खिशात रोख रक्कम नसल्याने हॉटेलमध्ये जेवण झाल्यावर इंटरनेटद्वारे बिल भरण्यासाठी हॉटेल मॅनेजरचा मोबाइल मागून पळवल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी मिरा रोड पोलीस ठाण्यामध्ये ग्राहकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मिरा रोड येथील नवरत्न हॉटेलमध्ये हा प्रकार घडला आहे. रविवारी रात्री ११.३० च्या सुमारास एक ग्राहक हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आला होता. पण, जेवण झाल्यावर पैसे देण्यासाठी त्याच्या खिशात रोख रक्कम नव्हती तसंच नेटपॅक संपल्यामुळे इंटरनेटचा वापरही करता येणार नाही असं त्याने हॉटेल कर्मचाऱ्याला सांगितलं. त्यामुळे इंटरनेटद्वारे पैसे भरण्यासाठी त्याने हॉटेलमधील वायफायचा पासवर्ड मागितला. मात्र वायफायची सुविधा ग्राहकांसाठी नसल्याने ग्राहकाने हॉटेल व्यवस्थापकाचा मोबाइल हॉटस्पॉट वापरण्यासाठी घेतला होता. पण व्यवस्थापक दुसऱ्या कामात व्यस्त असल्याची संधी साधत या ग्राहकाने थेट हॉटेल मॅनेजरचा मोबाइल घेवूनच पळ काढला. या भामट्या ग्राहकाविरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.