News Flash

निमित्त : ठाण्याचे सांस्कृतिक व्यासपीठ

ठाण्यातील आचार्य अत्रे कट्टय़ानं एव्हाना चांगलाच नावलौकिक मिळविला आहे. हा कट्टा म्हणजे ठाण्यातील एक सांस्कृतिक चळवळच आहे.

| April 18, 2015 12:17 pm

आचार्य अत्रे कट्टा
ठाण्यातील आचार्य अत्रे कट्टय़ानं एव्हाना चांगलाच नावलौकिक मिळविला आहे. हा कट्टा म्हणजे ठाण्यातील एक सांस्कृतिक चळवळच आहे. या कट्टय़ाने आजवर अनेक सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम केले आहेत. विचारवंत, सामाजिक बांधीलकी जपणारी माणसं आणि मनोरंजनाच्या क्षेत्रातील दिग्गज मंडळी यांनी या कट्टय़ावर हजेरी लावली आहे. ठाणेकरांची सांस्कृतिक भूक या कट्टय़ाने भागवली आहे. कट्टय़ावरील वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी ठाणेकरांना तृप्त केलं आहे.

स्वे च्छानिवृत्तीनंतर काय करायचं? हा अनेकांना सतावणारा प्रश्न, पण मनात काम करण्याची ऊर्मी असली की मार्ग आपोआपच सापडतो. स्वेच्छानिवृत्ती घेतलेली काही मंडळी एकत्र आली आणि ‘आचार्य अत्रे कट्टा’ नावारूपाला आला. या मंडळींमध्ये विदुला ठुसे, संपदा वागळे, राधा कर्णिक, शुभांगी घाग, स्मिता पोंक्षे, रत्नाकर निफाडकर, शीला वागळे, अनंत मराठे, सुरेश जांभेकर, शिल्पा राणे, समिधा आदी मंडळींचा समावेश होता.
या कट्टय़ाची सुरुवातही मजेशीरच झाली. विरंगुळय़ासाठी कोपरीच्या जिजाऊ उद्यानात बसल्या असतानाच स्वेच्छानिवृत्तीनंतर काही तरी चांगलं काम करण्यावर संपदा वागळे, विदुला ठुसे आणि मंडळींचं मंथन सुरू होतं. त्या वेळी बागेत जमलेल्या या मंडळींना अ‍ॅक्युप्रेशरची माहिती देण्याच्या हेतूने या विषयावर डॉ. नवरंगे यांनी व्याख्यान दिलं. अत्रे कट्टय़ाचा हा पहिला अनौपचारिक कार्यक्रम. नंतर २५ एप्रिल २००१ साली ठाण्याच्या ‘आचार्य अत्रे कट्टय़ा’चा पहिला औपचारिक कार्यक्रम सुरू झाला. आज १४ वर्षांनंतर ठाण्याचा हा ‘आचार्य अत्रे कट्टा’ एक मुक्त व्यासपीठ म्हणून नावारूपाला आला आहे. पाल्र्याच्या प्रसिद्ध अत्रे कट्टय़ाच्या धर्तीवर या कट्टय़ालाही आचार्य अत्रे यांचं नाव दिलं गेलं. मग आठवडय़ाचा बुधवार आणि ६ ते ७.३० ही वेळ ठरली आणि जागा जिजाऊ उद्यान. अर्थात, हे ठरत असताना वार, वेळ व ठिकाण गैरसोयीची तर ठरणार नाही ना, अशी शंका आलीच. बुधवारच का? तर शनिवार-रविवार लोक बाहेर फिरायला जातात. मग कार्यक्रमाला श्रोते कुठून मिळतील. तसंच कार्यकर्त्यांनाही त्या वेळी वेळ देता येईल की नाही, असे प्रश्न उपस्थित झाले. म्हणून बुधवार हा मधला वार ठरला आणि ‘कोणीही कोणत्याही विषयावर बोला’ हे कट्टय़ाचं बोधवाक्य ठरलं; पण खरी कसोटी पुढे होती. वक्त्यांना आमंत्रित करणं, माइकची व्यवस्था, श्रोते जमवणं ही कामं होतीच. कार्यक्रमासाठी अविनाश कासार यांनी साऊंड सिस्टीमची व्यवस्था सांभाळली. पूर्वी मोहन संभूस यांनी छायाचित्रणाची जबाबदारी सांभाळली. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र गुरुनाथ ही जबाबदारी पार पाडत आहेत.
आजवर अनेक नामवंतांनी या कट्टय़ाला भेटी दिल्या आहेत. यात डॉ. स्नेहलता देशमुख, डॉ. नरेंद्र जाधव, माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार, डॉ. संजय ओक, ‘पानिपतकार’ विश्वास पाटील, रमेश-सीमा देव, डॉ. भारती आमटे, सिंधुताई सकपाळ, डॉ. तात्याराव लहाने, अशोक नायगावकर अशा अनेक दिग्गजांचा यात समावेश आहे, तर धनश्री लेले, प्रवीण दवणे, अनुजा वर्तक  या मान्यवरांनी आपल्या कार्यक्रमाचं पहिलं पुष्प या कट्टय़ावर गुंफलं आहे.
कट्टय़ावर येण्यासाठी आमंत्रित केलं आणि कोणी आलं नाही, असं आजतागायत झालं नाही. उलट अनेक नामवंत मंडळी तुटपुंज्या मानधनावर किंवा मानधन न घेता प्रेमापोटी आणि कट्टय़ाचा नावलौकिक ऐकून उपस्थित राहिले आहेत. काही वक्त्यांनी तर कट्टय़ाची लोकप्रियता पाहून सढळ हाताने देणगीही दिली आहे.
कट्टय़ाची लोकप्रियता लक्षात घेता स्थानिक राजकीय मंडळींनीही कोणतीही अपेक्षा न ठेवता जिजाऊ उद्यानात लोकांना बसण्याची व्यवस्था करून दिली. एरवी निसर्गरम्य खुल्या वातावरणात भरणारा हा कट्टा पावसाळय़ात मात्र शेजारील बंदिस्त सभागृहात होतो.
वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची रेलचेल
कट्टय़ावर राजकारण सोडून सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य अशा अनेक वैविध्यपूर्ण विषयांशी निगडित कार्यक्रम होतात. अत्रे कट्टय़ावर आनंद अभ्यंकरांचा कार्यक्रम झाल्यानंतर काही महिन्यांतच त्यांचं अपघाती निधन झालं. त्यामुळे त्यांचं जाणं ठाणेकरांना चटका लावून गेलं. अभ्यंकरांचा कार्यक्रम विशेष स्मरणीय ठरला तो त्यांच्या मनमोकळय़ा गप्पा आणि पावसामुळे. कार्यक्रमाच्या दिवशी तुफान पाऊस होता. इतका की सभागृहात पाणी शिरलं. लोकांच्या चपला पाण्यात तरंगून वाहू लागल्या, पण तरीही लोकांनी कुठलाही गोंधळ न करता खुच्र्यावर चढून शांतपणे कार्यक्रम ऐकला.
एरियल छायाचित्रकार गोपाळ बोधे यांनी त्यांच्या कार्यक्रमात मुंबई-ठाण्याची जुनी-नवी छायाचित्रे मोठय़ा पडद्यावर दाखवली. हा एक अविस्मरणीय अनुभव होता. कट्टय़ावर ज्येष्ठ नागरिक दिन, महिला दिन, मराठी भाषा दिन, कोजागरी पौर्णिमा असे विशेष दिवसही वेगळय़ा प्रकारे साजरे केले जातात.
वेबसाइट आणि पुस्तक
कट्टय़ाची लोकप्रियता पाहून यंदा www.atrekattathane.com   ही वेबसाइट सुरू करण्यात आली. विलास जोशी आणि नितीन मटंगे यांनी ही वेबसाइट तयार केली आहे. तसेच ‘आमचा कट्टा आमची माणसं’ हे विदुला ठुसे आणि संपदा वागळे संपादित पुस्तकही प्रकाशित झालं आहे. या पुस्तकात नामवंत लेखकांचे लेख आहेत.
आजवर कट्टय़ावर ३० हून अधिक पुस्तकांचं प्रकाशन झालं आहे. अत्रे कट्टय़ावर कार्यक्रम सादर केला की, पुढे त्या कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळतो, अशी मान्यवरांची धारणा आहे.
सामाजिक बांधीलकी जपली
२६ जुलै २००५ ला पावसाने मुंबईसह उपनगरांनाही चांगलेच झोडपले होते. तरीही कट्टय़ाच्या सभागृहात पाणी साचून चिखल झाला होता. कट्टय़ामधील सभासदांनी चिखल साफ करून नित्यनेमाने बुधवारी कट्टा भरविला. मात्र या वेळी कट्टय़ाचे स्वरूप थोडे वेगळे होते. पावसाच्या पाण्यात आपले सर्वस्व गमावलेल्या चिखलवाडीतील लोकांना मदतीचा हात म्हणून जीवनावश्यक वस्तूंची पाकिटं वाटण्यात आली. या लोकांनी पावसाच्या रुद्रावताराचे हृदयद्रावक अनुभव सांगितले.
कट्टा यशस्वी होण्यासाठी जसा कट्टय़ाच्या कार्यकर्त्यांचा मोलाचा सहभाग आहे तसा पितांबरी, स्टेट बँक, स्थानिक आमदार, नगरसेवक, मोहिनी निमकर, आशालता कुलकर्णी, विलास ठुसे आदी मंडळी यांचा मदतीचा हात असतो.
कोपरीचे जिजाऊ उद्यान पूर्वी गर्दुल्यांसाठी ओळखले जात असे. अत्रे कट्टय़ानं या उद्यानाला वेगळी ओळख मिळवून दिली आहे. जिजाऊ उद्यान हे ठाण्यातील एक सांस्कृतिक केंद्र बनलं आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. कट्टय़ावर कार्यक्रम करायचा असेल, तर तीन महिने अगोदरच बुकिंग करावं लागतं, इतकी येथे कार्यक्रम करणाऱ्यांची गर्दी असते.
नित्याच्याच सासू-सुनांच्या मालिकांमधून बाहेर पडून काही लोक अत्रे कट्टय़ातील वैचारिक, सांस्कृतिक कार्यक्रमात स्वेच्छेने सहभागी होतात, हे कट्टय़ाचं मोठं यश आहे, असं कट्टा चालविणाऱ्या मंडळींना वाटतं. सध्या मनोरंजनापलीकडे सांस्कृतिक, साहित्यिक आणि सामाजिक कार्यक्रमांना फारशी गर्दी होत नाही, असे खेदाने म्हटले जाते; परंतु ठाण्याच्या ‘आचार्य अत्रे कट्टय़ा’ने हा समज खोटा ठरविला आहे.
लता दाभोळकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2015 12:17 pm

Web Title: cultural platform of thane
Next Stories
1 तारांकित : डोंबिवलीशी बंध जुळले!
2 खाऊखुशाल : ..तंगडी धरून!
3 लक्षवेधी लढतींमध्ये मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला
Just Now!
X