News Flash

‘हबटाऊन ग्रीनवुड’चे ग्राहक रस्त्यावर

घराचा ताबा देण्यास उशीर होण्यामागे आर्थिक अडचण असल्याचे कारण बांधकाम व्यावसायिक पुढे करत आहे.

नऊ वर्षे उलटूनही घरांचा ताबा नाही
ठाण्याचे ‘श्रीमंत उपनगर’ अशी ओळख मिरविणाऱ्या वर्तकनगर परिसरात उभारण्यात येणाऱ्या ‘हबटाऊन ग्रीनवुड’ या मोठय़ा गृहप्रकल्पात तब्बल नऊ वर्षांपूर्वी लाखो रुपयांची गुंतवणूक करूनही आजतागायत घरांचा ताबा मिळत नसल्याने संतापलेल्या शेकडो ग्राहकांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. मुंबईस्थित एका बडय़ा बिल्डरमार्फत या प्रकल्पाची उभारणी केली जात आहे. ‘एमएमआरडीए’मार्फत आखलेल्या रेन्टल योजनेत या प्रकल्पाचा समावेश केला असून त्याविषयीही अंधारात ठेवल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे.
मुंबईस्थित एका बडय़ा बिल्डरने स्थापन केलेल्या हबटाऊन बांधकाम कंपनीमार्फत या प्रकल्पात घरांची नोंदणी सुरू केली होती. २००७मध्ये पालिकेची परवानगी मिळाल्यानंतर विकासकाने या प्रकल्पाचे काम सुरू केले. वर्षभरातच एमएमआरडीएच्या भाडे तत्त्वावरील योजनेत हा प्रकल्प वर्ग करण्यात आला. हे करत असताना ग्राहकांना पूर्णपणे अंधारात ठेवण्यात आले. या प्रकल्पात एकूण सहा इमारती उभारण्यात येणार असून त्यापैकी पाच इमारती ३० तर एक इमारत २५ मजली आहे. या गृहप्रकल्पामध्ये सुमारे ९६० ग्राहकांनी घरे खरेदी केली असून २०१२ मध्ये घराचा ताबा देण्याचे ठरले.
घराचा ताबा देण्यास उशीर होण्यामागे आर्थिक अडचण असल्याचे कारण बांधकाम व्यावसायिक पुढे करत आहे. मात्र, याच विकासकाचे चेंबूर परिसरात मोठय़ा गृहप्रकल्पाचे काम तेजीत सुरू आहे, अशी माहिती इमारतीत घर खरेदी केलेल्या हेमा वटकर यांनी दिली. ‘हबटाऊन ग्रीनवुड’ या प्रकल्पात घर खरेदी करणारे अनेकजण सेवानिवृत्त आहेत. त्यांनी आयुष्याची संपूर्ण कमाई घरासाठी भरली आहे. काहींनी प्रकल्पात घर खरेदी करण्यासाठी जुनी घरे विकली आहेत. त्यामुळे त्यांना आज भाडय़ाच्या घरात रहावे लागत आहे. तसेच घराचा ताबा मिळाला नसला तरी बँकेच्या कर्जाचे हप्ते सुरू झाले असून ग्राहकांना ते नियमित भरावे लागत आहेत. त्यामुळे हक्काच्या घरासाठी सर्वच कुटुंबे न्यायासाठी फिरत आहेत. मात्र न्याय मिळत नसल्याने हा मोर्चा काढण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.
हक्काचे घर पण बाहेरून बघा
‘हबटाऊन ग्रीनवुड’ या प्रकल्पात घर खरेदी केलेल्या ग्राहकांना त्यांचे घराचे काम कुठपर्यंत आले आहे, याची पाहणी करण्यासाठी इमारतीच्या आवारात सोडले जात होते. मात्र, २०१२ पर्यंत एकाही ग्राहकाला इमारतीच्या आवारात सोडले जात नाही. इमारतीचे काम सुरू असल्यामुळे एखादा अपघात होऊ शकतो, असे कारण पुढे केले जात आहे. त्यामुळे हक्काचे घर बाहेरूनच पाहावे लागत असल्याने त्याच्या कामाविषयी काहीच समजत नाही, अशी माहिती अनेक ग्राहकांनी यावेळी दिली. या प्रकरणी संबंधित बिल्डर कंपनीच्या व्यवस्थापनाशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

‘हबटाऊन ग्रीनवूड’मधील ग्राहकांची कैफियत
ठाण्यातील वर्तकनगर परिसरात उभारण्यात येणाऱ्या ‘हबटाऊन ग्रीनवुड’ या गृहप्रकल्पात लाखो रुपयांची गुंतवणूक करूनही घरांचा ताबा मिळत नसल्याने संतापलेल्या शेकडो ग्राहकांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. हक्काचे घर मिळावे, अशी मागणी त्यांनी केली.

राहते घर विकले
पत्नी आणि माझी नोकरी ठाण्यात असल्यामुळे आम्ही नाशिक जिल्ह्य़ातील घर विकले आणि त्यातून मिळालेले पैसे या प्रकल्पात घरासाठी भरले. तसेच या घरासाठी बँकेतून कर्जही घेतले असून त्याचेही हप्तेही सुरू झाले आहेत. -गुलाब राठोड, ग्राहक

भाडय़ाच्या घरात राहण्याची वेळ
समतानगर परिसरात आमचे स्वत:चे घर होते, मात्र ते लहान असल्यामुळे विकले आणि या गृहप्रकल्पात घर खरेदी केले. उर्वरित रकमेसाठी कर्ज काढले. परंतु चार वर्षे उलटूनही घराचा ताबा मिळालेला नाही. त्यामुळे भाडय़ाच्या घरात रहावे लागत आहे.
-मंजिरी निमकर, ग्राहक

मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा
या प्रकल्पात सुमारे ९६० ग्राहकांनी घरे खरेदी केली असून त्यापैकी कुणालाही घर मिळालेले नाही. या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोनदा भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही. मुख्यमंत्र्यांनी आमच्या व्यथा ऐकून घ्याव्यात आणि आम्हाला न्याय द्यावा. -अनुराधा कदम, ग्राहक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2016 5:09 am

Web Title: customers not get possession in hubtown greenwoods vartak nagar after nine year
Next Stories
1 येऊरची प्राणी गणना यंदा सामान्यांना खुली
2 फेरीवाल्यांना प्रवाशांचा दणका
3 निकृष्ट पेव्हर ब्लॉक रस्त्याच्या मजबुतीसाठी डांबराचा थर
Just Now!
X