27 November 2020

News Flash

सांस्कृतिक फडके रस्ता आता वित्तीय केंद्र

डोंबिवलीचे सांस्कृतिक प्रतीक बनलेला फडके रस्ता आता या शहरातील ‘बँकर्स स्ट्रीट’ही बनू लागला आहे.

नागरी सहकारी, खासगी, राष्ट्रीयीकृत अशा एकूण २४ बँका फडके रस्त्यालगतच्या मोक्याच्या इमारतींत सुरू झाल्या असून हा परिसर शहराचे वित्तीय केंद्रही बनत आहे.

रस्त्यालगतच्या इमारतींत २४ बँकांच्या शाखा

भगवान मंडलिक, लोकसत्ता

डोंबिवली : गावचे ग्रामदैवत श्री गणेश मंदिराचे ठिकाण, समाजातील सर्व स्तरांतील मंडळींना एकत्र आणणारी नववर्ष स्वागतयात्रा, तरुणाईच्या जल्लोषात न्हाऊन निघणारी दिवाळी पहाट अशा विविध वैशिष्टय़ांमुळे डोंबिवलीचे सांस्कृतिक प्रतीक बनलेला फडके रस्ता आता या शहरातील ‘बँकर्स स्ट्रीट’ही बनू लागला आहे. नागरी सहकारी, खासगी, राष्ट्रीयीकृत अशा एकूण २४ बँका फडके रस्त्यालगतच्या मोक्याच्या इमारतींत सुरू झाल्या असून हा परिसर शहराचे वित्तीय केंद्रही बनत आहे.

केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर परप्रांतांमधील खासगी, सहकारी बँकांनी फडके रस्त्यालगतच्या गृहनिर्माण सोसायटय़ांमध्ये जागा घेऊन आपल्या शाखा सुरू केल्या आहेत. या भागात बांधकामाधीन असलेल्या इमारतींमध्ये जागेची नोंदणी करून आपापल्या सोयीप्रमाणे बँका सजावटीचे काम करून घेत आहेत.

डोंबिवली मध्यमवर्गीय सुशिक्षित मिश्र समाज लोकवस्तीचे शहर आहे. ५०-६० वर्षांपूर्वी मंत्रालय, मुंबई परिसरातील सरकारी, खासगी आस्थापनांमध्ये काम करणारा बहुतांशी नोकरदार वर्ग डोंबिवलीत वास्तव्यास आला. त्याचबरोबर पूर्वीच्या काळी साहित्य, सांस्कृतिक वातावरणामुळे अनेकांनी निवृत्तीनंतर या शहरात आश्रय घेतला. यापैकी अनेकांची मुले परदेशात शिक्षणासाठी, नोकरीसाठी स्थिरावली आहेत. डोंबिवलीत ६५० कंपन्यांची औद्योगिक वसाहत आहे. यामधील बहुतांशी उद्योजक स्थानिक आहेत. डोंबिवलीत सोन्याच्या बाजारपेठेची उलाढालही चांगली आहे. मॉल, मार्ट यांचे जाळेही आता शहरात विस्तारू लागले आहे. या कारणांमुळे अनेक छोटय़ा, मोठय़ा बँका डोंबिवलीत शाखा कार्यालय सुरू करण्यावर भर देत आहेत. यापैकी बहुतांश बँकांनी फडके रस्त्यावर बस्तान मांडले आहे. त्यामुळे शहराच्या सांस्कृतिक, सामाजिक जडणघडणीचा साक्षीदार असलेला हा रस्ता आता वित्तीय व्यवस्थेचेही केंद्र बनत चालला आहे. फडके रस्त्यावरील प्रशस्त कार्यालये वा गाळ्यांचे मासिक भाडे दोन ते चार लाख रुपयांवर पोहोचले आहे. मात्र, तरीही बँका या रस्त्यावर शाखा थाटण्यास पसंती देत आहेत.

फडके रस्त्यावरील बँका

कॅनरा बँक, आयडीबीआय, विजया, स्टेट बँक, सेंट्रल, महाराष्ट्र बँक, डोंबिवली नागरी सहकारी बँक, एचडीएफसी, शामराव विठ्ठल, ठाणे जनता सहकारी, एनकेजेएसबी, बंधन, विजया, कोटक, करूर वैश्य, अरिहंत, अ‍ॅक्सिस, जळगाव जनता, कर्नाटक, इंडियन, सिंडिकेट, नॉर्थ कॅनरा, लोकमान्य मल्टिपर्पज.

डोंबिवलीतील विविध क्षेत्रांतील व्यावसायिकांचे मोठी आर्थिक उलाढालीचे केंद्र म्हणून फडके रस्ता ओळखला जातो. रेल्वे स्थानकापासून जवळ असल्याने नोकरदार, व्यावसायिकांना या रस्त्यावरील शाखेत व्यवहार करणे सोयीस्कर ठरते. ग्राहक घराजवळच गुंतवणूक करता येईल का, याला प्राधान्य देतो. डोंबिवलीचे प्रति कुटुंब बचत आणि गुंतवणूक प्रमाण अग्रस्थानी आहे. त्यामुळे फडके रस्त्यावर बँका एकवटल्या आहेत.
– स्वाती पांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 1:43 am

Web Title: cultural phadke road now finance center dd70
Next Stories
1 करोनोत्तर रुग्णांचे ऑनलाइन खासगी उपचाराला प्राधान्य
2 सायकल योजनेचा पालिकेला फटका?
3 अंबरनाथ स्थानक परिसर लवकरच अतिक्रमणमुक्त
Just Now!
X