मोठी आवक असूनही बाजारात भाजी खरेदीकडे ग्राहकांची पाठ; व्यापारी हवालदिल

यंदाच्या उत्तम पावसामुळे भाजीपाल्याचे चांगले उत्पन्न आले असले तरी चलनकल्लोळाचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. अत्यंत कमी किमतीमध्ये हा भाजीपाला विकण्याची नामुष्की त्यांच्यावर येऊन ठेपली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणाऱ्या सर्वच भाजीपाल्यांचे दर किलोमागे ५ ते ३० रुपयांपर्यंत घसरले असले तरी ग्राहकांनी चलनअभावी त्याच्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे भाजी विक्रेते, व्यापाऱ्यांचीही कोंडी झाली आहे.

गेल्या दोन आठवडय़ांपासून चलनटंचाईचा सामना करणारे शेतकरी, व्यापारी आणि किरकोळ भाजी विक्रेते हवालदिल झाले आहेत. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला असून मोठय़ा प्रमाणात नुकसानीचा सामना करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारात सध्या इतर दिवसांच्या तुलनेत अवघी ४० टक्क्यांपेक्षाही कमी विक्री होत असल्यामुळे त्यावर अवलंबून असलेल्या मोठय़ा वर्गाला फटका बसला आहे.

पावसाच्या दमदार हजेरीमुळे यंदा शेतकऱ्यांना दिलासा मिळून उत्पन्नातही त्यामुळे मोठी वाढ झाली होती. शेतीचे उत्पन्न वाढल्यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईच्या बाजारपेठांमध्ये भाजीची मोठी आवक सुरू झाली होती. दिवसाला चारशे ते पाचशे गाडय़ा नाशिक-पुण्यावरून बाजारामध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली होती. भाज्यांच्या स्वस्ताईचे दिवस अवतरल्याचा अनुभव ग्राहकांना होत होता. त्याच दरम्यान दोन आठवडय़ांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजार आणि पाचशेच्या नोटाबंदीची घोषणा केली. या घोषणेमुळे बाजारपेठेतील चलन कमी झाल्यामुळे भाजी विक्रीला त्याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. बाजारात मोठय़ा प्रमाणात येणाऱ्या भाजीपाल्याची चलनतुटवडय़ामुळे खरेदीच थांबली आहे. हा माल नाशवंत असल्यामुळे मिळेल त्या किमतीमध्ये विकण्याची नामुष्की व्यापाऱ्यांवर आली आहे. भाज्यांचा दर कमालीचा खाली आला असला तरी त्या खरेदी करण्याची क्रयशक्तीच ग्राहकांमध्ये राहिली नसल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

नाशिकमध्येही शेतकऱ्यांची कोंडी

नाशिक:चलन तुटवडय़ामुळे जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांचे कामकाज सात ते आठ दिवस बंद राहिल्यानंतर धनादेशाच्या आधारे लिलाव पूर्ववत होत असले तरी व्यापारी नाशवंत भाजीपाला पडेल भावात खरेदी करत शेतकऱ्यांची कोंडी करत आहे.आठ ते दहा रुपयांवर असणारा टोमॅटो सध्या दोन ते तीन रुपयांना विकला जात आहे. त्यातही पिंपळनारे व गिरणारे गावातील घाऊक बाजारात व्यापारी रद्दबातल झालेल्या नोटा शेतकऱ्यांच्या माथी मारून आपले उखळ पांढरे करून घेत असल्याचे समोर आले आहे.

बाजारामध्ये मोठय़ा प्रमाणात भाजीपाला येत असला तरी पुरेसे चलन नसल्यामुळे बाजारातील मालाला उठाव नाही.पूर्वी एखादा व्यापारी दिवसाला दीडशे सफरचंद विक्री करत असेल तर सध्या जेमतेम ४० ते ५० पेटय़ांची विक्री होते. ग्राहक नसल्यामुळे येईल त्या ग्राहकाला कमी दरात माल उपलब्ध करून द्यावा लागत आहे.   – संजय पानसरे, माजी संचालक, कृषी उत्पन्न  बाजार समिती

चांगली आवक असल्यामुळे भाज्यांचे दर नियंत्रणात असले तरी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येत नाही. ग्राहकांनी अक्षरश: भाज्यांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे बाजारात भाजीपाला पडून राहू लागला आहे. यामुळे व्यापाऱ्यांबरोबरच शेतकऱ्यांनाही मोठय़ा नुकसानीचा सामना करावा लागत आहे. – शंकर पिंगळे, घाऊक भाजी विक्रेते, कृषी उत्पन्न बाजार समिती