बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाच्या सहकार्याने ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे २६ नोव्हेंबर या दिवशी रस्ता सुरक्षा सप्ताहाचे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यलयाच्या पतंजली सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. डिसेंबर महिन्यात पहिल्या सप्ताहात रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा होत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये मोटरसायकल हे स्वप्न असते व भरधाव वेग हे व्यसन असते. म्हणून या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये अपघातांविषयीची जनजागृती आवश्यक आहे, असे प्रतिपादन उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी यावेळी बोलताना केले.

ठाणे जिल्ह्य़ातून या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा व पथनाटय़ स्पर्धा घेण्यात येणार आहेत. व पथनाटय़ स्पर्धा ही जिल्हा पातळीवर घेण्याचे ठरविले आहे. यामध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांस मोटरसायकल तर मुलींमध्ये प्रथम येणाऱ्या दोघांना गस्ट्रो स्कूटर इनाम म्हणून देण्याचे ठरवण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी दिली. वक्तृत्व स्पर्धासाठी संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून समन्वयक म्हणून प्रा. बिपिन धुमाळे आणि प्रा. अनिल आठवले यांची नेमणूक करण्यात आली आहे. या वेळी एनएसएस व सांस्कृतिक विभागाच्या विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात हेल्मेट वाटप करण्यात आले.
‘महाराष्ट्रात दिवसाला १०० तरुण रस्ते अपघातात मृत्युमुखी पडत आहेत. म्हणून रस्ता सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे कायद्याची अंमलबजावणी करून त्यावर नियंत्रण मिळवण्याचा पोलिसांचा प्रयत्न असतो, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून कॉलेजातील तरुणाईला या अभियानात सामील करून घेण्याचा हा पोलिसांचा उपक्रम खरोखर उपयुक्त आहे,’ असे मत राष्ट्रीय छात्रसेनेचे अधिकारी बिपिन धुमाळे यांनी व्यक्त केले. पतंजली सभागृहात २०० विद्यार्थ्यांना यावेळी दृक्श्राव्य स्वरूपात रस्ते अपघातांची आकडेवारी, त्यातील गांभीर्य व परिणाम व उपाय यांचे महामार्ग पोलिसांकडून सादरीकण करण्यात आले.

 

संविधान सारनाम्याचे जाहीर वाचन
ठाणे : भारताचे संविधान आणि त्यातील मौलिक तत्त्वे, संवैधानिक हक्क आणि कर्तव्ये यांची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी म्हणून २८ नोव्हेंबर रोजी भारतीय गणराज्याचा संविधान दिवसाचे औचित्य साधून श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर थाणावाला महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाच्या उद्देशांची ओळख व त्याचे महत्त्व कळावे या हेतूने प्रत्येक वर्गात संविधानाच्या सारनाम्याचे जाहीर वाचन करण्यात आले. शिक्षकांच्या उपस्थितीत विद्यार्थी स्वयंसेवकाकडून प्रत्येक वर्गात सारनाम्याचे सामूहिक वाचन झाल्यावर संविधानाची उद्दिष्टय़े व युवा पिढीची जबाबदारी यावर चर्चा आयोजित केली गेली. सारनाम्याचे जाहीर वाचन करताना संविधानाची विविध सर्वसमावेशक उद्दिष्टय़े, वैशिष्टय़े व प्रत्येक भारतीय नागरिकाला मिळालेले अधिकार व त्यांची जबाबदारी याची जाणीव प्रत्येक विद्यार्थ्यांला करून देण्यात आली. संविधानात उल्लेख केलेले प्रशासनाचे विविध पैलू, अधिकार क्षेत्र, विविध राजकीय संस्था, संघराज्याची निर्मिती, दुर्बल घटकांना दिलेले विविध अधिकार या सर्व बाबींवर प्रकाश टाकणारे महितीयुक्त प्रदर्शन महाविद्यालयात आयोजित करण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केला. महाविद्यालयातील निवडक विद्यार्थ्यांनी प्रा.आरती सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली, संविधान दिन साजरा करण्याकरिता राज्यशास्त्र विभाग मुंबई विद्यापीठ येथे आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात भाग घेतला. या चर्चासत्रात ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, जहीर अली, शमीम मोदी इत्यादी मान्यवर विचारवंतांचे विचार ऐकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी महाविद्यालयातील कला शाखेला प्राचार्य व उपप्राचार्य यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
भारतीय संविधान दिवस साजरा
ठाणे : नागरिकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधानाविषयी जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने कल्याण येथील के. एम. अग्रवाल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत व्याख्यानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यात आली. भारतीय राज्यघटना या विषयावर अ‍ॅड. शंकर रामटेके यांनी भारतीय राज्यघटना विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय समिती स्थापन करण्याचा उद्देश, या समितीची उद्दिष्टे तसेच नागरिकांचे राज्यघटनेतील मूलभूत अधिकार आणि हक्क तसेच राज्यघटना दिवसाची माहिती यांचा ऊहापोह अ‍ॅड. रामटेके यांनी आपल्या भाषणात केला. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी उपस्थित विद्यार्थी, प्राध्यापकांसोबत भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेचे वाचन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना तयार करतानाची तसेच त्यावेळचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना राज्यघटना सुपूर्द करतानाची काही दुर्मीळ चित्रफीत, छायाचित्र कार्यक्रमात विद्यार्थ्यांना दाखवली. मुंबई विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. बिडवे, उपप्राचार्य एम.के भिवंडीकर, प्रा. राणे, प्रा, दहिवले यावेळी कार्यक्रमात उपस्थित होते.

 

भारतीय संविधान दिवसाचा महाजागर
ठाणे : विद्या प्रसारक मंडळाचे बा. ना. बांदोडकर विज्ञान महाविद्यालयात २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिनाचा महाजागर करण्यात आला. महाविद्यालयातील जागरण जाणिवांचा अभियानांतर्गत ‘भारतीय संविधानाचे प्रास्ताविक व तोंडओळख’ या विषयावर अ‍ॅड. सुनील भालेराव यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना आणि सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमान हा कार्यक्रम आखण्यात आला होता.
जगाच्या तुलनेत पाहिल्यास भारतीय राज्य घटना ही सर्वात कमी कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली लिहिली गेली व जनतेच्या जवळपास सात हजार सूचनांचा विचार करून मसुदा समितींच्या शिफारसी विचारात घेऊन जनतेसमोर ठेवण्यात आली. आणि इतक्या कमी कालावाधीत लिहिली गेली तरी यामध्ये दोनशे पंच्चाहत्तर कलमे व परिशिष्टय़े आहेत, अशी माहिती अ‍ॅड. भालेराव यांनी दिली. घटनेच्या प्रास्ताविकासंदर्भात बोलताना ते म्हणाले की कोणत्याही देशाच्या घटनेत वी द पिपल अशी सुरुवात असते. जी आपल्या राज्यघटनेत आहे आणि जेव्हा आपण धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणतो तेव्हा आपले भारतीयत्व देशाभिमान हा वी द पिपलमुळे जागृत होतो. येथे कोणत्याही धर्माला, जातीला, पंथाला उद्देशून उल्लेख आढळत नाही. म्हणून जगात सर्वश्रेष्ठ घटना अशी प्रतिमा जगभर आहे, असेही ते म्हणाले. महाविद्यालयाच्या पतंजली सभागृहात संपन्न झालेल्या या जनजागृती व्याख्यानास महाविद्यालयाचे २०० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते.
आपल्या जन्म दाखल्यावरील जातीचा उल्लेख जाऊन ‘भारतीय’ हीच सर्वाची ओळख बनणे गरजेचे आहे. रोटी बेटी व्यवहार जोपर्यंत आंतरजातीय आंतरधर्मीय, आंतरप्रांतीय समाजात होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्धाने जात जाईल असे वाटत नाही, अशी खंत कार्यक्रमाला उपस्थित प्राध्यापकांनी व्यक्त केली. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी व जिल्हा समन्वयक डॉ. किरण पारीया व सांस्कृतिक विभागाचे प्रकाश माळी या वेळी विशेष उपस्थित होते.

 

‘पुरवठा साखळी आणि माहिती तंत्रज्ञान परिसंवाद’
ठाणे : सध्याच्या उद्योग जगामध्ये मागणी-पुरवठा आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नेमके काय आवश्यक आहे, याची माहिती करून देण्यासाठी ठाण्याच्या जोशी-बेडेकर महाविद्यालयात नुकतेच ‘पुरवठा साखळी आणि माहिती तंत्रज्ञान’ विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. परिसंवादासाठी पुरवठा साखळी आणि त्यासाठी माहिती तंत्रज्ञानासंबंधी आवश्यक अशा विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला. परिसंवादात उद्योग क्षेत्रातील विविध मान्यवरांनी सहभाग घेत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
‘माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून कोणताही उद्योग सहजपणे ग्राहक केंद्रित होऊ शकतो, असे मत डॉ. वा.ना बेडेकर व्यवस्थापन संस्थेचे डॉ. नितीन जोशी यांनी यावेळी व्यक्त केले. आजच्या युगात पुरवठय़ापेक्षा मागणी व्यवस्थापन जास्त महत्त्वाचे असून व्यवस्थापनशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी या विषयाचा सखोलपणे अभ्यास करायला हवा, असे ते म्हणाले. परिसंवादामध्ये जोशी यांबरोबरच पुरवठा साखळी आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संतोष कारखानीस यांनी ‘सॅप’ आणि ‘ईआरपी’ सॉफ्टवेअरची अंमलबजावणी आणि सुयोग्य वापर कसा करावा याचे फायदे आणि विविध भाग विद्यार्थ्यांसमोर मांडले. त्याचप्रमाणे सॅप या सॉफ्टवेअरच्या उत्क्रांतीबद्दलही त्यांनी माहिती दिली.
डॉ. राहुल अलटेकर यांनी पुरवठा साखळीचा इतिहास उलगडून सांगत साहित्य संसाधन नियोजन (मटेरिअल रिसोर्स प्लॅनिंग) ते प्रणाली अनुप्रयोग आणि उत्पादने (सिस्टीम अ‍ॅप्लीकेशन अ‍ॅण्ड प्रॉडक्ट्स) हा प्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडला. आजच्या युगात संक्रमण हे उपयुक्त आहे आणि पुरवठा साखळीचे संक्रमण होणे ही काळाची गरज आहे. या सगळ्यात माहिती तंत्रज्ञानाचा वापर म्हणजेच अचूकता असेही त्यांनी यावेळी नमूद केले. श्यामसुंदर यांनी ‘मागणी आणि पुरवठा साखळी, वाहतूक व्यवस्था यांमधील आव्हाने’ याविषयी माहिती दिली. निरनिराळ्या प्रकारे ग्राहकांची मागणी पूर्ण कशी करता येते, त्याला जोडून निरनिराळ्या मूल्य धोरणांची आणि जाहिरातींची आवश्यकता कशी भासते, त्यासोबतच ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करताना पुरवठा साखळीची क्षमता कशी असावी आदी गोष्टींवर श्यामसुंदर यांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले. ‘२०२५ मध्ये भारत हा जगातील सर्वात मोठी तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश असेल, आणि आजच्यापेक्षा कित्येक पटींनी महानगरे आपल्या देशात असतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आज भारतात १७० प्रकारची वाहने आहेत, परंतु २०२५ साली भारतात ६७० प्रकारची वाहने दृष्टीस पडतील. यावेळी भारत हा निर्यातीचे प्रमुख केंद्र बनेल’ असे बिपिन रघुनाथन म्हणाले. ‘एखादी उद्योगसंस्था ते ग्राहक यांच्यातील साखळी उलगडून सांगताना, आजची प्रक्रिया ही मागणीचा अंदाज घेण्याची आहे, परंतु आणखी दहा वर्षांनंतर मागणी अचूकपणे जाणून घेण्याची क्षमता आपल्याकडे असेल’ असेही ते म्हणाले. या कार्यशाळेचे आयोजन करण्यात बेडेकर व्यवस्थापन महाविद्यलयाचे व्यवस्थापन, प्राध्यापक, आणि ऑपरेशन-आयटीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. अशा कार्यशाळा भविष्यातही आयोजित केल्या जाव्यात, अशी अपेक्षा सर्व तज्ज्ञांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी व्यवस्थापकीय विषयांशी संबंधित निरनिराळे कार्यक्रम आणि बक्षीस समारंभाचा कार्यक्रम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पार पडला.