Next Stories
1 बालकांकडून पोलिओ डोस
2 शहरबात : या ‘टीडीआर’खाली लपलंय काय?
3 कल्याणमध्ये ‘पद्मावत’ सुरु असलेल्या चित्रपटगृहाबाहेर पेट्रोल बॉम्ब फेकला
Just Now!
X