मलंगवाडी परिसरातील कातकरी वाडीतील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना ‘सेवा समर्पण’ संस्थेतर्फे पादत्राणांचे वाटप करण्यात आले. शाळेतील सर्व विद्यार्थी शाळेत अनवाणी येत असल्याचे पाहून संस्थेने मुलांना पादत्राणे देण्याचा निर्णय घेतला होता. या कार्यक्रमानंतर कधीही चपलेचा वापर न केलेल्या या मुलांना पादत्राणांचे कमालीचे कुतूहल वाटत होते.

कातकरी वाडी ही मलंग गडापासून काही अंतरावर दुर्गम व डोंगराच्या कुशीत आहे. कष्टकरी वर्ग वाडीत राहतो. सकाळी उठून मजुरी, हमालीसाठी कल्याण किंवा मलंगवाडी येथे जायचे, त्यावर उपजीविका करायची असा येथील कुटुंबीयांचा दिनक्रम असतो. गरीब परिस्थितीमुळे मुलांना शालेय साहित्य आणणे कठीण होत असताना त्यांना चप्पल कोठून आणणार, असा प्रश्न कुटुंबप्रमुखासमोर असतो. गावातील पन्नास ते साठ मुले दररोज शाळेत अनवाणी चालत येतात. हे पाहून सेवा समर्पण संस्थेच्या जयश्री देशपांडे, रोशनी पाटेकर-सासणे यांनी अभिजित मिरजकर, संदीप सासणे, नीलेश नेल्सन, दानशूर प्रज्ञा शिंदे, विजय नाईक व आरव नाईक या आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने कातकरी वाडीतील विद्यार्थ्यांना चप्पल (सॅन्डल) वाटपाचा कार्यक्रम शनिवारी आयोजित केला होता. विद्यार्थ्यांना चपलांचे खोके वितरित करण्यात आल्यानंतर अतिशय उत्सुकतेने विद्यार्थी त्याची पाहणी करीत होते. पायामध्ये घालण्यासाठी पादत्राणांचा वापर करायचा असतो यावर अनेक विद्यार्थ्यांचा विश्वासही बसत नव्हता.

दुर्गम भागातील मुलांमध्ये गुणवत्ता असते, पण त्यांना दिशा देण्याची गरज असते. त्यांच्या शालेय गरजा वेळेत पूर्ण केल्या नाहीत तर घरच्या परिस्थितीमुळे मुले शाळेकडे पाठ फिरवतात. या मुलांचे पालक कष्टकरी असल्याने त्यांना दररोजच्या जगण्याची भ्रांत असते. त्यामुळे अशा पालकांच्या मुलांकडे स्वयंसेवी संस्थांनी लक्ष दिले तर नक्कीच हे विद्यार्थी उद्याचे गुणवान विद्यार्थी असतील, असा विश्वास आहे. म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आला. यापूर्वी या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले आहे, असे रोशनी पाटेकर यांनी सांगितले.