करोना टाळेबंदीपासून ओस पडलेले आणि नंतर गेल्या दोन-तीन महिन्यांत ऑनलाइन व्यासपीठावरून चालवल्या गेलेल्या ठाण्यातील सांस्कृतिक कट्टय़ांच्या कार्यक्रमांना आता पुन्हा प्रत्यक्ष कार्यक्रमांचे वेध लागले आहेत. आटोक्यात येणारा करोना संसर्ग आणि राज्य सरकारकडून आणखी निर्बंध सैल होण्याची आशा यांमुळे जानेवारीपासून शहरातील सांस्कृतिक कट्टे पुन्हा सुरू करण्यासाठी आयोजकांकडून तयारी सुरू झाली आहे.

सांस्कृतिक वारसा असणाऱ्या ठाणे शहरात गेले अनेक वर्षांपासून सांस्कृतिक कट्टय़ांची परंपरा लाभली आहे. सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, वैज्ञानिक, भटकंती तसेच सांगीतिक अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी ठाणेकरांना या कट्टय़ांवर अनुभवण्यास मिळते. मात्र, करोनाच्या पाश्र्वभूमीवर मार्च महिन्यात लागू झालेल्या टाळेबंदीमुळे या कट्टय़ांवर कार्यक्रम घेण्यास निर्बंध आले होते. त्यामुळे मे महिन्यापासून कट्टय़ांच्या संस्थापकांनी ऑनलाइनच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित करण्यास सुरुवात केली होती. मात्र, प्रत्यक्ष कट्टय़ांवर जमणारी मैफल, त्यातून रसिकांशी थेट घडणारा संवाद या गोष्टींची सांस्कृतिक वर्तुळात उणीव जाणवत होती. त्यामुळेच आता या कट्टय़ांना प्रेक्षकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीचे वेध लागले आहेत.

सध्या करोनाचा संसर्ग कमी होऊन रुग्ण संख्येतही घट होऊ लागली आहे. त्यामुळे टाळेबंदीतही शासनातर्फे टप्प्याटप्प्याने शिथिलता देण्यात येत आहे. या पाश्र्वभूमीवरच कट्टा संस्थापकांनी येत्या नवीन वर्षांत प्रेक्षकांच्या उपस्थितीत पूर्वरत कट्टा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नौपाडा परिसरातील सर्वात जुना असलेल्या आचार्य अत्रे कट्टय़ावर करोनाकाळापूर्वी होणाऱ्या कार्यक्रमामध्ये १०० ते १५० नागरिकांची उपस्थिती असायची. मात्र, आता करोनामुळे अंतराचे नियम पाळणे गरजेचे असल्याने कट्टा पूर्ववत सुरू झाल्यास केवळ ५० ते ६० प्रेक्षकांच्या उपस्थितीच कार्यक्रम घेण्याकडे लक्ष दिले जाणार असल्याची माहिती आचार्य अत्रे कट्टय़ाच्या संस्थापक संपदा वागळे यांनी दिली. तसेच ज्या नागरिकांना कट्टय़ावर येणे शक्य होणार नाही अशांसाठी कट्टय़ावरील कार्यक्रमाची चित्रफीत ही व्हॉट्सअप अ‍ॅपच्या माध्यमातून पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तर, ब्रह्मांड कट्टय़ावर होणाऱ्या कार्यक्रमात करोनाकाळापूर्वी २०० ते २५० नागरिकांची उपस्थिती असायची. आता शासनाच्या नवीन नियमावलीची प्रतीक्षा असून त्यानुसारच उपस्थिती ठरविण्यात येईल, असे ब्रह्मांड कट्टय़ाचे संस्थापक राजेश जाधव यांनी सांगितले. करोनाकाळात ऑनलाइनच्या माध्यमातून होत असलेल्या कार्यक्रमांना ठाणे जिल्ह्य़ासह इतर जिल्ह्य़ांतूनही उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे येत्या काळात हे कार्यक्रम हे ऑनलाइनच्या माध्यमातून इतर जिल्ह्य़ांतील नागरिकांसाठीही प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही जाधव यांनी सांगितले.

परवानगीची प्रतीक्षा

कट्टा प्रत्यक्षरीत्या सुरू करण्याचे नियोजन संस्थापक करत असले तरी, महापालिकेच्या परवानगीनंतरच संस्थापकांना कट्टे सुरू करता येणार आहेत. यासाठी शासनाची सार्वजनिक कार्यक्रमासंदर्भातील नवीन नियमावलीकडे कट्टय़ांचे संस्थापक लक्ष वेधून आहेत.

आता टाळेबंदी टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येत आहे. त्यामुळे कट्टय़ांवरील कार्यक्रम हे पुन्हा पूर्ववत सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. महापालिकेची परवानगी मिळताच येत्या नवीन वर्षांत कट्टा प्रत्यक्षरीत्या नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे.

– संपदा वागळे, संस्थापक, आचार्य अत्रे कट्टा, ठाणे.