दोन्हींकडून गोळीबार; एक दरोडेखोर अटकेत

वसई : पालघरमधील वाघोबा खिंड परिसरात गुरुवारी रात्री पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये जोरदार चकमक उडाली. दरोडेखोरांच्या एका टोळीने वाहनांवर हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी गोळीबार करून एका दरोडेखोराला अटक केली. या वेळी वार्ताकनासाठी आलेल्या दोन पत्रकांरानाही सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केली.

पालघरच्या शेलवले गावाच्या हद्दीतील मनोर-पालघर रोडवरील वाघोबा खिंडीत रात्री साडेनऊ  ते दहाच्या सुमारास ही घटना घडली. या खिंडीतील अंधाराचा फायदा घेत सात ते आठ दरोडेखोरांची टोळी दबा धरून बसली होती. त्यांनी एका वाहनावर दगडफेक सुरू केली. त्यामुळे इतर वाहने थांबली, तर दरोडेखोरांनी त्यांच्यावरही दगडफेक केली. त्यामुळे येथे गोंधळ उडाला. या घटनेची माहिती मिळताच पालघर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्या वेळी दरोडेखोरांनी पोलिसांवरही दगडफेक सुरू केली. दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला. दरोडेखोरांनीही प्रत्युत्तर म्हणून पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. या वेळी झालेल्या चकमकीनंतर पोलिसांनी एका दरोडेखोराला पकडण्यात यश मिळवले. अन्य दरोडेखोर जंगलात पळून जाण्यात यशस्वी ठरले.

पोलिसांनी जादा कुमक मागवून दरोडेखोरांचा शोध सुरू केला आहे. पालघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांच्या पथकाने दरोडेखोरांशशी सामना करत ही कारवाई केली. फरार दरोडेखोरांचा शोध सुरू आहे.

दोन पत्रकारांना अटक

पोलीस ठाण्यात दरोडेखोरांना आणले असता दोन स्थानिक पत्रकार वार्ताकनासाठी पोहोचले होते. त्या वेळी त्यांनी मोबाइलमधून आरोपींचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना अटकाव केला आणि त्यावरून पोलीस आणि पत्रकारात बाचाबाची झाली. यामुळे पोलिसांनी या दोन्ही पत्रकारांना सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून अटक केली. शुक्रवारी सकाळी या दोन्ही पत्रकारांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. या घटनेचा पालघर जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटनांनी निषेध केला आहे. दरोडय़ाची घटना ही संवेदनशील होती. पत्रकारांनी संयम बाळगणे गरजेचे होते. म्हणून ही कारवाई करावी लागल्याचे पालघरचे पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी सांगितले.