मानवाला आवाजाचा शोध लागला आणि अनादी कालापासून तालाचे महत्त्व त्याला कळले. छोटय़ा छोटय़ा आवाजांवरून सूर आणि ताल मानवाला किती आनंद देतात याचा प्रत्यय वेळोवेळी येऊ लागला. रसिकांच्या पसंतीप्रमाणे कला सादर करणारे कलाकारही तितकेच महत्त्वाचे असतात याचीही त्याला जाणीव होऊ लागली. अशाच कलेमध्ये पारंगत असणाऱ्या कलाकारांनी सादर केलेल्या आणि त्यांच्या कलेच्या प्रवाहातून ऐकू येणाऱ्या ताला-सुरांनी शनिवारी सायंकाळी कल्याण गायन समाज येथे जमलेल्या रसिकांनाही रिझवले.

‘आयोजन’ ही संस्था नेहमीच रसिकांना आनंद मिळावा यासाठी गाण्याच्या अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत असते. शास्त्रीय संगीत व वाद्यांची जुगलबंदी या कार्यक्रमात एकमेकांच्या कलेचा आविष्कार सादर करताना एकमेकांच्या केलेला दाद देणे आणि स्वत:च्या कलेचे उत्तमोत्तम सादरीकरण करून कलाकारांनी रसिकांना हाताने हलकाच ताल धरायला लावला. सभागृहातील वातावरण तीनतालमय झाले होते. विशेष म्हणजे गणराज वैद्यने रूपकच्या अंगाने वाजवलेल्या मिश्र तालामुळे वातावरणात तुकारामाच्या अभंगातील रूपकाची आठवण श्रोत्यांना झाली. तल्लीन झालेल्या वादक आणि गायक कलाकारांबरोबर उपस्थित असणाऱ्या चिमुरडय़ांनीही तबला नसतानाही हाताने तीनतालाचा ताल धरला होता.

तबला हे वाद्य मुलांसाठीच असल्याचा अजूनही अनेक पालकांचा गैरसमज आहे. मात्र हा गैरसमज आरती कुलकर्णी हिने तिच्या तबलावादनातून दूर केला. त्यानंतर कॅलिफोर्नियामध्ये राहूनही तबल्याचे शिक्षण घेणाऱ्या अलोक इर्दे यांनी एकल तबलावादनाचे सादरीकरण केले, तर अनिरुद्ध गोसावी यांनी संवादिनी वाजवून सभागृहात जणू काही स्वरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केल्याचा भास रसिकांना झाला. आनंद आणि दु:ख व्यक्त करताना सुरांचा आधार घेतला जातो.

या सुरांना जेव्हा कलाकार आपलंसं करतात त्या वेळी रसिकही त्या  कलाकारांना आपलंसं करतात. अगदी त्याचप्रमाणे मनोज कट्टीच्या शास्त्रीय गायनाने रसिकांना भुरळ पाडली. या वेळी राग पुरिया कल्याण सादर करणाऱ्या मनोजला तबल्याची साथ ऋग्वेद देशपांडे यांनी दिली, तर अनिरुद्ध गोसावी यांनी संवादिनीची साथ दिल्याने मनोजचे स्वर अधिक भरभक्कम झाले. समुद्राच्या लाटांमधूनही फक्त नाद ऐकू येतात त्याचप्रमाणे सभागृहामध्ये कलाकारांच्या गळ्यातून स्वर आणि बोटातून नाद ऐकू येत होते. रसिकांनीही या नादमयी स्वरांना आपल्या कवेत घेतले होते.

अभंगवाणीतून रसिक आणि कलाकारांमधील रेशमी बंध उलगडले 

दयेचा सागर असणारे संतमहात्म्यांचे वर्णन करताना शब्द कमी पडतात. मात्र त्यांनी लिहून ठेवलेले काव्य म्हणजेच अभंग गायल्यानंतर परिसरात चैतन्य निर्माण होते. मनाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी या अभंगाचे मनन हमखास केले जाते. सुंदर शब्दांमध्ये ताल आणि सुरांची साथ मिळते आणि वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघते आणि त्यातच आपल्या हावभाव आणि मुद्रांनी नर्तिकाही रसिकांना खिळवून ठेवतात. रविवारी सायंकाळी कल्याण येथील सिद्धेश्वर मंदिर येथे संतांची अभंगवाणी या कार्यक्रमात रसिक आणि कलाकारांचे हे रेशमी बंध तयार झाले होते.

डोळ्यांतील अश्रू हे भावभावनांचे एक उत्तम साधन आहे. शब्दांना जेव्हा जाग येत नाही तेव्हा हे अश्रू नेहमीच साथ देत असतात. असेच आनंदाश्रू कलाकारांनी सादर केलेल्या कलेनंतर उपस्थित रसिकांच्या डोळ्यांत दाटले. संताची अभंगवाणी तर अमृतासारखीच गोड आहे. साऱ्या आयुष्याचे सार लिहिणाऱ्या अवघ्या १६ वर्षांच्या ज्ञानेश्वरांचा महिमा किती वर्णावा तेवढा थोडा. मात्र दोन लहान बाळे जशी सुंदर खेळण्यासाठी भांडतात त्याचप्रमाणे कोण छान यासाठी सूर आणि ताल ही साक्षात सरस्वतीची अपत्ये आणि संतांची काव्यरचना यात प्रेमाची भांडणे चालली आहेत असाच भास रसिकांना झाला. सूर निरागस होण्यासाठी सुरांची आळवणी केल्यानंतर स्वाती कर्वे आणि प्रतीक फणसे यांनी आपल्या आवाजाने रसिकांना आपलेसे केले. या वेळी ‘रूप पाहता लोचनी’, ‘कानडा विठ्ठलू’, ‘अवघाची संसार सुखाचा करेन’, ‘तीर्थ विठ्ठल’, ‘अबीर गुलाल’, ‘गुरू परात्मा परेषू’, ‘खेळ मांडियेला’ आदी गाणी सादर झाली. या वेळी प्राजक्ता कुलकर्णी आणि अनुजा पितळे या नर्तिकांनीही आपली कला सादर करून रसिकांचे मन जिंकले.

गंधार मुजुमदार आणि प्रांजल फणसे यांनी तबल्याची साथ, तर संवादिनीची साथ केदार खानोलकर याने दिली. कलाकरांबरोबरच वादकांचे योगदान तितकेच असते याचा प्रत्यक्ष अनुभव कल्याणकर रसिकांनी या वेळी घेतला. मधुरा ओक यांनी संतांच्या आठवणींची निवेदनाद्वारे पुन्हा पाने उलटली. त्यामुळे ज्या संतांचे अभंग सादर झाले त्यांना रसिकांनी मनोमन पुजले असणार यात शंकाच नाही. आपल्या कलेचा सराव करणे आणि हा सराव रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा अवघड प्रवास या कलाकारांनी अगदी सहज पार केला.

भजन आणि अभंगात रमलेले वयोवृद्ध तर नेहमीच दिसतात आणि ते अशा कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावतातच. मात्र कला सादर करणाऱ्या  युवकांबरोबरच अनेक युवक-युवतीने येथे गर्दी केली होती.