शनिवारी रंगणाऱ्या प्राथमिक फेरीसाठी स्पर्धक महाविद्यालयांची कसून तालीम

महाविद्यालयीन स्तरावर तरुणांमधील नाटय़कौशल्याला दाद देणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेचे उत्साहाचे वातावरण महाविद्यालयाच्या आवारात पाहायला मिळत आहे. शनिवारी रंगणाऱ्या ठाणे विभागातील प्राथमिक फेरीच्या निमित्ताने लोकांकिका स्पर्धकांमध्ये कमालीची धाकधूक असून यंदाच्या वर्षी एकांकिकेतून काही तरी नावीन्य दाखवण्यासाठी तरुण कलाकार कसोशीने प्रयत्न करीत आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने महाविद्यालयाच्या तालीम सभागृहात लोकांकिका स्पर्धेची आळवणी सकाळपासूनच सुरू होत असून काहीच दिवसांवर येऊन ठेपलेल्या ठाणे विभागाच्या प्राथमिक फेरीची चर्चा महाविद्यालयात रंगली आहे.

तरुण वयातील नाटय़जाणिवांना सादरीकरणाचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या हेतूने दर वर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेविषयी महाविद्यालयीन वर्तुळात उत्सुकता असते. दर वर्षी नाटय़ क्षेत्रातील दिग्गज मंडळींकडून या स्पर्धेत मार्गदर्शन मिळत असल्याने तरुण कलाकार हिरिरीने या स्पर्धेत सहभागी होत असतात. वेगवेगळ्या केंद्रांवर ही स्पर्धा होत असल्याने संपूर्ण राज्यातील सादरीकरण पाहण्याची संधी मिळत असल्याने तरुणांमध्ये या स्पर्धेविषयी आकर्षण असते. सध्या ठाणे विभागाच्या प्राथमिक फेरीची तयारी महाविद्यालयात जोमाने सुरू असून विभागीय फेरीत दाखल होण्यासाठी नेमके काय प्रयत्न करावे लागतील याविषयीची चर्चा महाविद्यालयाच्या नाटय़समूहात होत आहे. ठाणे केंद्रातून सहभागी होणाऱ्या प्रत्येक महाविद्यालयातील नाटय़समूहात लोकांकिका स्पर्धेचे अनुभव, तयारी याविषयी चर्चा होताना दिसत आहे.

या प्राथमिक फेरीच्या तालमी सुरू असताना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसमोर सादरीकरण करणे, भूमिकेतील बारकावे शोधणे, चुका दुरुस्त करणे यांसारखे प्रयोग सध्या महाविद्यालयात सुरू आहेत. प्राथमिक फेरीत उत्कृष्ट सादरीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या सूक्ष्म बाबींची पूर्तता करण्याकडे कलाकार प्रयत्न करीत असल्याचे सीएचएम महाविद्यालयाचे सिद्धार्थ आखाडे यांनी सांगितले.

प्रायोजक

सॉफ्टकॉर्नर प्रस्तुत, केसरी टूर्स आणि पितांबरी सहप्रायोजित, पॉवर्ड बाय इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या सहकार्याने यंदाची ‘लोकसत्ता लोकांकिका २०१८’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे टॅलेंट हंड पार्टनर ‘आयरिस प्रॉडक्शन’ असून ‘एरेना मल्टिमीडिया’ हे स्पर्धेचे नॉलेज पार्टनर म्हणून काम पाहत आहेत. ‘अस्तित्व’च्या सहकार्याने रंगणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेसाठी झी मराठी टेलीकास्ट पार्टनर आणि एबीपी माझा हे न्यूज पार्टनर आहेत.