समाज माध्यम ही सध्या काळाची गरज आहे. पण समाज माध्यमांचा गैरवापरही सध्या वाढत आहे. अश्लीलता पसरविणे, धार्मिक, जातीय भावना भडकविणे, एखाद्याला धमकाविणे, आर्थिक व भावनिक फसवणूक करणे आदी गैरवापर समाज माध्यमांद्वारे केले जातात. समाज माध्यमात वावरताना, पाहताना, लिहिताना, प्रतिक्रिया देताना त्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. याच उद्देशातून ठाणे शहरातील उन्मेष जोशी यांनी आपल्या मित्रांच्या मदतीने ‘रिस्पॉन्सिबल नेटिझन’ ही चळवळ उभी केली. ‘आहान फाऊंडेशन’च्या माध्यमातून सुरू झालेल्या या चळवळीत सायबर सुरक्षेला विशेष महत्त्व देण्यात आले. इंटरनेट आणि समाज माध्यम यांचा सदुपयोग करण्यासंदर्भातील मार्गदर्शन या उपक्रमाच्या माध्यमातून देण्यात आले. ठाणे पोलिसांचेही या उपक्रमाला विशेष सहकार्य मिळत गेले. ठाणे शहरामध्ये सुरू झालेली ही चळवळ आता महाराष्ट्राच्या अन्य भागांमध्ये पोहोचवण्याच्या दृष्टीने उन्मेश जोशी यांनी प्रयत्न सुरू केला आहे.
’‘रिस्पॉन्सिबल नेटिझम’ या उपक्रमाविषयी सांगा
सध्याच्या काळात इंटरनेट नागरिकांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा घटक बनला आहे. व्यवसाय आणि संपर्कासाठी त्याची निकड अत्यंत महत्त्वाची असली तरी त्याच्यावरील अवलंबित्व प्रचंड वाढू लागले आहे. हे अलंबित्व कमी करून इंटरनेटचा सदुपयोग करण्याच्या दृष्टीने ‘रिस्पॉन्सिबल नेटिझन’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याला सगळ्याच थरांतून सकारात्मक प्रतिसाद मिळू लागल्याने आणि पोलिसांनीही या उपक्रमास पािठबा दिल्याने हा उपक्रम अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे. या उपक्रमाअंतर्गत ‘डिजिटल आणि सेफ ठाणे’ हा उपक्रम सुरू झाला. त्या माध्यमातून शहरातील सार्वजनिक आणि खाजगी वाय-फाय जोडणीची तपासणी करून वाय-फाय सुरक्षित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले. ठाणे पोलिसांचा संयुक्तपणे राबवण्यात आलेला हा उपक्रम संपूर्ण राज्यभर राबवण्यासाठीही विचारणा होऊ लागली आहे.
’तुमच्या सामाजिक कामाची सुरुवात कशी झाली?
मुंबईतील रुपारेल आणि रुईया महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेतलेली आमची पिढी. समाजासाठी काहीतरी करण्याच्या दृष्टीने एकत्र आलो. २०११-१२मध्ये आहान फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली. या संस्थेचा पहिला उपक्रम वाहतूक पोलिसांच्या ताणांवर मार्गदर्शन ठरेल, असे व्याख्यान आयोजित करण्याचा होता. या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. त्याच वेळी या ताणतणावांचा विचार करताना सोशल मीडिया अर्थात समाज माध्यमांचा परिमाण या काळात लक्षात आला. कामासाठी त्याचा वापर स्वीकार्य आहे. पण अनेक जण त्याचा गैरवापर करू लागले. दिवसातील १८ ते २० तास त्यावर अनेक जण घालवतात. ही चिंतेची बाब आहे. अनेक मानसोपचारतज्ज्ञांचा या उपक्रमास सहभाग लाभला आणि त्याच दरम्यान मुक्तांगणच्या उपक्रमाशी संपर्क आला. मुक्तांगण संस्थेने इंटरनेट व्यसनाधीनतेवर काम सुरू केले होते. त्यामध्ये अनेक रुग्ण या व्यसनातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून आले.
’कामाचे स्वरूप कसे?
इंटरनेट आजच्या काळात गरजेची गोष्ट असली तरी त्यावरून आपण काय करतो हे देखील महत्त्वाचे ठरते. अनेक मुले इंटरनेटवरून पॉर्न संकेतस्थळांवर जास्तीत जास्त वेळ घालवत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. कालांतराने या गोष्टी घरच्यांच्या लक्षात आल्या आणि त्यानंतर हे प्रकार बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानांची सुरुवात करण्यात आली. ठाण्यातील शालेय विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या व्यसनाची माहिती करून देण्यात आली. प्रत्येक वयोगटातील व्यक्तीने कोणत्या प्रकारे इंटरनेट वापरावे यापासून ते बँकिंग आणि सुरक्षेच्या दृष्टीने घ्यावयाची काळजी इथपर्यंत सगळ्या गोष्टींची ओळख या जनजागृती व्याख्यांमधून देण्यात आली. सायबर पोलिसांचाही याच निमित्ताने संपर्क आला आणि त्यांनीही प्रत्येक उपक्रमाला मदत सुरू केली. त्यावेळचे ठाण्याचे पोलीस आयुक्त के. पी. रघुवंशी आणि सायबर सेलचे प्रमुख मििलद भारंबे यांच्या पािठब्यामुळे ‘आहान’ने अनेक सकारात्मक उपक्रम राबवले. त्याच उपक्रमांचा पुढील टप्पा ‘डिजिटल आणि सेफ ठाणे’ हा आहे.
’‘डिजिटल आणि सेफ ठाणे’विषयी सांगा..
ठाणे शहरातील बहुसंख्य व्यक्ती इंटरनेट वापरत असून ते सुरक्षितपणे इंटरनेट हाताळण्याच्या दृष्टीने प्रयत्न या मोहिमेतून करण्यात आले. आमचा प्रमुख भर हा सार्वजनिक आणि खाजगी स्वरूपात सुरू करण्यात आलेल्या वाय-फायवर होता. ठाणे शहरामध्ये नेमके किती वाय-फाय कार्यान्वित आहेत याची माहिती शोधण्याच्या दृष्टीने आणि त्यांच्या सुरक्षेची तपासणी करण्याचे ठरवण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत ठाण्यातील वीस हजारांहून अधिक वाय-फाय जोडणींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक चतुर्थाश म्हणजे जवळजवळ पाच हजार वाय-फाय हे असुरक्षित असल्याचे आढळून आले. अशा वाय-फाय पुरवठा करणाऱ्यांना नोटिसा देण्याचे कामही पोलिसांनी सुरू केले आहे. यापुढील काळात डिजिटल साक्षरता ही मोहीम राबवणार असून इंटरनेटवापराविषयी पुरेसे ज्ञान नसलेल्यांना ते उपलब्ध करू दिले जाणार आहे.
’या मोहिमा राबवण्यासाठी किती स्वयंसेवक कार्यरत आहेत?
आहान फाऊंडेशनचे १५ जण निर्णय प्रक्रियेमध्ये कार्यरत आहेत. ठाण्यातील १२ महाविद्यालयांतील ३५० विद्यार्थी या उपक्रमामध्ये जोडले गेले आहेत. त्यांना त्यासंदर्भातील प्रशिक्षण दिले असून या प्रशिक्षणातून हे विद्यार्थी या उपक्रमांना मदत करतात. या उपक्रमातून चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक मंडळी आणि तरुण या उपक्रमात काम करण्यासाठी संपर्क करत आहेत.
’या उपक्रमातून काय सकारात्मक बदल समोर येत आहेत?
इंटरनेटविषयीच्या अनभिज्ञतेमुळे या प्रकाराकडे बघण्याचा सामान्यांचा दृष्टिकोन वेगळा होता. अनेकांची फसवणूक झाली तरी त्याविषयी अनेकांनी पोलिसांत तक्रारी करण्याची टाळाटाळ केल्याचेही दिसून येते. केवळ इंटरनेटविषयीच्या अज्ञानामुळे अनेकांना अशा घटनांना सामोरे जावे लागते. एखाद्या वेळी फसवणूक झाल्यास त्याची तक्रार कुठे करायची असाही प्रश्न पडतो. अनेकांमध्ये संभ्रम वाढू लागला होता. हा संभ्रम दूर करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत.