ठाणे शहरातील बंदीमुळे ग्राहकांची लगबग

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील महापालिका तसेच नगरपालिका प्रशासनांनी आपापल्या शहरांतील घाऊक तसेच किरकोळ मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे जाहीर केल्याने या शहरांतील मद्यप्रेमींची साफ निराशा झाली आहे. मात्र यातूनही अनेक मद्यग्राहकांनी मंगळवारी तोडगा काढलाच. जिल्ह्यातील ग्रामीण भागात मद्यविक्री सुरू असल्याने ठाण्यातील अनेक जण मंगळवारी भिवंडीच्या ग्रामीण भागांत मद्यखरेदीसाठी धाव घेताना दिसत होते. तर मुंबईतील मुलुंडमध्येही मद्यविक्री सुरू असल्याने अनेकांनी यालगतच्या उपनगरात जाऊन मद्यखरेदी केली.

राज्य सरकारने सोमवारपासून प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी मद्य दुकानासह एकल दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला. ही दुकाने सुरू करण्यासंबंधी स्थानिक स्वराज्य संस्थांचा निर्णय अंतिम राहील अशी भूमिका राज्य सरकारने घेतली. त्यानुसार ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी यांसारख्या महापालिकांमधील प्रशासकीय प्रमुखांनी मद्यविक्रीची दुकाने सुरू करायची नाहीत असा निर्णय घेतला. ठाणे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात करोनाचा फैलाव कमी असल्याने येथील प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागात मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे भिवंडीतील कोनगाव, दापोडे, काल्हेर, अंजूर, कशेळी या भागांत मंगळवारी सकाळपासून मद्यविक्रीची दुकाने सुरू झाली. ठाणे, भिवंडीच्या वेशीवर असलेल्या कोन गावात घाऊक मद्यविक्रीचे मोठे दुकान आहे. हे दुकान मंगळवारी सुरू होताच या ठिकाणी मद्यखरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाले. घोडबंदर तसेच इतर भागांतील ग्राहकही पोलिसांची नजर चुकवून या ठिकाणी मोठय़ा संख्येने जमले होते. भिवंडीजवळील दापोडे गावातील मद्यदुकानाजवळ गर्दी वाढल्याने हे दुकान पोलिसांनी बंद पाडले.

मुंबईतील मुलुंड उपनगरातही हेच चित्र दिसत होते. या ठिकाणी मद्यविक्रीची दुकाने सुरू आहेत अशी बातमी पसरताच तेथेही ग्राहकांची मोठी गर्दी होती.