News Flash

चलन तुटवडय़ाने हाल

बँका बंद, एटीएममध्येही खडखडाट

नालासोपाऱ्यातील एसबीआय बँकेसमोर ग्राहकांची गर्दी पाहून पिसाळलेला कुत्रा रांगेमध्ये शिरला. त्यामुळे त्याला खांबाला बांधून ठेवावे लागले. 

शंभरच्या नोटाच नसल्याने बाजारपेठा, हॉटेल व्यवसायावर परिणाम; बँका बंद, एटीएममध्येही खडखडाट

पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बाद झाल्यामुळे सर्वसामान्य लोकांचे होणारे हाल सलग सहाव्या दिवशी सुरू होते. शंभर रुपयांच्या नोटाच शिल्लक नसल्याने चलन तुटवडा जाणवत होता, त्याचे परिणाम दैनंदिन व्यवहारावर झाले. बाजारपेठा, हॉटेल व्यवसायावरही चलन तुटवडय़ाचे परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. सोमवारी बँका बंद असल्याने लोकांच्या त्रासात आणखी भर पडली. अनेक ठिकाणी एटीएममध्येही पैशाचा खडखडाट असल्याने लोकांना रिकाम्या हाताने परतावे लागत होते.

केंद्र सरकारने पाचशे आणि एक हजाराच्या नोटा ९ नोव्हेंबरपासून चलनातून बाद केल्या. दोन दिवसांनी सुरू झालेल्या बॅंकांमध्ये पैसे बदलून घेण्यासाठी ग्राहकांची उडालेली झुंबड रविवापर्यंत कायम होती. सोमवारी गुरुनानक जयंतीमुळे बँका बंद असल्याने सर्वसामान्यांच्या त्रासात भर पडत होती. सोमवारी एटीएम सेंटर सुरू होते. पण काही वेळातच पैसे संपत होत असल्याचे चित्र होते.

पैसा पांढरा करणाऱ्या दलालांचा सुळसुळाट

प्रत्येकाच्या खात्यात केवळ अडीच लाख रुपये जमा करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे बेहिशोबी काळा पैसा आहे त्यांची पंचाईत झाली आहे. त्यामुळे अनेक जण ही रक्कम दुसऱ्यांच्या खात्यात टाकण्यासाठी देत आहेत. त्या मोबदल्यात १० ते २५ टक्के कमिशन देण्यात येत आहे. तुमचा काळा पैसा आमच्या खात्यात जमा करून पांढरा करून देऊ , असे सांगणाऱ्या दलालांचा वसई विरार शहरात सुळसुळाट झालेला दिसत आहे. अनेक व्यावसायिक, व्यापारी आणि अधिकारी स्वत:कडील रोकडांची व्हिलेवाट लावण्यासाठी सीएंसोबत बैठका घेत आहेत. वसईतल्या एका बिल्डराने गेल्या तीन दिवसात विविध देणेकऱ्यांची तीन कोटी रक्कम अदा करून आपल्याकडील काळा पैसा सत्करणी लावला आहे.

बँकांची विशेष सेवा

ग्राहकांना त्रास होऊ  नये म्हणून वसईतील विविध बँकांनी खास सेवा सुरू केली आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच मार्गदर्शन करण्यासाठी स्वयंसेवक तैनात केले होते. आम्ही आमच्या २३ शाखांमध्ये प्रत्येकी ४ काऊंटर उघडले आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि महिलांसाठी वेगळ्या रांगा सुरू केल्याचे वसई विकास बँकेचे अध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी सांगितले. आमच्या ग्राहकांना बँकेतून पैसे काढता यावे यासाठी आम्ही एटीएम बंद ठेवले होते. रिझव्‍‌र्ह बॅंकेतून चलनाचा पुरेसा पुरवठा झाला तर ही टंचाई लवकर दूर होईल, असेही म्हात्रे यांनी सांगितले.

हॉटेलांवर परिणाम

चलन तुटवडय़ाचा परिणाम छोटय़ा हॉटेलांवर झाला. ज्यांच्याकडे कार्डने पैसे स्वीकारण्याची सोय नव्हती त्यांच्याकडील ग्राहक कमी झाले होते. वसईतील ‘मी भंडारी’ हे हॉटेल रविवारच्या दिवशी बंद ठेवण्यात आले होते. हॉटेलात लागणारा किराणा माल न आल्याने हॉटेल बंद ठेवावे लागल्याचे व्यवस्थापनाने सांगितले, तर नायगावच्या जनसेवा मेडिकलने लोकांची गैरसोय होऊ  नये म्हणून जुन्या पाचशे आणि हजारांच्या नोटा स्वीकारणार असल्याचा फलक लावला होता.

गर्दी पाहून कुत्रा पिसाळला

रविवारी सकाळी नालासोपाऱ्याच्या आचोळे येथील एसबीआय बँकेसमोर लोकांची गर्दी पाहून परिसरातील एक कुत्रा पिसाळला आणि लोकांवर जोरजोरात भुंकू लागला. तो नंतर रांगेमध्येच शिरल्याने लोकांची त्रेधातिरपीट उडाली. हा कुत्रा नियमित या बँकेच्या आवारात असतो. पण गर्दी पाहून या कुत्र्याचे नियंत्रण सुटले आणि तो लोकांवर भुंकू लागला. त्यामुळे कुत्र्याला येथील एका खांबाला बांधून ठेवण्यात आले. अध्र्या तासाच्या गोंधळानंतर रांग सुरळीत झाली होती.

पालिकेकडे साडेआठ कोटी जमा

वसई-विरार महापालिकेने जुन्या नोटा कररुपात स्वीकारण्यास सुरुवात केल्याने पालिकेच्या तिजोरीत पैशांची भर पडली आहे. पहिल्यात दिवशी मालमत्ता करापोटी पालिकेकडे चाडेचार कोटी जमा झाला होते. सुटीच्या दिवशीही पालिकेने कर जमा करणारे काऊंटर सर्व प्रभाग समित्यांमध्ये सुरू ठेवले होते. रविवारी पालिकेकडे १ कोटी २९ लाख रुपयांचा करभरणा झाला होता, तर सोमवारी दुपारी चार वाजेपर्यंत १ कोटी १५ लाख रुपयांचा कर जमा झाला होता. त्यामुळे आतापर्यंत पालिकेकडे चार दिवसांत तब्बल ८ कोटी ४२ लाख रुपयांचा कर जुन्या नोटांच्या रूपात जमा झालेला असल्याची माहिती उपायुक्त अजीज शेख यांनी दिली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2016 12:43 am

Web Title: currency shortage in vasai virar
Next Stories
1 मीरा-भाईंदर महापालिकेचे ‘मिशन थकबाकी’
2  वसईत नवे पाहुणे अवतरले
3 सर्वात जुने चर्च
Just Now!
X