वसई : गतवर्षी वायू वादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळालेली नसतानाच बुधवारी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा जबरदस्त फटका वसईतील केळीबागायतदारांना बसला. वादळी वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या असून यामुळे शेतकरी वर्ग हतबल झाला आहे.

वसईच्या पश्चिम पट्टय़ात मोठय़ा प्रमाणात केळीची लागवड केली जाते. निसर्ग चक्रीवादळामुळे भुईगाव, राजोडी, वाघोली, सत्पाळा, नाळा, वाळुंजे, आगाशी, वटार, नंदाखाल इत्यादी ठिकाणच्या केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले. वर्षभर मेहनत करून, खतपाणी देऊन वाढवलेली केळीची झाडे फळ लागण्याच्या मार्गावर असतानाच वादळी वाऱ्यांमुळे जमीनदोस्त झाल्यामुळे संपूर्ण मेहनत वाया गेल्याची खंत नंदाखाल येथील जॉन परेरा या केळीबागायतदाराने व्यक्त केली.

यावर्षी केळीच्या बागांवर करपा रोग आल्याने केळीबागायतदार हतबल झाले होते. आता चक्रीवादळाने बागा उद्ध्वस्त केल्यामुळे केळीबागायतदार अक्षरश: मेटाकुटीस आले आहेत. काही ठिकाणी सुपारी तसेच मोठी झाडे उन्मळून केळीच्या बागांवर पडल्याने या बागांसह भाजीपाल्याच्या पिकांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती सत्पाळ्याच्या हरिश्चंद्र पाटील या शेतकऱ्याने दिली.

गतवर्षीच्या नुकसानीची भरपाई नाहीच

गतवर्षी जून महिन्याच्या अखेरीस आलेल्या वायू वादळामुळेही वसईतील अनेक ठिकाणच्या केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या होत्या. त्यावेळी बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन शासन स्तरावरून देण्यात आले होते. मात्र अजूनही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. शासनाकडून निधी आलेला आहे, लवकरच नुकसाग्रस्त शेतकऱ्याच्या बँकखात्यावर भरपाईची रक्कम जमा केली जाईल, असे सांगून पीडित शेतकऱ्यांची केवळ बोळवण केली गेली. त्यामुळे शेतकरी वर्गात संताप आहे.